पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आदिवासी गौरव दिनानिमित्त पंतप्रधान 15 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशला देणार भेट


पंतप्रधान आदिवासी गौरव दिवस महासंमेलनात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचा करणार आरंभ

पंतप्रधान मध्य प्रदेशात ‘रेशन आपके ग्राम’योजनेची करणार सुरुवात

पंतप्रधान मध्य प्रदेश सिकलसेल अभियानाचा करणार प्रारंभ

पंतप्रधान देशभरातील 50 एकलव्य आदर्श निवासी शाळांची करणार पायाभरणी

Posted On: 14 NOV 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2021

भारत सरकार 15 नोव्हेंबर ही अमर शहीद भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी  गौरव दिवस म्हणून साजरी करत आहे. या प्रसंगी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भोपाळ येथील जांबुरी मैदान येथे आदिवासी  गौरव दिवस महासंमेलनात सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशला भेट देतील, तेथे ते दुपारी 1 वाजता आदिवासी  समाजासाठी  अनेक कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करतील.

आदिवासी गौरव दिवस महासंमेलनात पंतप्रधान मध्य प्रदेशात ‘रेशन आपके ग्राम’ योजनेचा आरंभ  करतील. शिधा समान घेण्यासाठी रास्त भाव दुकानात जायला लागू नये यादृष्टीने आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना दर महिन्याला त्यांच्या स्वतःच्या गावातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून शिधा सामानाचा निश्चित केलेला मासिक  हिस्सा  वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या महासंमेलनादरम्यान, मध्यप्रदेश सिकलसेल (हिमोग्लोबिनोपॅथी) अभियानाच्या  प्रारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान लाभार्थ्यांना जनुकीय समुपदेशन ओळखपत्र देखील सुपूर्द करतील. मध्य प्रदेशातील आदिवासी  समुदायामध्ये तीव्र प्रमाणात आढळणाऱ्या सिकलसेल ॲनिमिया , थॅलेसेमिया आणि इतर हिमोग्लोबिनोपॅथीने ग्रस्त रुग्णांची तपासणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी आणि या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हे अभियान  विकसित करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदीशा, त्रिपुरा आणि दादरा आणि नगर हवेली तसेच  दमण आणि दीव या  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह  देशभरातील 50 एकलव्य आदर्श  निवासी शाळांची  पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

आदिवासी  बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि  स्वातंत्र्यलढ्यातील मध्य प्रदेशातील आदिवासी  समाजातील हुतात्मा आणि शूरवीरांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. ते नवनियुक्त विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांतील (PVTG)  शिक्षकांना नियुक्ती पत्रेही सुपूर्द करतील.

या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री  डॉ. वीरेंद्र कुमार, श्री नरेंद्र सिंह तोमर,  श्री ज्योतिरादित्य एम सिंदीया, केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रल्हाद एस पटेल, श्री फग्गन सिंग कुलस्ते आणि डॉ. एल मुरुगन हे देखील उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान, पुनर्विकसित राणी कमलापती रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार असून मध्य प्रदेशातील रेल्वेच्या अनेक उपक्रमांचा ते शुभारंभ करतील.

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1771685) Visitor Counter : 262