संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेफएक्स्पो 2022 या संरक्षण विषयक प्रदर्शनासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राजदूतांची गोलमेज परिषद


गुजरातमध्ये गांधीनगर येथे होत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या संरक्षणविषयक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी परदेशातील संरक्षण सामग्री उत्पादक कंपन्यांना निमंत्रण

Posted On: 25 OCT 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

  • डेफएक्स्पो 2022 प्रदर्शनामुळे सामायिक समृद्धीसाठी नव्या यशस्वी प्रकल्पांची तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारीची बीजे रोवली जातील
  • या प्रदर्शनामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, भारतीय हवाई क्षेत्र आणि संरक्षणविषयक पर्यावरणाला बळकटी येईल आणि हे प्रदर्शन जगाच्या संरक्षणविषयक गरजांची पूर्तता करेल.
  • गेल्या 5 वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रातील निर्यात 334% ने वाढली, सहयोगात्मक प्रयत्नांमुळे आता भारत जगातील 75 हून अधिक देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात करतो.

 परदेशी मित्र राष्ट्रांशी तसेच जगातील संरक्षण सामग्री निर्मात्या उद्योगांशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज 25 ऑक्टोबर 2021 रोजी डेफएक्स्पो 2022 या संरक्षण विषयक प्रदर्शनासंदर्भात विविध देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद झाली. गुजरातमध्ये गांधीनगर येथे 10 ते 13 मार्च 2022 या कालावधीत होत असलेल्या डेफएक्स्पो 2022 या संरक्षण विषयाला वाहिलेल्या प्रदर्शनाचे नियोजन, सज्जता आणि इतर तपशिलांची माहिती परदेशी राजदूतांना कळविणे हा हा गोलमेज परिषदेचा हेतू होता.

या परिषदेला 200 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, संरक्षण सामग्री निर्मिती विभागाचे सचिव राज कुमार आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच गुजरात सरकारचे इतर ज्येष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

डेफएक्स्पो 2022 या  आशियातील सर्वात मोठ्या संरक्षण विषयाला वाहिलेल्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी परदेशी प्रतिनिधींना आमंत्रित करताना राजनाथ सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी, डेफएक्स्पो 2022 हे प्रदर्शन नव्या यशस्वी प्रकल्पांची तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारीची बीजे रोवेल आणि  सामायिक समृद्धी, गुंतवणुकीला चालना, उत्पादन क्षमतेचा विस्तार तसेच भारतातील हवाई क्षेत्र आणि संरक्षणविषयक पर्यावरण यांना बळकटी देईल याबद्दल मला खात्री आहे. 

डेफएक्स्पो 2020 तसेच एअरो इंडिया2021मध्ये सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी आभार मानले आणि ते पुढे म्हणाले की या आधीच्या प्रदर्शनांच्या कामगिरीच्या पुढे जाऊन अधिक प्रमाणात परदेशी तसेच भारतीय प्रदर्शक, मूळ साधने उत्पादक आणि परदेशांच्या सहभागाचे उद्दिष्ट डेफएक्स्पो 2022 ने ठेवले आहे. 

 केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणाले की भारतीय हवाई क्षेत्र आणि संरक्षण सामग्री निर्मिती क्षेत्र अधिक नवी उंची गाठण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी सांगितले की अवकाश क्षेत्र, सायबर स्पेस, भविष्यातील क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक साखळी, आभासी सत्यता, त्रिमितीय मुद्रण, संरक्षण बाबींची डिजिटल सरहद्द व इंटरनेट यांच्या संदर्भात संशोधन आणि विकास याची क्षमता देशात आहे.

भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रयत्नांचे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, जगातील सर्व संबंधित संस्थांच्या सहयोगात्मक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या देशातून होणारी संरक्षण सामग्रीची निर्यात 334% ने वाढली आहे आणि आता भारत जगातील 75 देशांना संरक्षण विषयक साहित्याची निर्यात करीत आहे

या वेळी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी डेफएक्स्पो 2022 साठीच्या संकेतस्थळाची देखील सुरुवात केली (www.defexpo.gov.in). या संकेतस्थळावर भारतात निर्मित विविध संरक्षण उत्पादनांविषयी माहितीपूर्ण साहित्य उपलब्ध आहे तसेच या संकेतस्थळाच्या मदतीने प्रदर्शकांना विविध ऑनलाईन सेवा देखील पुरविण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे गुंतवणुकीला चालना मिळण्यास मदत होईल, उत्पादन क्षमतांचा आणि कार्यक्षमतांचा विस्तार करता येईल तसेच तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी नवे मार्ग शोधता येतील. आणि त्यातून 2024 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यात योगदान देता येईल.

 

M.Iyengar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1766369) Visitor Counter : 288