रेल्वे मंत्रालय

देशातल्या सहा हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध


रेल्वे स्थानकामध्ये असताना प्रवाशांना इंटरनेट वापरण्यासाठी सुविधा

ऑनलाइन सेवा/माहिती मिळविण्यासाठी जनतेला होते मदत; डिजिटल भारतासाठी योगदान

Posted On: 10 DEC 2021 8:50PM by PIB Mumbai

 

देशातल्या 6071 रेल्वे स्थानकांवर आत्तापर्यंत वाय-फाय सेवा पुरविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकामध्ये येणा-या प्रवाशांना त्यादिवशी पहिल्या अर्धा तासासाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतरच्या काळासाठी मात्र वाय-फाय वापरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

रेल्वे स्थानकावर वाय-फाय उपलब्ध असेल तर प्रवाशांना इंटरनेटचा वापर करणे सुकर होते. यामुळे जनतेला ऑनलाइन सेवा तसेच माहिती घेण्यास मदत होते. त्याचबरोबरच यामुळे सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमाला हातभार लागत आहे.

या रेल्वेस्थानकांवर दरमहा अंदाजे एकूण 97.25 टेराबाइटस् इतका डेटा वापरला जात आहे.

या योजनेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आलेला नाही. तर दूरसंचार विभागाकडून युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड’ (यूएसओएफ) अंतर्गत ग्रामीण भागातल्या 193 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी 27.22 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (आरसीआयएल)च्या वतीने देशातल्या 1287 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यात येत आहे. (यापैकी बहुतांश रेल्वे स्थानके ए-1 आणि ए श्रेणीतील आहेत) उर्वरित स्थानकांमध्ये विविध कंपन्यांनी सीएसआर म्हणजे सामाजिक दायित्व म्हणून आपल्या खर्चाने वाय-फाय सेवा प्रदान केली आहे. यासाठी रेल्वेला कोणत्याही प्रकारचा भांडवली खर्च करावा लागलेला नाही.

अशी माहिती केंद्रीय रेल्वे आणि दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिली.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780331) Visitor Counter : 183