अल्पसंख्यांक मंत्रालय

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज 2022 ची केली घोषणा


हज 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे

भारतीय हज यात्रेकरू "वोकल फॉर लोकल" चा प्रचार करतील , भारतातून हज यात्रेला रवाना होण्याच्या ठिकाणी स्वदेशी वस्तू वितरित केल्या जाणार

संपूर्ण कोविड -19 लसीकरण निकषाच्या आधारे  हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया

सर्व हज यात्रेकरूंसाठी “ई-मसिहा” डिजिटल आरोग्य कार्ड : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 01 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai


 

हज 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 1 नोव्हेंबरपासून सुरू होत  आहे . केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत हज हाऊस  येथे ही घोषणा केली.  महत्त्वपूर्ण सुधारणा आणि वाढीव  सुविधांसह हज 2022 चे आयोजन केले जात आहे.

यात्रेची घोषणा करताना नक्वी म्हणाले, "संपूर्ण हज प्रक्रिया 100 टक्के ऑनलाइन असेल.हजसाठी ऑनलाइन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज "हज मोबाईल अॅप" द्वारे लोकांना अर्ज करता येतील. हज 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.   "हज ऍप इन युवर हँड या टॅगलाइनसह  हज मोबाईल ऍप अद्ययावत  करण्यात आले आहे. अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत ज्यात वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्यासाठी माहिती, अर्जदारांना अतिशय सोप्या पद्धतीने अर्ज भरण्याची माहिती देणारे व्हिडिओ  यांचा यात समावेश आहे. "

"वोकल फॉर लोकल"

यावेळी भारतीय हज यात्रेकरू "वोकल फॉर लोकल" चा प्रचार करतील आणि हज यात्रेकरू स्वदेशी उत्पादने घेऊन हजला जातील. यापूर्वी हज यात्रेकरूना  सौदी अरेबियात चादरी-उशा-टॉवेल, छत्री आणि इतर वस्तू विदेशी चलनात खरेदी कराव्या लागत होत्या. यावेळी, यातील बहुतांश स्वदेशी वस्तू भारतीय चलनात भारतात खरेदी केल्या जातील. सौदी अरेबियाच्या तुलनेत या वस्तू भारतात सुमारे 50 टक्के कमी किमतीत उपलब्ध असतील, तसेच त्यामुळे  स्वदेशी आणि वोकल फॉर लोकल ला देखील प्रोत्साहन मिळेल.  या सर्व वस्तू हज यात्रेकरूंना भारतातून यात्रेला रवाना होण्याच्या ठिकाणी  दिल्या जातील.

नक्वी  म्हणाले की, अनेक दशकांपासून हज यात्रेकरू या सर्व वस्तू सौदी अरेबियात परदेशी चलनात खरेदी करत असत. विशेष म्हणजे यातील बहुतांश वस्तू मेड इन इंडियाहोत्या, ज्या विविध कंपन्या भारतातून विकत घ्यायच्या आणि हज यात्रेकरूंना सौदी अरेबियामध्ये दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकायच्या.

एका अंदाजानुसार या व्यवस्थेमुळे भारतीय हज यात्रेकरूंच्या  कोट्यवधी रुपयांची बचत होईल. भारतातून  दरवर्षी 2  लाख हज यात्रेकरू जातात.

संपूर्ण कोविड -19 लसीकरण निकषाच्या आधारे  हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया

नक्वी म्हणाले की, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया लसींच्या दोन्ही मात्रांसह पूर्ण लसीकरण तसेच भारत आणि सौदी अरेबिया सरकारद्वारे ठरवण्यात येणारी मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष आणि हज 2022 च्या वेळचे कोविड-19 प्रोटोकॉल लक्षात घेऊन केली जाईल.

संपूर्ण हज 2022 प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे आणि महामारीच्या आव्हानांचा विचार करून अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियामधील भारतीय दूतावास आणि जेद्दामधील भारताचे कौन्सुल जनरल आणि इतर संस्थांमधील चर्चेनंतर तयार करण्यात आली  आहे.

 

हज 2022 साठी रवाना होण्याची 10 ठिकाणे

  1. हज 2022 साठी निघण्याची  ठिकाणे 21 वरून 10 करण्यात आली  आहेत. हज 2022 साठी, 10 प्रवास ठिकाणे - दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरूलखनौ, कोचीन, गुवाहाटी आणि श्रीनगर.
  2. दिल्ली या ठिकाणी दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या  पश्चिमी जिल्ह्यांमधील यात्रेकरू जमतील.
  3. मुंबईत महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली इथले यात्रेकरू असतील.
  4. कोलकातामध्ये प. बंगाल, ओदिशा, त्रिपुरा, झारखंड आणि बिहार इथले यात्रेकरू असतील.
  5. अहमदाबादमध्ये संपूर्ण गुजरातमधील यात्रेकरू जमतील.
  6. बंगळुरू मध्ये  संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील यात्रेकरू येतील.
  7. हैद्राबादमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील यात्रेकरू असतील.
  8. लखनौमध्ये उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग वगळता संपूर्ण प्रदेश
  9. कोचीन मध्ये केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार मधील यात्रेकरू असतील.
  10. गुवाहाटीमध्ये आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालॅंड  मधील यात्रेकरू
  11. श्रीनगरमध्ये जम्मू -काश्मीर , लेह-लडाख-कारगिल मधील यात्रेकरू

 

सर्व यात्रेकरूंसाठी ई-मसिहा

नक्वी म्हणाले की डिजिटल आरोग्य  कार्ड - ई-मसिहा , आरोग्य सुविधा आणि ई-लगेज प्री-टॅगिंग, मक्का-मदीनामधील निवास/वाहतूक यासंबंधी सर्व माहिती सर्व हज यात्रेकरूंना पुरवली जाईल.

नक्वी म्हणाले की, 3000 हून अधिक महिलांनी मेहरम (पुरुष सोबती) विना श्रेणी अंतर्गत   2020 आणि 2021 हजसाठी  अर्ज केले होते. जर त्यांना हज 2022 ला जायचे असेल तर त्यांचे अर्ज देखील हज 2022 साठी पात्र असतील. इतर महिला देखील "मेहरम" शिवाय अंतर्गत हज 2022 साठी अर्ज करू शकतात. "मेहरम" नको असलेल्या सर्व महिलांना लॉटरी प्रणालीतून सूट दिली जाईल.

 

मुंबईतील सौदी अरेबियाचे रॉयल व्हाईस कॉन्सुल जनरल  मोहम्मद अब्दुल करीम अल-एनाझी, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव  निगार फातिमाभारतीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकूब शेख आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

हज मोबाईल ऍप्प : https://play.google.com/store/apps/details?id=com.hajapp.hcoi  यावरून डाऊनलोड करता येईल.

सौदी अरेबिया सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या हज संबंधित सेवा यावर पाहता येतील- : https://www.haj.gov.sa/en/InternalPages/Details/10234

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768508) Visitor Counter : 348