माहिती आणि प्रसारण मंत्रालय

"कथा लोकांना प्रेरणा देणाऱ्या असाव्यात, एक उत्तम कथा लोकांच्या आयुष्यातील समस्यांविषयी आणि त्यातील अनेकपदरी संकटाविषयी असते" : 52 व्या इफफी दरम्यान मास्टर क्लास मध्ये सुप्रसिद्ध पटकथा लेखक सॅब जॉन एडथाटिल यांनी मांडले मत


कथा, विश्लेषणात्मक, एकरेषीय असू शकतात, मात्र पटकथांचे तसे नसते.पटकथा केवळ प्रेक्षकांना पडद्यावर दृक्श्राव्य स्वरूपात कथा सांगण्यासाठी केलेले रेखाटन असते: एडथतील

Posted On: 26 NOV 2021 8:10PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 

 

उत्तम कथा त्या असतात, ज्या आपल्याला प्रेरणा देतात, असे मत सुप्रसिद्ध पटकथालेखक सॅब जॉन एडथॅटिल यांनी व्यक्त केले. "जर कथा अशा गोष्टींविषयी असेल, ज्या आपल्याला आयुष्यात सहजसाध्य आहेत, तर ती कथा प्रेक्षकांना आकर्षित करणार नाही. कथा ही व्यक्तिरेखांच्या प्रवासाविषयी असते, त्यांच्या आयुष्यातील संघर्षांविषयी असते. उदाहरणार्थ, एखादी कथा असेल, 'मला रोझशी लग्न करायचं होतं, त्यामुळे मी रोझशी लग्न केलं." तर ती आपल्याला भावेल का? नक्कीच नाही. त्यामुळेच कथा लोकांच्या आयुष्यातील संकटांविषयी असते, त्यातल्या विविध समस्यांविषयी असते." 52 व्या इफफीदरम्यान 25 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या मास्टरक्लास मध्ये एडथॅटिल यांनी पटकथालेखन या विषयाविषयी मार्गदर्शन केले. 20 ते 28 दरम्यान गोव्यात हा मिश्र स्वरूपात हा महोत्सव होत आहे. इफफीमध्ये असलेल्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्वरूपात तर इतरांनी आभासी स्वरूपात https://virtual.iffigoa.org/ लिंंकवर या मास्टरक्लासचा लाभ घेतला.

चाणक्यन आणि गुणा या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे एडथॅटिल, दक्षिण भारतातील आघाडीचे पटकथालेखक म्हणून ओळखले जातात. या मास्टरक्लास मध्ये त्यांनी इफफीमध्ये आलेले युवा चित्रपट निर्माते आणि सिनेरसिकांशी संवाद साधला. त्यांनी पटकथालेखनाच्या विविध कल्पना आणि युक्त्याही यावेळी सांगितल्या.

गोष्ट रंगवून सांगण्याच्या प्रक्रियेचे बारकावे आणि त्याची प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास कशी मदत होते हे त्यांनी उत्तमरीत्या समजावून सांगितले. “जेव्हा तुम्ही एखाद्या कथेची पात्र विकसित करत असता, तेव्हा लोकांना त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि आणि उत्सुकता वाटली तर ते पात्रांमध्ये रस घेतात आणि प्रेक्षक खिळवून ठेवले जातात. प्रेक्षक हे लेखकांचे मायबाप असतात, आणि तुम्ही जे निर्माण करता ते त्यांना पूर्णपणे पटायला हवं.”

पात्र विकसित करण्यासाठी, कथेमागच्या कथेच्या महात्वावर त्यांनी भर दिला.

प्रसिद्ध पटकथा लेखक म्हणले की, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी, आपली कथा त्यांच्यासोबत दीर्घकाळ राहावी यासाठी कथा लेखकाच्या हृदयातून यायला हवी.

एडथॅटील म्हणाले की, भावनांना चालना मिळाली  तर आपण कथा लिहू शकतो. “जेव्हा आपण कथा लिहायला बसतो, तेव्हा आपल मेंदू कोरा कागद असतो. जेव्हा आपल्या काही विशिष्ट भावना उत्तेजित होतात तेव्हाच आपण कथा लिहू शकतो आणि शेवटी त्या भावनाच प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. कथेचे मूल्य, प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामावर अवलंबून असते.  हे मूल्य सकारात्मक आणि नकारात्मक देखील असू शकते.”

कथालेखनाचे काहीही नियम नाहीत, केवळ तत्वे आहेत, मात्र दिशा महत्वाची आहे. एडथॅटिल यांनी प्रतिनिधींना सांगितले की कथालेखन केवळ उत्तम भाषेपुरते मर्यादित नाही. कथेचे इतर अनेक घटक असतात. म्हणजे मूळ कथा किती दमदार आहे, व्यक्तिरेखा लोकांच्या जवळ जाणाऱ्या आहेत का आणि कथेची प्रभावी बांधणी, यांचाही परिणाम होतो.

आपण एखाद्या कथेशी स्वतःच्या आयुष्याला कसे जोडतो? एडथॅटिल सांगतात, "आपल्याला कथा का आवडतात? आपण आयुष्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असू, तर आपण स्वतःला त्या कथेशी जोडू शकू का? नाही, आपण या कथांना आपल्या आयुष्यांशी जोडतो. जसजसे आपण आयुष्य पुढे जगत जातो, तसतसा आपल्या आयुष्याविषयी एक दृष्टिकोन तयार होत जातो." 

एडथॅटिल यांनी यावेळी कथा आणि पटकथेमधील मूलभूत फरक देखील समजावून सांगितला. "आपण जेव्हा काहीतरी सांगतो किंवा लिहितो, तेव्हा ती कथा असते असे आपल्याला वाटते. मात्र इथेच पटकथा हा प्रकार वेगळा असतो.पटकथा ही पडद्यावर दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत कथा पोहचवण्याचे एक साधन असते. हाच कथा आणि पटकथेतील फरक आहे." 

कथा विश्लेषणात्मक आणि एकरेषीय  असू शकतात, मात्र पटकथेचे तसे नाही. सगळ्या कथा एकरेषीय असतात, मात्र पटकथा लिहितांना आपल्याला असे तिचे एकरेषीय स्वरुप बदलावे लागते. जुन्या स्वरूपाचे पटकथा लेखन अत्यंत रटाळ असते असे अनेकांना वाटते. मात्र,हे स्वरूप  देखील अनेकदा वापरले गेले आहे आणि यशस्वीही ठरले आहे, असे एडथॅटिल यांनी सांगितले.

 

* * *

Jaydevi PS/Ra.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775409) Visitor Counter : 323


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu