राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी स्वच्छ अमृत महोत्सवाला संबोधित केले आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 केले प्रदान

Posted On: 20 NOV 2021 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021

भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज (20नोव्हेंबर 2021) नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात  स्वच्छ अमृत महोत्सवाला संबोधित केले आणि  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 प्रदान केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की,आपण 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करत आहोत त्यामुळे  यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे.महात्मा गांधी म्हणत असत की, "स्वच्छता ही ईश्वरभक्तीप्रमाणेच आहे" त्यांच्या मते स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. गांधीजींना अपेक्षित असलेले हे प्राधान्य भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या  माध्यमातून जनचळवळ म्हणून पुढे नेले आहे,असे राष्ट्रपती म्हणाले. देश पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ करण्याचा आपला  प्रयत्न हीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली  असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोविड महामारीच्या काळातही सफाई मित्र आणि स्वच्छता कर्मचारी सातत्याने सेवा देत होते, हे  राष्ट्रपतींनी नमूद केले.ते म्हणाले की, स्वच्छतेच्या असुरक्षित पद्धतींमुळे कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात येऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गटारे आणि सेप्टिक टाक्यांच्या यांत्रिक साफसफाईला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, 246 शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. सर्व शहरांमध्ये ही यांत्रिक साफसफाईची सुविधा वाढवण्याचा सल्ला त्यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला  दिला.हाताने मैला  साफ करणे ही लज्जास्पद प्रथा असल्याचे ते म्हणाले.या प्रथेचे उच्चाटन करणे ही केवळ सरकारचीच नाही तर समाजाची आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाले की, शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे. 1 ऑक्टोबर, 2021 रोजी, पंतप्रधानांनी 2026 पर्यंत सर्व शहरे 'कचरामुक्त' करण्याच्या उद्दिष्टासह 'स्वच्छ भारत अभियान- शहरी  2.0' सुरु केले आहे. हे स्पष्ट आहे की, कचरामुक्त शहरांसाठी घरे, रस्ते आणि परिसर कचरामुक्त ठेवणे  आवश्यक आहे.या अभियानाच्या यशस्वितेची जबाबदारी सरकारसोबतच सर्व नागरिकांची आहे, यावर त्यांनी भर दिला. प्रत्येकाने घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत  काळजी घेतली पाहिजे.

राष्ट्रपती म्हणाले की, पर्यावरण संवर्धन हा भारताच्या पारंपरिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणावर भर देत असून  यात  संसाधनांचा योग्य वापर , पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 'कचऱ्यातून संपत्ती ' या संकल्पनेतून  चांगली उदाहरणे समोर येत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले.या क्षेत्रांमध्ये उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य योजना विकसित केल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773465) Visitor Counter : 337