माहिती आणि प्रसारण मंत्रालय
व्यंगातून पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा चित्रपट - ‘बबलू बेबीलॉन से’ चे 52 व्या इफ्फीमध्ये प्रदर्शन
पणजी, 23 नोव्हेंबर 2021
कुछ लोग आये है पेड काटने मेरे गांव में
अभी धूप है तो बैठे है उसके छांव में
(काही लोक माझ्या गावात झाड कापण्यासाठी आली आहेत. आत्ता अजून ऊन आहे, म्हणून काही वेळ त्या झाडाच्या सावलीत बसली आहेत!)
‘बबलू बेबीलॉन से’या चित्रपटाच्या माध्यमातून हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. असे मनोगत या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत सारथी यांनी आज पणजी, गोवा इथे 52 व्या इफ्फीमध्ये व्यक्त केले. इंडियन पॅनोरमाच्या नॉन -फीचर फिल्म विभागात त्यांच्या या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.
या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या प्रेरणेविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी नमूद केले की, ‘‘ आपण जर कोणत्याही एका बाजूचे नसलो आणि तटस्थपणे जे काही होतेय ते पहात उभे असलो, तरीही त्याचे परिणाम होत असतात, ही गोष्ट मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’
ते पुढे म्हणाले की, लोक संदेश घ्यायला तयार असतात, परंतु त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करावे लागते. प्रेक्षकांनी थोडा वेळ थांबून, आपण नेमके कुठे जात आहोत, याचा जरूर विचार करावा.
चित्रीकरणानंतर या चित्रपटाला अंतीम स्वरूप कसे प्राप्त झाले, याविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी सांगितले की, आपण एकूण 22 पानांची पटकथा लिहिली होती. परंतु चित्रीकरणानंतर लक्षात आले की, हा चित्रपट ‘स्लो-बर्न’ व्यंग्यात्मकरितीने आपल्याला चांगला, प्रभावीपणाने दाखवता येऊ शकतो. चित्रपटामध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, त्यांचा कथेच्या प्रवाहीपणावर कोणताही परिणाम न होता काढता आली असती. मात्र हे विराम, श्वासोच्छवासाच्या जागा मला चित्रपटामध्ये ठेवायच्या होत्या. त्यामुळे चित्रपटाचा स्वतःचा मूड तयार होऊन ती कथा प्रेक्षकांना पुढे घेऊन जाईल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये काही काळ रेंगाळला पाहिजे आणि त्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.’’
नायकाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ‘‘ चित्रपट म्हणजे एक सहयोगी प्रयत्न होता. मनोज पाहवा जी यांनी माझ्याकडून या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. इतकी वर्षे ते सिनेमा व्यवसायामध्ये काम करीत असूनही त्यांना कामाच्या तालमी करण्याची आवड आहे. चित्रीकरणाच्याआधी ते अतिशय विस्तृत टिपणे तयार करून यायचे. आमच्यासाठी ही गोष्ट म्हणजे नवीन शिकण्याचा अनुभव होता.’’
चित्रपटाबद्दल:
चित्रपटाची कथा समांतर जगात घडत आहे. बबलू हा एकटा राहत असलेला म्हातारा माणूस आहे जो ‘बेबीलॉन ’ या कंपनीसाठी काम करतो, जिच्या मालकीची सर्व झाडे आणि रोपे आहेत. जेव्हा बबलूला त्याचा मालक त्याच्या शेवटच्या कामासाठी पाठवतो, तेव्हा त्याची गाठ चुकून एका बंडखोर गटाशी पडते. हा गट 'बेबिलॉन ' विरुद्ध गुप्त मोहिमेची योजना आखत असतो.
दिग्दर्शकाबद्दल:
कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी अभिजीत सारथी यांचा दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात हातखंडा आहे. त्यांनी काही लघुपट बनवले आहेत आणि एका लघुपटासाठी सहाय्यक लेखन देखील केले आहे ज्यात पंकज त्रिपाठी यांनी अभिनय केला आहे. ऑन द रॉक्स या एकल पडदा चित्रपटगृहावरील लघुपटाचेही ते लेखक आणि दिग्दर्शक आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774290)
Visitor Counter : 304