उपराष्ट्रपती कार्यालय

विषयांच्या कठोर पृथक्करणाचे युग संपले: उच्च शिक्षणात बहुशाखीय दृष्टीकोन स्वीकारा– उपराष्ट्रपती


विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांबरोबरच मानवतेलाही समान महत्त्व देण्याच्या गरजेवर दिला भर

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या जास्त असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी गोव्याचे केले कौतुक; इतर राज्यांसाठी हे प्रेरणादायी ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली

गोव्यात संत सोहिरोबनाथ आंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे केले उद्‌घाटन

Posted On: 28 OCT 2021 5:08PM by PIB Mumbai

गोवा,  28 ऑक्टोबर 2021 

विषयांच्या कठोर पृथक्करणाचे युग संपल्याचे सांगत चांगल्या व्यक्ती आणि उत्तम संशोधन घडण्यासाठी उच्च शिक्षणात बहुशाखीय दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये मानव्य विद्या शाखानांही समान महत्त्व देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

पेडणे , गोवा येथे संत सोहिरोबनाथ अंबिया शासकीय  कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन उपराष्ट्रपतीच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कला आणि सामाजिक विज्ञानाचे शिक्षण सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार करायला तसेच विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते असे ते म्हणाले .

केवळ विज्ञानातच नव्हे तर सामाजिक विज्ञान, भाषा आणि वाणिज्य आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातही जागतिक दर्जाचे संशोधक निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. तसेच  गोवा सरकारच्या अनेक संस्थांमध्ये वाणिज्य आणि आर्थिक प्रयोगशाळा आणि भाषा प्रयोगशाळा स्थापन केल्याबद्दल नायडू यांनी गोवा सरकारची प्रशंसा केली.

भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या आपल्या प्रयत्नात वाणिज्य  महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे नमूद करत  ई-कॉमर्सच्या उदयानंतर या विषयात वेगाने होत असलेल्या बदलांकडे  उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले. "

भारताचा गौरवशाली भूतकाळ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा तरुण पिढीला शिकवण्याची गरज व्यक्त करून उपराष्ट्रपतींनी वसाहतवादी  मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण करण्याची गरज अधोरेखित  केली. ते म्हणाले की आपण जगातील कुठल्याही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि स्वीकारल्या पाहिजेत, मात्र  त्याच वेळी भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर ठाम विश्वास देखील असायला हवा.  गोवा मुक्ती संग्राम आणि त्यासाठी अनेक महापुरुष आणि महिलांनी केलेले बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

गोवा राज्याच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाचे  कौतुक करून, नायडू यांनी या दोन्हींचे जतन आणि संरक्षण करण्याचे आवाहन केले. शालेय स्तरावरील शिक्षणात मातृभाषेला प्रोत्साहन देण्याची  गरजही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या  विद्यापीठांमध्ये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये  संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणारी  योग्य परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले आणि विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना  आणि शिक्षणतज्ज्ञांना नवीन शैक्षणिक धोरण---2020 च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने संशोधनावर आवश्यक भर देण्याचे आवाहन केले.बहुशाखीय प्रकल्पांमध्ये संशोधन कार्याला चालना देण्यासाठी गोवा राज्य संशोधन फाउंडेशन  स्थापन करण्याच्या योजनेबद्दल त्यांनी गोवा सरकारचे कौतुक केले.

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गोवा राज्याचे कौतुक करताना, नायडू यांनी महिलांसाठी उच्च शिक्षणात एकूण नाव नोंदणी प्रमाण (GER) 27.3 %  या राष्ट्रीय सरासरीहून अधिक म्हणजेच  30% असल्‍याबद्दल गोव्याचे कौतुक केले.

सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण देण्याच्या प्रयत्नांबद्दल  गोवा सरकारचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, सरकारने अत्याधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात  गुंतवणूक करावी जेणेकरून गरीब आणि वंचितांनाही परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना उदयोन्मुख संधी ओळखून 21व्या शतकातील जगाला सामोरे जाण्यासाठी आणि ‘नवा भारत – एक मजबूत, स्थिर आणि समृद्ध भारत’ बनवण्यासाठी  कौशल्य अद्ययावत करण्याचे आवाहन केले.

पेडणे येथील महाविद्यालयाने  गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगती केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आणि महाविद्यालयातील  विस्तारित सुविधांमुळे या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी आशा व्यक्त केली.

विकासाच्या मागे धावताना निसर्गाकडे दुर्लक्ष करू नये असे सांगत  नायडू म्हणाले कीआधुनिक माहिती तंत्रज्ञान साधनांइतकेच  फुलपाखरू आणि  बाग हे महत्त्वाचे आहेत . त्यांनी तरुणांना बैठी जीवनशैली, आरोग्याला घातक  आहाराच्या सवयी आणि हानिकारक पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला.

गोव्याचे राज्यपाल  पी एस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री  बाबू आजगावकर, गोव्याचे मुख्य सचिव  परिमल राय, परिसरातील लोकप्रतिनिधी , शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण खालीलप्रमाणे:-

संत सोहिरोबानाथ अंबिये, शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन प्रांगणाच्या उद्‌घाटनप्रसंगी मी आज तुम्हा सर्वांसोबत इथे आहे याचा मला आनंद होत आहे.

गोवा राज्य आणि इथल्या लोकांबद्दल माझ्या हृदयात विशेष स्थान आहे आणि जेव्हाही या सुंदर ठिकाणाला भेट देतो तेव्हा मला नव्याने उर्जेचा संचार झाल्यासारखे वाटते.

प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो,

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, उच्च शिक्षण हे खूप महत्वाचे आहे, कारण ते आर्थिक विकास आणि सामाजिक  कल्याणासाठी चालना देणार्‍या विविध क्षेत्रांसाठी अत्यंत आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रदान करते.

दर्जेदार उच्च शिक्षण हे सर्व विकसित अर्थव्यवस्थांचे वैशिष्ट्य आहे.  हे विद्यार्थ्यांना अधिक अर्थपूर्ण आणि उत्पादक भूमिकांसाठी तयार करते आणि राहणीमानाचा दर्जा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

गोव्याने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे हे पाहून मला आनंद झाला. महिलांसाठी उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण (जीईआर) हे राष्ट्रीय सरासरी 27.3% च्या तुलनेत 30% आहे.  उच्च शिक्षणासाठी लिंगभाव  समानता निर्देशांक गेल्या पाच वर्षांत गोव्यात सुधारला आहे. महिला विद्यार्थीनींची संख्या आज विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे.  हे खूप चांगले चिन्ह असून इतर राज्यांनीही यापासून प्रेरणा घ्यावी.

विषयांचे कठोर पृथक्करण ही भूतकाळातील गोष्ट आहे कारण आज जग चांगल्या अष्टपैलू  व्यक्ती आणि चांगले संशोधन परिणाम निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणामध्ये बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा अवलंब करत आहे.  कला आणि सामाजिक शास्त्रांच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, तर्कशुध्द विचारात सुधारणा, उच्च सामाजिक आणि नैतिक जागरूकता आणि चांगले सांघिक कार्य तसेच संभाषण कौशल्यात वाढ होत असल्याचे विविध मूल्यांकनांत दिसून आले आहे.  21 व्या शतकातील अर्थव्यवस्थेत, कोणतेही क्षेत्र एका चाकोरीत काम करत नाही अशा गुणांना जास्त मागणी आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांमध्येही मानव्य विद्या शाखांना समान महत्त्व दिले पाहिजे आणि सर्व महाविद्यालयांनी अधिकाधिक बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्देशाला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत, गोवा सरकारने बहुविद्याशाखीय प्रकल्पांमध्ये संशोधन कार्य करण्यासाठी संशोधन विद्यावृत्ती प्रदान करण्यासाठी गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्याची योजना आखली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे.  मला खात्री आहे की हा उपक्रम उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन आणि नवकल्पना सर्वोत्कृष्ट दर्जा निर्माण करेल.

नवोन्मेष हा ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचा मुलाधार आहे.  माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तसेच सुशिक्षित तरुणांचा विचार करता भारताकडे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत जागतिक नेतृत्व बनण्याची क्षमता आहे.  आपली विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांच्या उत्कर्षासाठी संशोधन आणि नवोन्मेषासाठी योग्य परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे.  मला खात्री आहे की विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ नवीन शैक्षणिक धोरण-2020 च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने संशोधनासाठी आवश्यक तो भर देतील.

प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो,

अनेक सम्माननीय भारतीयांचा जन्म एकतर गोव्यात झाला आहे किंवा त्यांची मुळे या नैसर्गिकरित्या सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यात आहेत.  संगीत क्षेत्रातील भारतरत्न श्रीमती.  लता मंगेशकर, पद्मविभूषण श्रीमती.  आशा भोसले आणि श्री रेमो फर्नांडिस ही यापैकी काहींची नावे.  विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात;  पद्मविभूषण श्री रघुनाथ अनंत माशेलकर, पद्मविभूषण श्री अनिल काकोडकर आणि आंतरराष्ट्रीय फॅशनच्या क्षेत्रात पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांच्यासह इतरही आहेत.

गोव्याच्या उत्तरेच्या टोकाला असलेला तालुका पेडणे येथे आज आपण आहोत. हा गोवा मुक्ती संग्रामात अग्रभागी होता. 1954-1955 चा सत्याग्रह हा बलिदान आणि हौतात्म्य  आणि मुक्तीसंग्रामाला उर्जा देणारी ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे.

पेडणे हे 18 व्या शतकातील कवी संत - सोहिरोबानाथ अंबिये यांचेही निवासस्थान राहिले आहे. त्यांच्याच तिसऱ्या जन्मशताब्दीच्या उत्सवाचा भाग म्हणून या महाविद्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.  त्यांच्या व्यतिरिक्त भाऊ दाजी लाड, जिवबा दादा केरकर, अंजनीबाई मालपेकर, श्रीधर पार्सेकर आणि प्रभाकर पणशीकर यांसारख्या इतर मान्यवरांचे जन्मगाव असण्याचा बहुमान पेडणेला आहे.

"अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे" ही संत सोहिरोबनाथ अंबिये यांच्या सुप्रसिद्ध कवितांपैकी एक. इंग्रजीत अनुवादित, याचा अर्थ: "तुमच्या हृदयातील ज्ञानाचा दिवा कधीही विझवू नका." ही कविता भले 18 व्या शतकात रचली गेली असली तरी, या कवितेचे सार, गोवा सरकारच्या पेडणे या ग्रामीण तालुक्यात सामान्य शिक्षणाचे महाविद्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाशी प्रतिध्वनित होते, त्यामुळे ज्ञानाचा दिवा अखंड तेवत राहण्याची खात्री देते.

पेडणे महाविद्यालयात गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगती होत आहे आणि सध्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावर सुमारे 744 विद्यार्थी आणि 33 शिक्षक कर्मचारी आहेत हे कळल्यावर मला आनंद झाला.

या विस्तारामुळे वाढत्या विद्यार्थ्यी संख्येची शैक्षणिक गरज भागणार आहे.  महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, सह-अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे हे जाणून मला आनंद झाला.  मला खात्री आहे की ग्रामीण पेडणे मधील विद्यार्थ्यांना विस्तारित सुविधांचा खूप फायदा होईल.

मला हे जाणून देखील आनंद झाला की एक मोठे वाचनालय, प्रशस्त सभागृह आणि हवेशीर वर्गखोल्यांव्यतिरिक्त, महाविद्यालयात एक वेधशाळा देखील आहे ज्यामध्ये एक अत्याधुनिक दुर्बिण, रेकॉर्डिंग स्टुडिओ, फुलपाखरू उद्यान  आणि एक उत्तम वनस्पति उद्यानही आहे.

प्रिय मित्रानो,

फुलपाखरू आणि उद्यान हे नवीन माहिती तंत्रज्ञान साधनांइतकेच महत्त्वाचे आहे.  आपण प्रगती केली पाहिजे, परंतु निसर्गाकडे दुर्लक्ष करता कामा नये.  म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपला अर्धा वेळ वर्गात आणि उरलेला अर्धा वेळ खेळाच्या मैदानात किंवा निसर्गाच्या कुशीत घालवण्याची गरज असल्याचे मी नेहमीच सांगत आलो आहे.  देशात असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या घटनांमुळे, सर्व तरुणांना माझा सल्ला आहे की, बैठी जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी आणि हानिकारक पदार्थांचे सेवन टाळावे.  नियमित व्यायाम किंवा योगासने करून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे.

या महाविद्यालयात पूर्णत: सुसज्ज व्यायामशाळा, एनसीसी आणि एनएसएस युनिटही आहेत हे कौतुकास्पद आहे.  कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे हे जाणून मला आनंद झाला. इथल्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत हे ही मला माहिती आहे.

मला सांगण्यात आले आहे की या महाविद्यालयासह गोव्यातील अनेक संस्थांमध्ये वाणिज्य आणि आर्थिक प्रयोगशाळा आणि भाषा प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.  हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपण केवळ विज्ञानातच नव्हे तर सामाजिक विज्ञान, भाषा आणि वाणिज्य तसेच आर्थिक क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधक तयार केले पाहिजेत.  वाणिज्य क्षेत्रातील संशोधन सुलभ करण्यासाठी एक संयुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने गोव्यातील इतर महाविद्यालयांच्या सहकार्याने ‘समूह वाणिज्य संशोधन केन्द्र’ स्थापन केले आहे हे प्रशंसनीय आहे.

प्रिय मित्रांनो,

भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या आणि लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या आमच्या प्रयत्नात वाणिज्य हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.  ई-कॉमर्सच्या आगमनाने, ही शिस्त झपाट्याने बदलत असून धकाधकीची आणि नवनवीन शोधांची साक्ष देत आहे.  जागतिक स्तरावर भारताला व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी मी तुम्हाला वाणिज्य क्षेत्रातील या नवनव्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याची विनंती करेन.

भगिनींनो आणि बंधूंनो,

प्राचीन काळी, इतर अनेक देशांतील विद्यार्थी नालंदा, विक्रमशिला आणि तक्षशिला यांसारख्या प्रसिद्ध भारतीय संस्थांमध्ये शिकण्यासाठी येत असत.  भारत विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध होता.  ते वैभव आपल्याला परत मिळवायचे आहे आणि भारताला शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र बनवायचे आहे.

मला हे लक्षात घेता आनंद होत आहे की उच्च शिक्षण संचालनालयाने समग्र आणि अनुकूल ज्ञानाद्वारे शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.  असाच एक प्रकल्प म्हणजे, समग्र शिक्षण आणि आभासी अभिमुखतेसाठी डिजिटल एकात्मिक प्रणाली (DISHTAVO);  गोव्यातील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित जागतिक दर्जाच्या शैक्षणिक ई-सामग्रीच्या विकासासाठीचा हा प्रकल्प आहे. शेअर अँड केअर’ या खऱ्या भावनेने, ही ई-सामग्री जगभरातील शैक्षणिक समुदायासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.  विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात एवढे मोठे कार्य पूर्ण केल्याबद्दल मी संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो.

मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी नेहमीच उच्च दर्जा राखावा आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करावेत.  तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा!

 

 

 

 

 

 

 

 

 Jaydevi PS/S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767227) Visitor Counter : 373


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi