पंतप्रधान कार्यालय

केदारनाथ इथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि राष्ट्रार्पण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 05 NOV 2021 5:42PM by PIB Mumbai

 

जय बाबा केदार ! जय बाबा केदार ! जय बाबा केदार ! दैवी तेजाने सुसज्ज अशा या कार्यक्रमात आपल्यासोबत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या पवित्र भूमीवर पोचलेले भाविक, आपल्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार !

आज सर्व मठ, सर्व 12 ज्योतिर्लिंग, अनेक शिवालये, अनेक शक्तीधाम, अनेक तीर्थक्षेत्रांवर उपस्थित देशातील मान्यवर व्यक्ती, पूज्य संतगण, पूज्य शंकराचार्यांच्या परंपरेशी संलग्न सर्व ज्येष्ठ ऋषी-मुनी आणि अनेक भाविक देखील. देशाच्या कानाकोपऱ्यात आज केदारनाथच्या या पवित्र भूमीवर या पवित्र वातावरणात केवळ शरीरच नव्हे, तर आत्मिक स्वरुपात आभासी माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने जे तिथून आशीर्वाद देत आहेत. आपण सर्व जण आदि शंकराचार्य जी यांच्या समाधीच्या पुनर्स्थापनेचे साक्षीदार बनले आहात. भारताची  ही आध्यात्मिक समृद्धी आणि व्याप्तीचे हे अत्यंत अलौकिक दृश्य आहे. आपला देश तर इतका विशाल आहे, इतकी महान ऋषी परंपरा आहे, एकाहून एक तपस्वी आजही भारताच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चैतन्य जागवत राहिले आहेत.असे अनेक संत महंत आज देशाच्या कानाकोपऱ्यात आज देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. माझ्या भाषणात मी त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करायचा ठरवला, तर कदाचित एक आठवडा देखील कमी पडेल. आणि जर काही जणांची नावे घेतली आणि एकदोन नावं अनावधानाने राहिली, तर कदाचित मी आयुष्यभर कुठल्या तरी पापाच्या ओझ्याखाली दबून जाईन. माझी इच्छा असूनही मी आताही सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करु शकत नाही, मात्र, मी त्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो. हे सगळे लोक जिथून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, तिथूनच ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद ही, आपली एक मोठी शक्ती आहे. ही पवित्र कामे करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आपल्याला शक्ती देणार आहेत, असा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्याकडे असेही म्हटले जाते, --

आवाहनम न जानामि

न जानामि विसर्जनम,

पूजाम चैव ना

जानामि क्षमस्व परमेश्वर: !

आणि म्हणूनच, मी मनापासून अशा सर्व व्यक्तींची क्षमा मागत या पवित्र कार्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जमलेले शंकराचार्य, ऋषीगण, महान संत परंपरेचे सगळे अनुयायी, मी आपल्या सर्वांना इथूनच वंदन करत आपले आशीर्वाद मागतो.

 

मित्रांनो,

आपल्या उपनिषदांमध्ये, आदि शंकराचार्य जी यांच्या रचनांमध्ये अनेक ठिकाणी 'नेति-नेतिजिथे पाहाल तिथे , नेति-नेति हे एक असे भाव विश्व, नेति नेति म्हणून एका भाव विश्वाचा विस्तार केला आहे. रामचरित मानस देखील आपण कधी पाहिले, तर त्यातही या गोष्टीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे-वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे.रामचरित मानसमध्ये देखील म्हटले गेले आहे की--

अबिगत अकथ अपार, अबिगत अकथ अपार,

नेति-नेति नित निगम कहनेति-नेति नित निगम कह

याचा अर्थ, काही अनुभव इतके अलौकिक, इतके अनंत असतात की त्यांचे वर्णन शब्दांत करणे अशक्य असते. बाबा केदारनाथ च्या पायांशी जेव्हा जेव्हा मी लीन होतो, तेव्हा इथल्या कणाकणात मी सामावलो आहे, अशी अनुभूती मला होते. इथली हवा, इथली हिमालयातील शिखरे, बाबा केदार यांचा हा सहवास, एक अशी विलक्षण अनुभूती आपल्याला देतो, ज्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. दिवाळीच्या पवित्र प्रसंगी काल मी सीमेवर आपल्या सैनिकांसोबत होतो आणि आज तर या सैनिकांच्या भूमीवर आहे. मी सणांचा आनंद माझ्या देशाच्या वीर सैनिकांसोबत साजरा केला आहे. देशवासीयांचा प्रेमाचा संदेश, देशवासीयांविषयी असलेली त्यांची श्रद्धा, देशवासियांचे आशीर्वाद, एकशे तीस कोटी आशीर्वाद घेऊन मी काल लष्कराच्या जवानांना भेटलो. आणि आज मला गोवर्धन पूजेच्या दिवशी आणि गुजरातच्या लोकांसाठी तर आज नवीन वर्ष आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी केदारनाथजींचे दर्शन-पूजन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. बाबा केदार दर्शना सोबतच मी आदि शंकराचार्यांच्या समाधी स्थानावर थोडा वेळ घालवला, तो एक दिव्य अनुभूतीचा क्षण होता. समोर बसताच असं वाटलं की आदिशंकराच्या डोळ्यातून तो तेजःपुंज प्रकाश तो प्रकाश पुंज प्रवाहित होत आहे, जो भव्य भारतात आत्मविश्वास जागृत करतो आहे. शंकरचार्यांची समाधी पुन्हा एकदा, आणि अधिक दिव्य स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर आहे. या सोबतच सरस्वतीच्या काठावर घाटाचे काम पूर्ण झाले आहे आणि मंदाकिनीवर बनलेल्या पुलाने गरूणचट्टी मार्ग देखील सोपा झाला आहे. गरूणचट्टीशी माझं तर विशेष नातं आहे, इथे एक दोन जुने लोक आहेत, जे ओळखीचे आहेत. मी आपलं दर्शन घेतलं, मला चांगलं वाटलं. साधू निघून गेले, म्हणजे जुने लोक तर आता निघून गेले आहेत. काही लोक हे स्थान सोडून गेले, तर काही लोक हे जग सोडून गेले. आता मंदाकिनीच्या काठावर पूर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे, ज्यामुळे भाविकांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होईल. तीर्थ - पुजाऱ्यांसाठी बनविण्यात आलेल्या नवीन घरांमुळे सर्व ऋतूत त्यांची सोय होईल, भगवान केदारनाथाची सेवा करणं आता अधिक सोपं होईल. आणि पूर्वी तर मी बघितलं आहे, कधी नैसर्गिक आपत्ती आली तर यात्रेकरू अडकून पडायचे. तेंव्हा या पुरोहितांच्या घरी एकाच खोलीत इतके लोक राहायचे, आणि मी बघत होतो, की आमचे हे पुरोहित बाहेर थंडीत कुडकुडत असायचे, पण त्यांच्या यजमानांची त्यांना जास्त काळजी असायची. मी हे सगळं बघितलं आहे, त्यांचा भक्तिभाव मी बघितला आहे. आता या संकटातून सुटका होणार आहे.

 

मित्रांनो,

आज येथे यात्रेकरूंसाठी सेवा आणि सुविधांशी संबंधित अनेक योजनांची पायाभरणी देखील झाली आहे. पर्यटक सुविधा केंद्र असो, यात्रेकरूंच्या आणि या भागातील लोकांच्या सोयीसाठी आधुनिक रुग्णालय असो, सर्व सोयींनी युक्त रुग्णालय असो, पावसाळी निवारा असो, या सर्व सुविधा भक्तांच्या सेवेचे मध्यम बनतील, त्यांची यात्रा आता सुकर होईल, केदारनाथ, जय भोलेच्या चरणी लीन होण्याचा एक सुखद अनुभव मिळेल.

 

मित्रांनो,

काही वर्षांपूर्वी येथे विध्वंस झाला होता, जे नुकसान झालं, ते अकल्पनीय होतं. मी मुख्यमंत्री तर गुजरातचा होतो, पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी तडक येथे निघून आलो होतो. मी स्वतःच्या डोळ्यानी ते तांडव बघितलं होतं, ते दुःख बघितलं होतं. जे लोक येथे येत असत, ते विचार करत की आता आमचं केदारधाम, ही केदारपूरी पुन्हा उभी राहू शकेल का? मात्र माझं अंतर्मन मला सांगत होतं, की हे पूर्वीपेक्षाही भव्य दिव्य असं उभं राहील. आणि माझा हा विश्वास बाबा केदारमुळे होता. आदिशंकराच्या साधनेमुळे होता. ऋषी - मुनींच्या तपस्येमुळे होता. मात्र त्यासोबतच कच्छच्या भूकंपानंतर कच्छ पुन्हा उभं करण्याचा अनुभव देखील माझ्याकडे होता, आणि म्हणूनच मला विश्वास होता आणि आज तो विश्वास साकार होताना मी बघतो आहे, जीवनात याहून मोठं समाधान ते काय असू शकतं. हे मी माझं भाग्य समजतो की बाबा केदारने, संतांच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या या धारतीने, ज्या मातीने, ज्याच्या हवेने कधी माझे पालनपोषण केले, तिची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाले, आयुष्यात यापेक्षा मोठे पुण्य ते काय असेल. या आदि भूमीत शाश्वता सोबतच आधुनिकतेचा हा मिलाफ, विकासाची ही कामं, भगवान शंकराची कृपा आहेत. ईश्वर याचं श्रेय घेऊ शकत नाही. माणूस श्रेय घेऊ शकतो. पण याचं सगळं श्रेय ईश्वर कृपेलाच आहे. या पुण्यवान प्रयत्नांसाठी मी उत्तराखंड सरकारचे, आमचे उर्जावान, तरुण मुख्यमंत्री धमीजींचे, आणि या कामांची जबाबदारी घेणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे स्वप्न पूर्ण केले. बर्फवृष्टी होत असताना, येथे वर्षभर काम करणे कठीण आहे, येथे खूप कमी वेळ मिळतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र या बर्फवृष्टीत आमचे श्रमिक बंधू भगिनी जे इथले नव्हते, बाहेरून आले होते, त्यांनी हे ईश्वराचे कार्य समजून, बर्फवृष्टीत उणे तापमानात देखील काम सोडून गेले नाहीत, काम करत राहिले. तेव्हा कुठे हे काम होऊ शकलं. माझं मन इथेच असायचं. तेव्हा मी ड्रोनद्वारे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माझ्या कार्यालयातून या भागाचा एकप्रकारे आभासी दौरा करत होतो. सर्व कामावर लक्ष ठेवून होतो. काम किती झालं, एक महिन्यापूर्वी कुठे होतं. या महिन्यात किती प्रगती झाली, हे सारखं बघत होतो. मी केदारनाथ मंदिराचे रावल आणि सर्व पुजाऱ्यांचे विशेष आभार मानतो. कारण त्यांच्या सकारात्मक भाव आणि सकारात्मक प्रयत्नांमुळे आणि या मार्गदर्शक परंपरांमुळे आपण जुना वारसा वाचवू शकलो आणि आधुनिकता देखील आणू शकलो आहोत. आणि यासाठी मी या पुजाऱ्यांचा, रावल कुटुंबांचा मनापासून आभारी आहे.

आदि शंकराचार्य जी यांच्याबाबत आमच्या विद्वानांनी म्हटले आहे, शंकराचार्य जी यांच्याबाबत प्रत्येक विद्वानांनी हे म्हटलेच आहे. ते म्हणतात-

शंकरो शंकरः साक्षात्

म्हणजेच, आचार्य शंकर साक्षात भगवान शंकराचेच स्वरूप होते. त्यांचा हा महिमा, हे देवत्व आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण अनुभवू शकता. त्यांच्या जीवनाकडे जरा नजर टाकली तर त्यांच्या सगळ्या स्मृति आपल्या मनात जाग्या होतात. अगदी लहान वयात , बालक असतांनाही अद्भुत ज्ञान असलेला बालक.लहान वयातच शास्त्र, ज्ञान-विज्ञानाचे अध्ययन आणि चिंतन! आणि ज्या वयात साधारण मानव, सर्वसामान्यपणे संसारातल्या गोष्टी थोड्याफार समजून घ्यायला सुरुवात करतो, त्याला थोडीफार समज येऊ लागते त्या वयात शंकराचार्यानी वेदांताचे गूढ ज्ञान, सांगोपांग चर्चा, त्याची व्याख्या, स्पष्टीकरण सातत्याने करत असत. इतकी अद्भुत प्रतिभा शंकराचार्याच्या आत साक्षात शिवशंकराचं अस्तित्व असल्याशिवाय इतर काही असूच शकत नाही. ही शंकराचीच कृपा होती.

 

मित्रांनो,

इथे संस्कृत आणि वेदांचे मोठमोठे पंडित देखील बसले आहेत तर काही आभासी माध्यमातून आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शंकर शब्दाचा संस्कृत भाषेत खूपच सोपा अर्थ आहे -

शं करोति सः शंकरः

म्हणजे जो कल्याण करतो, तोच शंकर आहे. या कल्याणाविषयी देखील शंकराचार्यांच्या आयुष्यात आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण दिसते. त्यांचे संपूर्ण आयुष्य असामान्य होते, आणि तेवढेच ते लोककल्याणासाठी देखील समर्पित होते. भारत आणि विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी अखंड आपल्या चैतन्यशक्तीला समर्पित केले होते. ज्या काळात भारत, राग-द्वेषाच्या भोवऱ्यात अडकून आपले ऐक्य गमावत चालला होता, त्या काळात-म्हणजे विचार करा, संत किती दूरचा विचार करतात- त्यावेळी शंकराचार्य म्हणाले होते-

न मे द्वेष रागौ, न मे लोभ मोहौ, मदो नैव, मे नैव, मात्सर्य भावः

म्हणजेच-- राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्षा, अहंकार हा सगळा आपला स्वभाव नाही. जेव्हा भारताला जाती-पंथाच्या सीमांबाहेर जाण्याची, शंका-कुशंकांच्या वर जाण्याची मानवजातीला गरज असते, त्यावेळी त्यांनी समाजात चेतना आणली. त्यावेळी आदिशंकराचार्य म्हणाले होते--

न मे मृत्यु-शंका, न मे जातिभेदः

म्हणजेच, नाश-विनाशाच्या शंका, जातीपातीचे भेद यांना आपल्या परंपरेत काहीही स्थान नाही. ते आपल्या परंपरांचा भाग नाही. आपण कोण आहोत, आपले दर्शन, विचार काय आहेत, हे सांगण्यासाठी आदि शंकराचार्य म्हणाले होते,

चिदानन्द रूपः शिवोऽहम् शिवोऽहम

म्हणजेच, आनंद-स्वरूप शिव देखील आपणच आहोत. जीवत्वातच, शिवत्वही आहे. आणि त्यांनी मांडलेला अद्वैताचा सिद्धांत- कधी कधी अद्वैताचा सिद्धांत समजून घेण्यासाठी मोठमोठ्या ग्रंथांची गरज पडते. मी तर इतका विद्वान नाही. मी तर सरळ साध्या शब्दांत आपलं म्हणणं मांडत असतो. आणि मला इतकेच समजते की जिथे द्वैत नाही, तिथे अद्वैत आहे. शंकराचार्य जी यांनी भारताच्या चेतनाशक्तीत पुन्हा प्राण फुंकले.आणि आपल्याला आपल्या आर्थिक-पारमार्थिक उन्नतीचा मंत्र सांगितला. त्यांनी म्हटले - ज्ञान विहीनः

बघा ज्ञानाच्या उपासनेचे किती महत्त्व आहे.

ज्ञान विहीनः सर्व मतेन्, मुक्तिम् न भजति जन्म शतेन

म्हणजेच, दुःख, कष्ट आणि संकटांच्या काळात आपल्या मुक्तीचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे ज्ञान. भारताकडे ज्ञान-विज्ञान आणि दर्शनशास्त्राची जी कालातीत परंपरा आहे, ती आदि शंकराचार्यानी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली, त्यात चैतन्यशक्ती आणली.

 

मित्रांनो,

एक काळ असा होता जेव्हा आध्यात्माला, धर्माला केवळ रूढी प्रथांशी जोडून काही चुकीच्या मर्यादा आणि कल्पनांशी जोडून त्याकडे दूषित दृष्टीने बघितले जाऊ लागले. मात्र, भारतीय दर्शन तर मानव कल्याणाचा विचार करणारे,त्याची चर्चा करणारे शास्त्र आहे. आयुष्याला पूर्णत्व देण्यासोबतच, सर्वसमावेशक दृष्टिकोन, सर्वसमावेशक पद्धतीने बघणारे हे तत्वज्ञान आहे.

आदि शंकराचार्य जी यांनी समाजाला या सत्याचा परिचय करुन देण्याचे काम केले आहे. त्यांनी पवित्र मठांची स्थापना केली, चार धामांची स्थापना केली. द्वादश ज्योतिर्लिंग पुनरजागृत केली. त्यांनी सर्वसंगपरित्याग करून देश, समाज आणि मानवतेसाठी आयुष्य वेचणाऱ्यांची सशक्त परंपरा उभी केली. आज हे अधिष्ठान भारत आणि भारतीयतेला एक प्रकारे मजबूत ओळख देत आहे. आमच्यासाठी धर्म काय आहे, धर्म आणि ज्ञान यांचा संबंध काय आहे, आणि म्हणूनच म्हटलं गेलं आहे  अथातो ब्रह्म जिज्ञासा’, हा मंत्र देणारी उपनिषद परंपरा काय आहे जी आम्हाला पावलोपावली प्रश्न विचारायला शिकवते, आणि कधी तो बाल नचिकेत यमाच्या दरबारात जाऊन यमाच्या नजरेला नजर भिडवून विचारतो, यमाला विचारतो, मृत्यू म्हणजे काय? आता सांगा, प्रश्न विचारणे ज्ञान संपादन करणे,  ‘अथातो ब्रह्म जिज्ञासाभव: आपला हा वारसा आपल्या मठांत हजारो वर्षांपासून जिवंत ठेवला आहे, त्याला पुढे नेत आहेत. संस्कृत असो, संस्कृत भाषेत वैदिक गणितासारखे विज्ञान असो, या मठांत आपल्या शंकरचार्यांची परंपरा या सर्वांचे रक्षण करत आहे, पिढ्यानपिढ्या दिशा दाखवण्याचं काम करत आहे. मला वाटतं, आजच्या या काळात आदि शंकराचार्यांचे सिद्धांत, अधिकच प्रासंगिक झाले आहेत.

 

मित्रांनो,

आपल्याकडे अनेक युगांपासून चारधाम यात्रेचे महत्व आहे. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करणे, शक्तिपीठांचे दर्शन करणे, अष्टविनायकाची यात्रा करून दर्शन घेणे, अशा सर्व तीर्थयात्रा करण्याची परंपरा आहे. असे तीर्थाटन आपल्याकडे आयुष्यातल्या विविध कार्यांपैकीच एक भाग मानला गेला आहे. अशी तीर्थयात्रा करणे म्हणजे काही आपल्यासाठी हिंडणे-फिरणे किंवा फक्त पर्यटन नाही. तर भारताला जोडणारी, भारताचे प्रत्यक्ष दर्शन देणारी जिवंत परंपरा आहे. आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला, मग ती कोणीही व्यक्ती असो, त्याची इच्छा असते की, या आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा चारधाम यात्रा जरूर करावी, बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करावे. पवित्र गंगेमध्ये एकदा तरी स्नान जरूर करावे. आधी आपण घरातल्या मुलांनाही पहिल्यापासूनच हे शिकवत होतो, परंपरा होती, मुलांना घरामध्ये शिकवले जात होते - ‘‘ सौराष्ट्र सोमनाथच् श्रीशैल मल्लिकार्जुनम्.....’’ मुलाना  लहानपणीच बारा ज्योतिर्लिंगाची नावे असलेला मंत्र शिकवला जात होता. त्यामुळे घरामध्ये बसूनच बृहत भारताची एका विशाल भारताची यात्रा प्रतिदिनी घडवली जात होती. लहानपणापासूनच देशाच्या या वेगवेगळ्या भागांविषयी आपलेपणाचा भाव निर्माण करण्याचा हा सहज संस्कार केला जात होता. ही आस्था, असे विचार पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यत भारताला एका जीवित संस्थेमध्ये परिवर्तित करते. राष्ट्रीय एकता वृद्धिंगत करते, एक भारत- श्रेष्ठ भारताचे भव्य दर्शन सहज जीवनाचा भाग होते. बाबा केदारनाथाचे दर्शन करून प्रत्येक भाविक एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा घेवून जातो.

 

मित्रांनो,

आदि शंकराचार्य यांचा वारसा, त्यांचे चिंतन आज देशासाठी एक प्रेरणा स्वरूप म्हणून पाहतो आहे. आता आपल्या सांस्कृतिक वारशाला, आस्थेच्या केंद्रांना जसे पाहिले पाहिजे, त्याच गौरवाच्या भावनेने पाहिले जात आहे. आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर संपूर्ण गौरवाभिमानाने बांधले जात आहे. अयोध्या नगरीला तिचा गौरव अनेक दशकांनंतर, पुन्हा प्राप्त होत आहे. अलिकडेच अगदी दोन दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले होते, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारताचे प्राचीन सांस्कृतिक स्वरूप कसे असेल, याची आज आपण कल्पना करू शकतो. याचप्रमाणे उत्तर प्रदेशातल्याच काशीचाही कायाकल्प होत आहे. विश्वनाथ धामाचे कार्य वेगाने सुरू असून ते पूर्णतेच्या मार्गाने पुढे जात आहे. बनारसमध्ये सारनाथजवळ कशीनगर, बोधगया अशा सर्व ठिकाणी एक बुद्ध परिपथ तयार होत आहे. संपूर्ण जगातल्या बुद्ध भक्तांना, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे काम अतिशय वेगाने सुरू आहे. भगवान रामाशी संबंधित जितकी तीर्थस्थाने आहेत, त्यांना जोडून एक पूर्ण परिपथ तयार करण्याचे कामही सुरू आहे. मथुरा, वृंदावन येथेही विकास कामांबरोबरच तिथे शुचिता, पवित्रता यांच्याविषयी सर्वांना आधुनिकतेकडे वळविण्यात येत आहे. संत मंडळींच्या भावनांचा विचार हे करताना केला जात आहे. इतकी सगळी कामे आज यामुळे होत आहेत, याचे कारण म्हणजे- आजच्या भारताकडे आदि शंकराचार्यांसारख्या आपल्या महान मनीषींनी केलेल्या मार्गदर्शनाविषयी श्रद्धा बाळगून आहे. त्यांच्याविषयी गौरवाची भावना मनात बाळगून भारत पुढचा मार्ग धरत आहे.

 

मित्रांनो,

सध्या आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करीत आहे. देश आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुनर्निर्माणासाठी नवीन संकल्प करीत आहे. अमृत महोत्सवाच्या या संकल्पांमध्ये आदि शंकराचार्य जी यांच्याकडे एक खूप मोठी प्रेरणा म्हणून आम्ही पाहतो आहे.

ज्यावेळी देश आपले मोठे लक्ष्य निश्चित करतो, कठीण काळ आणि फक्त काळच नाही तर कालमर्यादाही निश्चित केली जाते. अशावेळी काही लोक म्हणतात की, इतक्या कमी कालावधीमध्ये हे काम कसे काय होणार? होईल की नाही होणार? आणि त्यावेळी मला माझ्या मनातला एक आवाज ऐकू येतो. आणि माझ्या मुखाव्दारे तेच शब्द बाहेर पडतात. एकच गोष्ट मी सांगत असतो, ती म्हणजेकालमर्यादेच्या बंधनात अडकून घाबरून जाणे आता भारताला अजिबात मंजूर नाही. तुम्ही पहा, आदि शंकराचार्य जी यांना अतिशय कमी आयुष्य मिळाले. त्या अल्पायुष्यात त्यांनी घरदार सोडून संन्यासी आयुष्य पत्करले. कुठे केरळातले कलाडी आणि कुठे केदार, कुठून ते कुठपर्यंत त्यांनी प्रवास केला. संन्यासी बनून अतिशय अल्प आयुष्यात त्यांनी या पवित्रभूमीमध्ये त्यांचे शरीर विलीन झाले. त्यांनी इतक्या कमी कालावधीमध्ये भारताच्या भूगोलामध्ये चैतन्य निर्माण केले. भारताचे नवीन भविष्य निर्माण केले. त्यांनी जे चैतन्य निर्माण केले, ऊर्जेची ज्योत प्रज्वलित केली, ती आजही भारताना गतिमान बनविणारी आहे. येणा-या हजारो वर्षांपर्यंत ही ज्योत भारताला गतिमान ठेवेल. याचप्रमाणे स्वामी विवेकानंद जी यांच्या कार्याकडे पहावे. स्वातंत्र्य संग्रामामधल्या अनेकानेक सेनानींकडे पहावे, असे कितीतरी महान आत्मा, महान विभूती या भूमीवर प्रकट झाल्या आहेत. त्यांनी काळाच्या सीमा ओलांडून अतिशय अल्पकाळामध्ये अनेक युगांची निर्मिती केली. हा भारत या महान विभूतींच्या प्रेरणेमुळे चालतो. आपण शाश्वताचा एकप्रकारे स्वीकार करून, आपण क्रियाशीलतेवर विश्वास ठेवतो. या आत्मविश्वासामुळे देश आज या अमृतकाळाच्या दिशेने पुढे जात आहे. आणि अशा वेळी, मी देशवासियांना आणखी एक आग्रह करू इच्छितो. स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित ऐतिहासिक स्थानांना पाहण्याबरोबरच, अशा पवित्र स्थानीही जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करावा. नवीन पिढीतल्या मुलांना बरोबर घेवून जावे, त्यांना त्या स्थानांचा परिचय करून द्यावा. भारत मातेचा साक्षात्कार करून द्यावा.  हजारो वर्षांच्या या महान परंपरेतल्या चैतन्याची अनुभूती त्यांना द्यावी. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये स्वतंत्रतेचाही हा एक महोत्सव होवू शकतो. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये भारताच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये अगदी कणा-कणामध्ये शंकराचा भाव जागृत होवू शकतो. आणि म्हणूनच घराबाहेर पडण्याचा हा काळ आहे. ज्यांनी गुलामीच्या शेकडो वर्षांच्या काळामध्ये आपल्या श्रद्धांना एकत्र ठेवण्याचे काम केले. आपल्या आस्थांवर एकही ओरखडा उठणार नाही, याची काळजी घेतली.  त्या गुलामीच्या काळात केलेली ही काही लहान म्हणावी, अशी सेवा नव्हती. स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये या महान सेवेचे पूजन करणे, या सेवेला तर्पण करणे, तिथे जावून तप करणे, तिथे साधना करणे, हे हिंदुस्तानच्या नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की, एक नागरिक म्हणून आपण या पवित्र स्थानांचेही दर्शन केले पाहिजे, या स्थानांचा महिमा जाणून घेतला पाहिजे.

 

मित्रांनो,

देवभूमीविषयी निस्सीम श्रद्धा बाळगून, इथल्या अमर्याद शक्यतांवर विश्वास ठेवून आज उत्तराखंडचे सरकार, इथल्या विकास कामाचा महायज्ञ करीत आहे. संपूर्ण ताकदीनिशी हे सरकार कार्यरत आहे. चारधाम मार्ग परियोजनेचे वेगाने काम सुरू आहे. चारही धाम महामार्गाला जोडले जात आहेत. भविष्यामध्ये इथे केदारनाथपर्यंत यात्रेकरू केबल कारने येऊ शकतील, यासाठी आवश्यक कामे सुरू केली आहेत. इथे जवळच पवित्र हेमकुंड साहिब जी सुद्धा आहे. हेमकुंड साहिब जींचे दर्शन आता सुकर व्हावे, यासाठी तिथेही रोपवे बनविण्याची तयारी आहे. याशिवाय ऋषिकेश आणि कर्णप्रयाग यांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आत्ताच मुख्यमंत्री सांगत होते, डोंगराळ भागातल्या लोकांना रेल्वे पाहण्याचा योगही दुर्मिळ असतो. आता इथे रेल्वे पोहोचत आहे. दिल्ली ते डेहराडून महामार्ग बनविल्यानंतर डेहराडूनवरून दिल्लीला येण्यासाठी लागणारा वेळ आता खूपच कमी होणार आहे. या सर्व कामांचा उत्तराखंडला, उत्तराखंडच्या पर्यटनाला खूप मोठा फायदा होईल. आणि माझे शब्द उत्तराखंडच्या लोकांनी अगदी लिहून ठेवावेत. ज्या वेगाने पायाभूत सुविधा बनविल्या जात आहेत, त्यामुळे गेल्या शंभर वर्षात जितके यात्रेकरू उत्तराखंडला येवून गेले आहेत. त्यापेक्षा जास्त संख्येने आगामी दहा वर्षात यात्रेकरू इथे येतील. तुम्ही कल्पना करू शकता की, अर्थव्यवस्थेला यामुळे किती प्रचंड शक्ती मिळू शकणार आहे. 21 व्या  शतकातले हे तिसरे दशक म्हणजे उत्तराखंडचे दशक असणार आहे, हे माझे शब्द तुम्ही लिहून ठेवावेत. हे मी या पवित्र भूमीवरून बोलत आहे.  अलिकडेच काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पाहिले की, त्या पद्धतीने चारधाम यात्रेला येणा-या यात्रेकरूंची संख्या सातत्याने नवे विक्रम नोंदवीत आहे. आणि ही कोविड महामारी आली नसती तर  यात्रेकरूंची संख्या कुठपर्यंत गेली असती कोणाला माहिती? उत्तराखंडमध्ये मला आणखी एका गोष्टीचा खूप आनंद होतो. विशेष करून माझ्या माता-भगिनी आणि पर्वतीय क्षेत्रातल्या माता-भगिनींच्या ताकदीमध्ये एक वेगळेच सामर्थ्य असते. ज्याप्रकारे उत्तराखंडातल्या लहान-लहान स्थानी निसर्गाच्या सानिध्यामध्ये होम-स्टेचे जाळे तयार होत आहे. असे शेकडो होम-स्टे इथे बनविले जात आहेत. आणि माता- भगिनी आणि जे यात्रेकरूही येतात, ते अशा प्रकारचे होम स्टे पसंत करीत आहेत. यामुळे रोजगारही मिळणार आहे. स्वाभिमानाने जगण्याची संधीही मिळणार आहे.

इथले सरकार ज्या पद्धतीने विकास कार्य करीत आहे, त्याचा आणखी एक लाभ झाला आहे. वास्तविक नेहमी असे म्हणतात की, डोंगरावरचे पाणी, आणि डोंगरावर राहणारा तरूण डोंगराच्या कधीच कामी येत नाही. मी हे म्हणणे बदलून टाकायचे ठरवले आहे. आता डोंगरावरचे पाणी आणि डोंगरमाथ्यावर राहणारे तरूणही डोंगराच्या कामी येतील. कारण इथून होणारे युवकांचे स्थलांतर रोखण्यात येणार आहे. एकापाठोपाठ येथून नवयुवक स्थलांतर करतात, ते होवू नये, म्हणून इथेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार आहेत. चला तर मित्रांनो, माझ्या नवयुवक मित्रांनो, हे दशक तुमचे आहे. उत्तराखंडचे आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याचे हे दशक आहे. बाबा केदारनाथाचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे.

ही देवभूमी मातृभूमीचे संरक्षण करणा-या अनेक वीर पुत्रांना, कन्यांना जन्म देणारे स्थान आहे.  पराक्रमाची गाथा सांगता येणार नाही, पराक्रम घडला नाही, असे इथे एकही घर नाही किंवा गाव नाही. आज देश ज्या पद्धतीने आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करीत आहे, संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवित आहे, त्यामुळे आपल्या वीर सैनिकांची ताकद अधिक वाढत आहे. आज त्यांच्या आवश्यकतांचा विचार करून, त्यांच्या अपेक्षांचा विचार करून, त्यांच्या परिवाराच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम केले जात आहे. आमच्या सरकारने वन रँक वन पेंशनयोजनेची चार दशकांपूर्वीची म्हणजे मागच्या शतकापासूनची मागणी या शतकामध्ये पूर्ण केली. मला आनंद वाटतो की, माझ्या देशाच्या लष्करातल्या सैनिकांसाठी मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचा लाभ उत्तराखंडच्या जवळपास हजारो परिवारांना मिळाला आहे.

 

मित्रांनो,

उत्तराखंडने कोरोनाच्या विरोधात ज्या पद्धतीने शिस्तबद्ध लढा दिला, तोही खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. भौगोलिक समस्यांना पार करून आज उत्तराखंडच्या लोकांनी लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे शंभर टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. ही उत्तराखंडची ताकद आहे. यावरून उत्तराखंडचे सामर्थ्य दिसून येते. जे लोक पर्वतीय भागाशी परिचित  आहेत, त्यांना नक्कीच हे काम इतके सोपे नाही, हे लक्षात येईल. तासन् तास डोंगराची चढण चढून डोंगरमाथ्यावर जावून दोन अथवा पाच परिवारांचे लसीकरण करायचे आणि नंतर रात्रभर चालत येवून घरी पोहोचावे लागत होते. यासाठी किती कष्ट पडतात, याचा मला अंदाज आहे. इतके कष्ट असतानाही उत्तराखंडने हे काम पूर्ण केले आहे. कारण उत्तराखंडच्या एका-एका नागरिकाचे जीवन वाचवले पाहिजे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री जी मी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.

मला विश्वास आहे की, जितक्या उंचीवर उत्तराखंड वसला आहे. त्याच्याही पेक्षा जास्त उंचावर विकासकामांमध्ये माझा उत्तराखंड  जावून विक्रम नोंदवणार आहे. बाबा केदारनाथाच्या भूमीवरून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने देशाच्या काना-कोप-यातल्या संत-महंताच्या, ऋषिमुनींच्या, आचार्यांच्या आशीर्वादाने आज या पवित्र भूमीवर अनेक संकल्प करून आपण पुढे जात आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये देशाला नवीन उंचीवर पोहोचवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. दिवाळीनंतर एका नवा उत्साह, एक वेगळा प्रकाश, नवीन चैतन्य आपल्या सर्वांना काही तरी नवीन करण्याची ताकद देईल.

मी पुन्हा एकदा भगवान केदारनाथाच्या चरणी, आदि शंकराचार्यांच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा दिवाळीच्या या सणापासून सुरू झालेल्या आणि छठ पूजेपर्यंतच्या महापर्वानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर सर्वांनी प्रेमाने म्हणावे, भक्तीने म्हणावे, अगदी मनापासून श्रद्धेने म्हणावे-

जय केदार !

जय केदार !

जय केदार !

धन्यवाद!!

***

S.Patil/R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769729) Visitor Counter : 281