आदिवासी विकास मंत्रालय
पंतप्रधान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहणार : अर्जुन मुंडा
Posted On:
12 NOV 2021 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान भोपाळ येथे एका विशेष कार्यक्रमात सहभागी होतील आणि रांची मधील बिरसा मुंडा संग्रहालयाचे व्हर्च्युअल लोकार्पण करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आदिवासी गौरव दिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आदिवासी गौरव दिनानिमित्त भोपाळ येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान भाग घेतील , ज्यामध्ये दोन लाखांहून अधिक आदिवासी सहभागी होणार आहेत. रांची मधील बिरसा मुंडा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचेही पंतप्रधान व्हर्चुअल लोकार्पण करतील, असे ते म्हणाले.
15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानताना मुंडा म्हणाले की यामुळे आदिवासींमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित नायक राहिलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी पहिल्यांदाच भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देताना ते म्हणाले की, आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दूर सुदूर भागांसह देशभरात साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच , या उत्सवामुळे आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी संस्कृती आणि कलेच्या संवर्धनासाठी काम करण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.



अर्जुन मुंडा म्हणाले की, 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान सर्वप्रथम नवी दिल्ली येथील संसद भवनात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि रांचीमधील बिरसा मुंडा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे व्हर्चुअल उद्घाटन करतील. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, बिरसा मुंडा यांचा कैदेत असताना जिथे मृत्यू झाला त्या रांची येथील तुरुंगात हे संग्रहालय उभारले आहे. पंतप्रधान बिरसा मुंडा आदिवासी गौरव दिवसाचे औपचारिक उद्घाटन भोपाळ येथे एका कार्यक्रमाद्वारे करतील ज्यामध्ये 2 लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत.
16 नोव्हेंबरपासून नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आयोजित केला जाईल , जो आदिवासी उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल आणि आदिवासी कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवेल.
कार्यक्रमांबद्दल अधिक तपशीलांसाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771350)
Visitor Counter : 290