नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी हवाई  वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी जीसीए  (नागरी हवाई  वाहतूक महासंचालनालयात ई-प्रशासन) केले कार्यान्वित

Posted On: 11 NOV 2021 4:23PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या 75  वर्षानिमित्त देश स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवसाजरा करत आहे.याचे औचित्य साधून   केंद्रीय नागरी हवाई  वाहतूक मंत्री  ज्योतिरादित्य एम.सिंदिया  यांनी आज  ई - जीसीए (eGCA), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए ) मधील ई-प्रशासन व्यासपीठ राष्ट्राला समर्पित केले.

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाचा अवलंब करून, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने  ई - जीसीए हे त्यांचे ई-प्रशासन व्यासपीठ कार्यान्वित केले आहे.नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रक्रिया आणि कार्यान्वयनाचे  स्वयंचलन  हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ,नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अंमलबजावणी सुरु असलेल्या 70% कार्याचा समावेश असलेल्या 99 सेवा आणि इतर टप्प्यांमध्ये 198 सेवा या प्रकल्पात समाविष्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती सिंदिया यांनी यावेळी बोलताना दिली.  कार्यान्वयन अकार्यक्षमता दूर करणे, किमान वैयक्तिक संवाद, नियामक अहवालात सुधारणा, पारदर्शकता आणि उत्पादकता वाढवणे यांसारखे महत्वपूर्ण बदल, हे एक खिडकी व्यासपीठ घडवून आणेल असे सांगतप्रतिबंधात्मक नियमन ते रचनात्मक सहकार्यापर्यंत हे अभूतपूर्व  परिवर्तन घडवून आणल्याबद्दल त्यांनीनागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची प्रशंसा केली. मंत्री म्हणाले की, आपण  नुकतीच सुरुवात केली आहे, अजून येथे प्रवास संपलेला नाही.आणि या परिवर्तनाचा ग्राहकांना कसा फायदा झाला तसेच  आणखी काय करण्याची गरज आहेहे समजून घेण्यासाठी लवकरच आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महामारीच्या काळातील संकटाचे संधीत रूपांतर करणारे आमचे उत्तरदायी सरकार आहे, असे सिंदिया म्हणाले.

हा प्रकल्प माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि सेवा वितरण आराखड्यासाठी बळकट पाया निर्माण करेल. हे ई-व्यासपीठ विविध सॉफ्टवेअर अनुप्रयोग, सर्व प्रादेशिक कार्यालयांशी कनेक्टिव्हिटी, ‘पोर्टलच्या माध्यमातून माहितीच्या प्रसारासाठी आणि सुरक्षित वातावरणात ऑनलाइन तसेच गतिमानतेने  सेवा प्रदान करण्यासह आरंभापासून अखेरपर्यंत संपूर्ण उपाययोजना उपलब्ध करून देते. हा प्रकल्प नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांची कार्यक्षमता वाढवेल आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या सर्व कार्यांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करेल. हा प्रकल्प सेवा प्रदाता म्हणून टीसीएस आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून पीडब्ल्यूएस च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

वैमानिक, विमान देखभाल अभियंता, हवाई वाहतूक नियंत्रक, हवाई वाहतूक परिचालक, विमानतळ परिचालक, हवाई प्रशिक्षण संस्था, देखभाल आणि डिझाइन संस्था इत्यादी विविध नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या हितसंबंधितांना  प्रदान केलेल्या सेवा आता ई जीसीए  वर ऑनलाइन उपलब्ध आहेत.अर्जदार आता विविध सेवांसाठी अर्ज करू शकतील आणि त्यांची कागदपत्रे ऑनलाइन सादर  करू शकतील. अर्जांवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकार्‍यांकडून प्रक्रिया केली जाईल आणि मंजूरी आणि परवाने ऑनलाइन जारी केले जातील. वैमानिक आणि विमान देखभाल अभियंत्यांना त्यांच्या कार्याची रूपरेषा पाहण्यासाठी आणि त्यांची माहिती सहजपणे अपडेट करण्यासाठी मोबाइल अॅप देखील सुरू करण्यात आले आहे.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770944) Visitor Counter : 312