राष्ट्रपती कार्यालय
जनरल रावत हे असामान्य लष्करी नेते होते, त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही: राष्ट्रपती कोविंद
भारतीय लष्करी अकादमीच्या दीक्षांत संचलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
11 DEC 2021 3:26PM by PIB Mumbai
जनरल बिपिन रावत हे एक असामान्य लष्करी नेते होते आणि त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही, अशा भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत. ते आज (11 डिसेंबर 2021) देहरादून येथील भारतीय लष्करी अकादमीच्या(आयएमए ) दीक्षांत संचलन कार्यक्रमात बोलत होते.
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या धक्क्यातून देश अजून सावरलेला नाही, असे राष्ट्रपती म्हणाले. मूळचे उत्तराखंडचे असलेल्या रावत यांनी भारतीय लष्करी अकादमीत प्रशिक्षण घेतले होते. या अकादमीत त्यांना त्यांच्या अनन्यसाधारण कौशल्यासाठी मानाची तलवार प्रदान करण्यात आली होती, असे राष्ट्रपती म्हणाले.
प्रेरणादायी परंपरा असलेल्या आयएमएच्या वैभवशाली परंपरेत जनरल रावत यांनी भर घातल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी व्यक्त केले. त्यांच्या आधी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि इतर अनेक वीर योद्धे आणि युद्धनीतिज्ञानी युवा सैनिक आणि संभाव्य नेते म्हणून आपला प्रवास सुरू केला. शौर्याच्या मार्गावरील प्रवासाला लवकरच सुरुवात करणारे छात्रसैनिक या अकादमीचा समृद्ध वारसा पुढे नेतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
आज आपल्या राष्ट्राला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ती प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील सुरक्षाविषयक जटिल गुंतागुंतीची आहेत. आजच्या काळातील देशापुढील धोक्यांशी सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरतेसोबत नवसैनिकांनी आजच्या काळाला अनुरूप युद्धनीती, वृत्ती, लवचिकता आत्मसात केली पाहिजे,असे मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.
यावेळी झालेल्या पथसंचलनात अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, ताजिकिस्तान, टांझानिया, तुर्कमेनिस्तान आणि व्हिएतनाम या मित्र देशातील कॅडेट्सना पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
Please Click here to the President’s Speech-
***
R.Aghor/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780455)
Visitor Counter : 230