वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत अभिनव संशोधनाचे जागतिक केंद्र तसेच जगातील तिसरी मोठी स्टार्ट अप परिसंस्था म्हणून विकसित होत आहे – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 14 DEC 2021 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज शेजारी देशांमधील सर्व मंत्र्यांना उपखंडाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. ते भारतीय उद्योग महासंघाच्या भागीदार परिषद: मंत्रीस्तरीय परिषदेला नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने संबोधित करताना बोलत होते.

कोविड-19 महामारीच्या काळात, भारत हा लवचिकतेचा स्त्रोत आणि विश्वसनीय भागीदार म्हणून उदय पावला आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सेवांसंदर्भातील आमच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वोत्तम क्षमता पणाला लावल्या आहेत.

महामारीच्या काळात, महत्त्वाच्या औषधांचा पुरवठा, पीपीई किट्स, चाचण्यांचे साहित्य इत्यादींच्या उत्पादनाच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्ण झाला असे नव्हे तर भारताने या सर्व गोष्टींची गरज असलेल्या देशांना यांचा पुरवठा देखील केला अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.

कोणतीही समस्या सोडविण्यासाठी बंधुत्व, भागीदारी तसेच सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज यावर आमचा अढळ विश्वास असल्यामुळे भारत यापुढे देखील गरजू देशांना मदत करण्याचे कार्य असेच सुरु ठेवेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरली असल्याचे सांगून गोयल पुढे म्हणाले की, आर्थिक निदर्शकांची चढती भाजणी ‘विकासशील दशकासाठी भारताची घडण होत असल्याचे’ सूचीत करते.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, आपल्या जागतिक सहभागाची सखोलता आणखी वाढविताना, आपले भविष्य आणि विकासाची दिशा यांच्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. गोयल म्हणाले की, भविष्यातील भागीदारी संबंधांसाठी शाश्वत, समावेशक आणि लवचिक परिसंस्था उभारताना भारताने पुढील सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे: व्यापारी करार, गुंतवणूक, पुरवठा साखळीतील पर्याय म्हणून भारताच्या क्षमता, व्यवसाय करण्यातील सुलभता, अभिनव संशोधने आणि शाश्वतता भारतातील वैविध्यपूर्ण व्यापार प्रकार, कुशल मनुष्यबळ, तुलनेने कमी खर्चात उपलब्ध होणारे मनुष्यबळ आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन, गतिशक्ती, राष्ट्रीय चलनीकरण योजना यांच्यासारखे पायाभूत व्यवस्थेला उर्जा देणारे उपक्रम यांच्यामुळे नक्कीच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि त्याचे उत्तम परतावे देखील मिळतील असे गोयल यांनी सांगितले.

व्यापार करण्यातील सुलभता वाढविण्याच्या भारताच्या प्रयत्नांबद्दल बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय एक खिडकी योजना आणि औद्योगिक भू-बँक यासारखे उपक्रम व्यापार करण्यातील सुलभता लक्षणीय प्रमाणात वाढवीत आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781482) Visitor Counter : 159