नागरी उड्डाण मंत्रालय

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाची केली पायाभरणी केली


या प्रकल्पामुळे प्रदेशातील औद्योगिक पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल

Posted On: 25 NOV 2021 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज जेवार, उत्तर प्रदेश येथे नोएडा आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाची पायाभरणी केली.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील यमुना द्रूतगती महामार्ग आंतरराष्ट्रीय विकास प्राधिकरणाने (यमुना एक्सप्रेसवे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी,YEIDA) अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील जेवर येथे, 1334 हेक्टर क्षेत्रात नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन करण्यात आले आहे. 

हे विमानतळ भौगोलिकदृष्ट्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 72 किमी, नोएडापासून सुमारे 52 किलोमीटर, आग्रापासून सुमारे 130 किलोमीटर आणि दादरी येथील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हबपासून सुमारे 90 किलोमीटरवर अंतरावर असेल.

हा प्रकल्प नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादीत (नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ,NIAL) द्वारे राबविण्यात येणार आहे, जी एक संयुक्त कंपनी आहे.

कंपनीत उत्तर प्रदेश सरकारचा हिस्सा 37.5 टक्के असेल. इतर भागधारक नोएडा - 37.5 टक्के, ग्रेटर नोएडा - 12.5 टक्के आणि वायईआयडीए - 12.5 टक्के आहेत.

ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे टाकावू वस्तू आणि जागेतून उभारलेले पर्यावरणस्नेही विमानतळ होय.

हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होणार आहे. सवलत करारानुसार, प्रतिवर्षी 12 दशलक्ष प्रवाशांसाठी पहिला टप्पा 29.9.2024 पर्यंत नियुक्त तारखेपासून 1095 दिवसांच्या आत पूर्ण करून कार्यान्वित करायचा आहे.

हा विमानतळ सर्वच दिशांनी उत्कृष्ट मार्गांना जोडलेला असून भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे. ग्रेटर नोएडा ते आग्राला जोडणारा 100 मीटर रुंद यमुना द्रूतगती महामार्गाशी जोडलेला आहे. पलवल, मानेसर, गाझियाबाद, बागपत आणि मेरठला जोडणारा 100 मीटर रुंद वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे फॉर्म्युला-1 मार्गावर यमुना एक्स्प्रेस वेवरून जातो.

जेवर विमानतळासाठी सर्व परवानग्या आणि ना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. भूसंपादन पूर्ण झाले आहे.

प्रकल्पासाठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी सवलत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी वित्तीय व्यवहारांची पूर्तता झाली आहे. विमानतळाच्या विकासासाठी बृहद् योजना (मास्टर प्लॅन) मंजूर करण्यात आली आहे आणि पुनर्वसन पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे, प्रदेशातील औद्योगिक पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. या विमानतळामुळे पर्यटनाची झपाट्याने वाढ होईल सोबतच हवाई वाहतूकही सुलभ होणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या अंतर्गत वायईआयडीए हा प्रकल्पाच्या विकासासाठी नोडल विभाग आहे.

 

 

 

G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775062) Visitor Counter : 215