युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत 21 वर्षांखालील महिलांच्या साखळी हॉकी स्पर्धांच्या पहिल्या सत्राचे करणार उद्घाटन
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमुळे भारतातील 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या हॉकीपटुंना अतिरिक्त स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळेल
मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचा संघ देखील सामील
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2021 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2021
ठळक मुद्दे:
- स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धांची रचना केली आहे.
- खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत 21 वर्षांखालील महिलांच्या साखळी हॉकी स्पर्धांचे पहिले सत्र 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम येथे होत असलेल्या खेलो इंडिया उपक्रमातील 21 वर्षांखालील महिलांच्या साखळी हॉकी स्पर्धांचे उद्घाटन उद्या (15 डिसेंबर 2021 रोजी) केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धा 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2021 या कालावधीत खेळल्या जातील. स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धांची रचना केली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने हॉकी इंडियाच्या संयुक्त सहकार्याने 14 संघांच्या या साखळी स्पर्धांच्या पहिल्या सत्राचे आयोजन केले आहे. भुवनेश्वर येथील ओडिशा नवल टाटा हॉकी उच्च कामगिरी केंद्र आणि कर्नालची राजा करण अकादमी यांच्यातील सामन्याने या स्पर्धांची सुरुवात होईल.
सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी 14 संघ प्रयत्न करणार असून कनिष्ठ गटातील विश्वचषकासाठी तयारी करणारा भारतीय कनिष्ठ संघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दोन संघ यांच्यात क्रीडारसिकांना चुरस बघायला मिळेल. या चौदा संघांचे गट अ आणि गट ब अशा दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचा संघ अ गटात आहे.

या स्पर्धांविषयी महिला हॉकी विश्वात अत्यंत उत्सुकता आहे. भारतीय महिला हॉकी संघाची माजी कप्तान आणि अर्जुन तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेती प्रीतम राणी सिवाच हिने म्हटले आहे की देशाभरातील खेळाडूंना देशातील सर्वोत्तम संघांशी खेळून त्यांच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
“या स्पर्धेत भाग घेणारे सर्व संघ त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करतील आणि यातील खेळाडूंना हॉकी खेळातील उत्तमोत्तम खेळाडूंशी टक्कर देण्याची संधी मिळाल्यामुळे प्रेक्षकांना हॉकीचा सुंदर खेळ बघायला मिळेल असे ती म्हणाली.

या स्पर्धांचा दुसरा टप्पा प्राधिकरणाच्या लखनौ येथील केंद्रात होईल तर भुवनेश्वर कलिंगा स्टेडीयमवर स्पर्धेच्या समारोपाचे सामने होतील.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1781418)
आगंतुक पटल : 252