उपराष्ट्रपती कार्यालय
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
शेतकऱ्यांचे गट आणि कृषी उत्पादन संघटनांना कृषी विद्यापीठांनी मदतीचा हात देत सहकार्य करावे- उपराष्ट्रपतींची सूचना
पुसा येथील डॉक्टर राजेंद्र प्रसाद केन्द्रीय कृषी विद्यापीठातील दुसऱ्या वार्षिक पदवीदान समारंभाला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित; उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन
Posted On:
07 NOV 2021 5:26PM by PIB Mumbai
ग्रामीण युवकांसाठी ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करण्याच्या हेतूने कृषी-आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये पुसा येथील पिंप्राकोटी विभागातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
कोविड-19 महामारीच्या काळात शहरांकडून गावाकडे झालेल्या विपरीत स्थलांतराच्या घटनेचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की शेती संबंधित नवोद्योगांमुळे ज्या ठिकाणी रोजगाराची गरज सर्वाधिक आहे त्या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला भरपूर फायदा होईल.
अन्न पुरवठा साखळीतील कृषीमालावरील प्रक्रिया आणि निर्यात या बाह्य बाबी व निविष्ठा तसेच विस्तार सेवा या अंतर्गत बाबी यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना प्रचंड मदत करू शकतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यामुळेच त्यांनी शेतकरी उत्पादक संस्थांना सहाय्य व क्षमताबांधणी यांच्याद्वारे प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला आणि या दिशेने प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केल्याबद्दल विद्यापीठाची प्रशंसा केली.
भारतात अन्न प्रक्रिया उद्योगात प्रचंड संधी असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी विद्यापीठांना त्यांच्या संबंधित प्रदेशातील शेतकऱ्यांना यासाठी एकत्र येण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना केली.
अगदी कमी संसाधने असलेले छोटे आणि मध्यम शेतकरी हे भारतीय कृषी क्षेत्राचे वैशिष्ट्य असल्याचे निरीक्षण नोंदवून नायडू यांनी विविध स्रोतातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याची गरज अधोरेखित केली. यासाठी संसाधनांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
सर्वांना अन्नसुरक्षा प्रदान करताना अन्न व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. "विकसित जगाने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत त्याचे भरपूर फायदे उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतानेही आपली सर्व क्षमता या दिशेने एकवटत कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी सहाय्य करायला हवे", असे प्रतिपादन नायडू यांनी केले.
उपराष्ट्रपतीनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद केन्द्रीय कृषि विद्यापीठाला तंत्रज्ञानाच्या परिणामकारक मूल्यांकनावर काम करण्याची तसेच पर्यायी कृषी तंत्रज्ञाने व त्यांची शाश्वतता याचे मूल्यांकन करण्याची सूचना केली.
आज पदवी मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उपराष्ट्रपतींनी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राचा विकास आणि वाढ यात योगदान देण्याचे आवाहन केले.
शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी विद्यापीठ घेत असलेल्या इतर प्रकारच्या पुढाकाराचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी प्रयोगशाळेत निर्माण झालेले नवीन ज्ञान हे अठरा कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून हस्तांतरीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी उपराष्ट्रपतींनी पंडित दीनदयाल उपाध्याय कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर ॲंड फॉरेस्ट्रीची प्रशासकीय इमारत, मुलींसाठी व मुलांसाठी अशी दोन वसतिगृहे, उत्कृष्ट गर्भहस्तांतरण तंत्रज्ञान आणि देशी गुरांच्या जाती संवर्धन आणि सुधारणा केंद्राचेही त्यांनी उद्घाटन केले.
बिहारचे राज्यपाल फागु चौहान, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
R.Aghor/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769876)
Visitor Counter : 276