कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सीबीआय आणि इतर सर्व संस्थांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचा पुनरुच्चार
सीबीआय मुख्यालयातील पुरस्कार प्रदान सोहळ्यात केले बीजभाषण
Posted On:
12 DEC 2021 7:37PM by PIB Mumbai
सीबीआय आणि इतर तत्सम तपास संस्थांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केला.
भ्रष्टाचाराबाबत असहिष्णुता, पारदर्शकता आणि नागरिक केंद्रितता हे तीन प्रमुख मंत्र आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा प्रशासकीय दृष्टिकोन ठरवतात असे नवी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयातील पुरस्कार प्रदान सोहोळ्यात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. वैचारिक आस्था लक्षात न घेता, सीबीआयसारख्या संस्थांना बळकट करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, कारण या संस्था समाजातील भ्रष्ट्राचार मुक्तीचे अंतिम ध्येय साध्य करण्याचा राष्ट्राचा संकल्प बळकट करण्यातही योगदान देतात असे ते म्हणाले.

सीबीआय संचालक श्री सुबोध कुमार जैस्वाल यांच्या व्यतिरिक्त, केंद्रीय दक्षता आयुक्त श्री सुरेश एन. पटेल, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे केंद्रीय सचिव पी. के. त्रिपाठी, सीबीआयचे विशेष संचालक प्रवीण सिन्हा, वरिष्ठ अधिकारी, विशिष्ट सेवेसाठी पुरस्कार प्राप्तकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या 7 वर्षांत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

काही राज्यांनी प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करताना योग्य त्या ठिकाणी निवडक संमती देण्याचा विशेषाधिकार धारण केल्याचे सांगत डॉ जितेंद्र सिंह यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारने कोणत्या प्रकारचे औचित्य पाळले पाहिजे याबाबत राजकारण, समाज आणि राष्ट्राने व्यापक आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी सर्व सीबीआय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

जयस्वाल यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत असलेल्या ‘स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ च्या संदर्भात सीबीआयच्या "व्हिजन 75" वर देखील सखोल माहिती दिली. आधुनिकीकरण, क्षमता वृद्धी, तपासासाठी उच्च ध्येय निश्चिती तसेच प्रतिबंधात्मक दक्षता आणि नवीन युगातील गुन्ह्यांचा सामना करण्याकरिता अत्याधुनिक क्षमतांचा लाभ घेण्यासाठी एक व्यापक अंतर्गत प्रक्रिया सीबीआयने सुरू केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी 47 सीबीआय अधिकार्यांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदके प्रदान केली आणि पुरस्कारप्राप्त अधिकार्यांना त्यांच्या उत्तम कौशल्य आणि प्रतिभेने देशसेवेसाठी स्वतःला झोकून देण्याचे आवाहन केले.
***
R.Aghor/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780705)