पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

Posted On: 24 OCT 2021 11:49AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 24  ऑक्टोबर 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वाना नमस्कार| कोटी कोटी नमस्कार, आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणत आहे कारण 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे.
मित्रांनो, 100  कोटीचा आकडा खूप मोठा अवश्य आहे,  परंतु त्याच्याशी अनेक लाखो लहान लहान प्रेरक आणि अभिमानास्पद असे अनेक अनुभव, उदाहरणं जोडली गेली आहेत. खूप लोक मला पत्र लिहून विचारतात की, लसीकरणाच्या सुरूवातीलाच या अभियानाला इतकं मोठं यश मिळेल, असा विश्वास आपल्याला कसा वाटत होता? मला हा विश्वास यासाठी वाटत होता कारण, मला आपला देश, आपल्या देशाच्या लोकांची क्षमता अगदी चांगली माहित आहे. मला माहित होतं की, आमचे आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. त्यांच्या बाबतीत तर अशी असंख्य उदाहरणं आहेत जी, त्यांनी कशी सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केलं, हे सांगतात. आम्ही अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे, बाहेरही ऐकलं आहे की  हे काम करण्यासाठी आमच्या लोकांनी किती कष्ट केले आहेत, एकापेक्षा एक प्रेरक उदाहरणं आमच्या समोर आहेत. मी आज मन की बातच्या श्रोत्यांची भेट उत्तराखंडच्या बागेश्वर इथली एक आरोग्य कर्मचारी पूनम नौटियाल हिच्याशी घडवू इच्छितो. मित्रांनो, बागेश्वर उत्तराखंडच्या त्या धरतीवर आहे. ज्या उत्तराखंडने शंभर टक्के पहिला डोस देण्याचे काम पूर्ण केलं आहे. उत्तराखंड सरकारही अभिनंदनाचं पात्र आहे कारण खूप दुर्गम क्षेत्र आहे, अतिशय अवघड आहे. तसंच, हिमाचलनंही अशा अडचणींवर मात करत शंभर टक्के डोस देण्याचं काम पूर्ण केलं आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, पूनमजींनी आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, नमस्ते|
पूनम नौटियालः सर, प्रणाम|
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, देशातल्या श्रोत्यांना जरा आपल्याबाबतीत थोडं सांगा.
पूनम नौटियालः सर, मी पूनम नौटियाल| सर, मी उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातल्या चानी कोराली केंद्रात कार्यरत आहे. मी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (एएनएम) आहे, सर|
पंतप्रधान:  पूनमजी, माझं सद्भाग्य आहे की मला बागेश्वर येण्याची संधी मिळाली होती. ते एक प्रकारे तीर्थक्षेत्रच आहे. तिथं प्राचीन मंदिर वगैरे आहे. मी ते पाहून खूप प्रभावित झालो. युगांपूर्वी कसं लोकांनी काम केलं असेल.
पूनम नौटियालः हांजी, सर
पंतप्रधान: पूनम जी, आपण आपल्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांचं लसीकरण करून घेतलं आहे का?
पूनम नौटियालःहांजी, सर. सगळ्या लोकांचं लसीकरण झालं आहे.
पंतप्रधान: आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं का?
पूनम नौटियालःहांजी, सर. जेव्हा पाऊस पडत असे तेव्हा रस्ता बंद होत असे आणि तेव्हा नदी पार करून गेलो आहोत आम्ही सर.  आणि सर, आम्ही घरोघर गेलो आहोत जसे एनएचसीव्हीसीच्या अंतर्गत लोक घरोघर गेले होते. जे लोक वृद्ध आहेत, दिव्यांग लोक, तसेच गर्भवती महिला, या लोकांच्या घरी गेलो.
पंतप्रधान: परंतु तिथं तर पहाडी प्रदेशात खूप दूरदूर घरं असतात.
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: एका दिवसात किती मजल मारू शकत होतात आपण|
पूनम नौटियालः सर, किलोमीटरचा हिशोब पाहिला तर 10 किलोमीटर तर कधी 8 किलोमीटर.
पंतप्रधान: असो, हे तर मैदानी प्रदेशात रहाणारे लोक आहेत, त्यांना 8 ते 10 किलोमीटर काय असतं ते समजणार नाही . मला माहित आहे की, पहाडी प्रदेशात 8-10 किलोमीटर म्हणजे पूर्ण दिवस त्यातच जातो.
पूनम नौटियालः हांजी.
पंतप्रधान: परंतु एका दिवसात एवढं अंतर चालणं खूप मेहनतीचं काम  आहे आणि त्यात पुन्हा लसीकरणाचं सामान उचलून बरोबर न्यायचं. आपल्या बरोबर कुणी सहाय्यक असायचे की नाही ?
पूनम नौटियालः हांजी. आमच्या पथकाचे सदस्य, आम्ही पाच लोक असायचो सर.
पंतप्रधान: हां.
पूनम नौटियालः त्यात डॉक्टर आले, मग एएनएम आले, आशा अंगणवाडी सेविका आली, औषधी तज्ञ असायचा आणि डेटा एंट्री ऑपरेटर असे.  
पंतप्रधान: अच्छा त्या डेटा एंट्रीसाठी तिथं इंटरनेट कनेक्शन मिळत असे की बागेश्वरला परतल्यावर करत असायचा?
पूनम नौटियालः सर, कधी कधी मिळत असे नाही  तर बागेश्वरला आल्यावर करत होतो आम्ही.
पंतप्रधान: पूनम जी, आपण अगदी चाकोरीच्या बाहेर जाऊन लोकांना लस दिली. ही कशी कल्पना आली, आपल्या मनात हा विचार  कसा  आला आणि कसं केलं आपण हे सर्व?
पूनम नौटियालः आम्ही लोकांनी, पूर्ण पथकानं एक निर्धार केला होता की कोणतीही व्यक्ति यातून सुटायला नको. आमच्या देशातनं कोरोना आजार दूर पळाला पाहिजे. मी आणि आशा वर्करनं प्रत्येक लसीकरणातून राहिलेल्या व्यक्तिची गावनिहाय एक यादी बनवली, मग त्यानुसार जे  लोक केंद्रात आले, त्यांना केंद्रातच लस टोचली. जे लोक राहिले होते, केंद्रात येऊ शकत नव्हते त्यांच्या घरोघरी जाऊन दिली सर.
पंतप्रधान: अच्छा, लोकांना समजावून सांगावं लागत होतं?
पूनम नौटियालः हांजी, समजावून सांगितलं.
पंतप्रधान: लोकांमध्ये अजूनही लस घेण्यासाठी उत्साह आहे?
पूनम नौटियालः हांजी सर, हांजी. आता तर लोकांना कळलं आहे. पहिल्यांदा आम्हा लोकांना खूप अडचणी आल्या. लोकांना ही लस सुरक्षित आहे, प्रभावी आहे, आम्ही ही घेतली आहे, आम्ही अगदी ठीक आहोत, आपल्या समोर आहोत, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
पंतप्रधान: लस घेतल्यावर नंतर कुठून तक्रार आली?
पूनम नौटियालः नाही  सर. असं तर काहीही झालं नाही .
पंतप्रधान: काहीही झालं नाही 
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: सर्व समाधानी होते की ठीक झालं आहे.
पूनम नौटियालः हांजी
पंतप्रधान: आपण एक खूप मोठं काम केलं आहे आणि मला माहित आहे, ते संपूर्ण क्षेत्र, पहाडी प्रदेशात पायी चालणं किती अवघड आहे. एका पहाडावर चढा, पुन्हा खाली उतरा, पुन्हा दुसरा पहाड चढा. घरंही पुन्हा दूरदूरच्या अंतरावर आहेत. असं असूनही आपण इतकं चांगलं काम केलं.
पूनम नौटियालःधन्यवाद सर. माझं सद्भाग्य आहे की आपल्याशी मी बोलू शकले.
आपल्यासारख्या लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळेच भारत 100 कोटीचा लसीकरणाचा टप्पा गाठू शकला आहे.  आज मी केवळ आपले आभार मानत नाही  तर प्रत्येक त्या भारतवासियाचे आभार मानतो,ज्यानं सर्वाना लस, विनामूल्य लस या अभियानाला इतक्या उंचीवर नेलं, यश दिलं. आपल्याला, आपल्या परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
 
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्याला माहित असेल की पुढच्या रविवारी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे. मन की बातच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं, मी लोहपुरूषाला नमन करतो. मित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो.  एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या नं कोणत्या उपक्रमाशी आपण जोडलं जावं, ही आपली जबाबदारी आहे. आपण पाहिलं असेल, नुकतंच गुजरात पोलिसांनी कच्छच्या लखपत किल्ल्यापासून स्टॅच्यु ऑफ युनिटीपर्यंत बाईक रॅली काढली. त्रिपुरा पोलिसांचे जवान तर एकता दिन साजरा करण्यासाठी त्रिपुराहून स्टॅच्यु ऑफ यूनिटीपर्यंत बाईक रॅली काढत आहेत.  म्हणजे, पूर्वेक़डून निघून पश्चिमेपर्यंत देशाला जोडण्याचं काम करत  आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांचे जवानही उरीहून पठाणकोटपर्यंत बाईक रॅली काढून देशाच्या एकतेचा संदेश देत आहेत. मी या सर्व जवानांना प्रणाम करतो. जम्मू काश्मीरच्याच कुपवाडा जिल्ह्यातल्या अनेक भगिनींच्या बाबतीत मला माहिती मिळाली आहे.  या भगिनी कश्मिरात लष्कर आणि सरकारी कार्यालयांसाठी तिरंगा शिवण्याचं काम करत आहेत. हे काम देशभक्तिच्या भावनेनं भरलेलं आहे. मी त्या भगिनींच्या उत्कट भावनांची प्रशंसा करतो. आपल्यालाही भारताची एकता, भारताचं श्रेष्ठत्व यासाठी काही नं काही अवश्य केलं  पाहिजे. पहा, आपल्या मनाला किती आनंद मिळतो.
मित्रांनो, सरदार साहेब म्हणत असत की, आपण आपल्या एकजुटीनंच देशाला नव्या महान उंचीपर्यंत पोहचवू शकतो. जर आमच्यात ऐक्य झालं नाही  तर आपण  स्वतःला नवनवीन संकटांमध्ये ढकलून दिल्यासारखं होईल. म्हणजे राष्ट्रीय एकता आहे तरच उंची आहे, विकास आहे. आम्ही सरदार पटेल यांच्या जीवनातनं,  विचारांपासून खूप काही शिकू शकतो. देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सरदार पटेल यांच्या जीवनावर एक चित्रमय चरित्रही प्रसिद्ध केलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवामित्रांनी ते जरूर वाचावं. त्यातनं आपल्याला सरदार साहेबांचं जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं घेण्याची संधी मिळेल.
प्रिय देशवासियांनो, जीवनाला निरंतर प्रगति हवी असते, विकास  हवा असतो, नवनव्या उंची पार करायची असते. विज्ञान कितीही पुढे जाओ, प्रगतीची गती कितीही वाढो, भवन कितीही भव्य तयार होओत, परंतु जीवनात अपूर्णतेचा अनुभव येत असतो. परंतु जेव्हा यात गीत-संगीत, कला, नाट्य-नृत्य, साहित्य जोडलं जातं, तेव्हा त्याचा प्रकाश, जिवंतपणा अनेक पटींनी वाढत जातो. जीवनाला एक प्रकारे सार्थक बनवायचं असेल तर हे सर्व असणं तितकंच आवश्यक आहे, म्हणून असं म्हटलं जातं की, या साऱ्या कला आमच्या जीवनात एक उत्प्रेरकाचं काम करतात, आमची उर्जा वाढवण्याचं काम करतात. मानवी मनाच्या अंतर्मनाला विकसित करण्यात, आमच्या अंतर्मनाच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यातही गीत-संगीत आणि वेगवेगळ्या कलांची खूप मोठी भूमिका असते आणि यांची  एक मोठी शक्ति ही असते की, यांना न काळ बांधू शकतो नं मतमतांतरे बांधू शकतात. अमृत महोत्सवात आपली कला, संस्कृती, गीत,  संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडले गेलेले अनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. मी त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवल्या आहेत. मला याचा आनंद आहे की, मंत्रालयानं त्या गांभिर्यानं घेऊन त्यावर कामही केलं आहे. यातच एक सूचना अशी आहे की, देशभक्ति गीतांशी जोडली गेलेली स्पर्धा. स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्या भाषा, बोलीमधल्या देशभक्ति गीतांनी आणि भजनांनी पूर्ण देशाला एकत्र आणलं होतं. आता अमृतकाळात, आमचे युवक देशभक्तिवरील अशीच गीतं लिहून त्यांचं आयोजन करून उर्जा निर्माण करू शकतात. देशभक्तिची ही गीतं मातृभाषेत असू शकतील, राष्ट्रभाषेत असू शकतील किंवा इंग्रजीतही लिहू शकतात. परंतु या  रचना नव्या भारताचा विचार असणारी, देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठी देशाला संकल्पित करणारी असली पाहिजेत, हे आवश्यक आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं तर तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.
मित्रांनो, मन की बातच्या एका श्रोत्यानं अशीही सूचना केली आहे की, अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कल्पनांवर रांगोळ्या काढल्या जातात. म्हणून सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे. आपण कल्पना करा, जेव्हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडलेली रांगोळी काढली जाईल, लोक आपल्या दारावर, भिंतीवर एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचं चित्र काढतील, स्वातंत्र्याची घटना रंगांमध्ये दाखवतील, तर अमृत महोत्सवाच्या रंगांना आणखी बहार येईल.
मित्रांनो, आमच्याकडे अंगाईगीत ही ही एक पद्धत आहे. आमच्याकडे अंगाईगीताच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार केले जातात, संस्कृतीशी त्यांचा परिचय करून दिला जातो. अंगाईगीतांची त्यांची स्वतःची विविधता आहे. तर, अमृतकाळात आम्ही या कलेलाही पुनर्जिवित करू आणि देशभक्तिशी जोडलेली अशी अंगाईगीतं,कविता, गीतं काही नं काही अवश्य लिहू जे प्रत्येक घरात माता अत्यंत सहजतेनं आपल्या लहान लहान मुलांना ऐकवू शकतील. या अंगाईगीतांमध्ये आधुनिक भारताचा संदर्भ असेल, २१ व्या शतकातल्या भारताच्या स्वप्नांचं दर्शन घडेल. आपल्या सर्व श्रोत्यांच्या सूचनांनंतर मंत्रालयानं याच्याशी जोडलेली स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो, या तिन्ही स्पर्धा 31 ऑक्टोबरला सरदार साहेबांच्या जयंतीदिनापासून सुरू होत आहेत. येत्या काही दिवसात सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी संबंधित सारी माहिती देईल. ही माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर असेल आणि समाजमाध्यमांवरूनही दिली जाईल. माझी इच्छा आहे की आपण साऱ्यांनी यात सहभागी व्हावं. आमच्या युवा साथीदारांनी आपल्या कलेचं, आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन अवश्य करावं. यातून आपल्या प्रदेशातली कला आणि संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल आणि आपल्या कहाण्या सारा देश ऐकेल.
प्रिय देशवासियांनो, यावेळी आम्ही अमृत महोत्सवात देशाचे वीर पुत्र आणि कन्यांच्या महान पुण्यात्म्यांचं स्मरण करत आहोत. पुढल्या महिन्यात १५ नोव्हेंबरला आमच्या देशाचे असेच महापुरूष वीर योद्धा भगवान बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो, हे आपल्याला माहित आहे का? याचा अर्थ आहे धरती पिता. भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृती, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. परदेशी राजसत्तेनं किती त्यांना धमक्या दिल्या, किती दबाव टाकला, पण त्यांनी आदिवासी संस्कृती सोडली नाही. निसर्ग आणि पर्यावरणावर जर आम्हाला प्रेम करायला शिकायचं असेल तर धरती आबा भगवान बिरसा मुंडा आमची खूप मोठी प्रेरणा आहे.
 
परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे, अशा प्रत्येक धोरणाला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. गरीब आणि अडचणी-समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांनी सामाजिक कुरीती संपुष्टात आणण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं उलगुलान आंदोलन कोण विसरू शकते? या आंदोलनाने इंग्रजांना हलवून टाकलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यावर खूप मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवलं होतं. ब्रिटीश सरकाने त्यांना कारागृहात टाकलं. आणि त्यांचा इतका छळ केला की, वयाने पंचविशी अद्याप पार केली नसतानाही इतक्या तरूण वयात ते आपल्याला सोडून गेले. ते आपल्याला सोडून गेले, ते केवळ शरीरानं!
जनसामान्यांमध्ये तर भगवान बिरसा मुंडा यांनी अढळ स्थान प्राप्त केलं आहे. लोकांसाठी त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा शक्ती बनले आहे. आजही त्यांची शौर्यगाथा आणि वीरतेने भरलेली लोकगीते आणि कथा मध्य भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. मी ‘धरती बाबा’ बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि युवकांना माझा आग्रह आहे की, त्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी वाचन करून त्यांच्या कार्याची माहिती आणखी जाणून घ्यावी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या आदिवासी समूहाने दिलेल्या वैशिष्टपूर्ण योगदानाविषयी तुम्ही जितकी माहिती घ्याल, तितक्याच प्रमाणात त्यांचे कार्य गौरवपूर्ण असल्याची अनुभूती तुम्हाला होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज 24 ऑक्टोबरला यूएन डे म्हणजेच ‘संयुक्त राष्ट्र दिवस‘ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेला हा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून भारत त्याच्याशी जोडला आहे. भारताने स्वांतत्र्याआधी 1945 मध्येच संयुक्त राष्ट्राच्या चार्टरवर म्हणजेच सनदीवर स्वाक्षरी केली होती, याविषयी तुम्हाला माहिती आहे? संयुक्त राष्ट्राशी संबंधित एका वेगळा पैलू असा आहे की, संयुक्त राष्ट्राचा प्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची- मोठी भूमिका बजावली आहे. 1947-48 मध्ये ज्यावेळी यूएन ह्मुमन राइटसचे- म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्यावतीने मानवाधिकाराचा वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होते, त्या  घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होते की, ‘‘ ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’’ परंतु भारताच्या एका प्रतिनिधीने असे लिहिण्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आले की - ‘‘ऑल ह्युमन बीईग्स आर क्रिएटेड इक्वल’’ !! ही गोष्ट म्हणजेच स्‍त्री-पुरूष  समानतेची बाब भारताच्या दृष्टीने अनेक युगांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरेला अनुसरून होती. श्रीमती हंसा मेहता असे नाव त्या प्रतिनिधीचे होते. त्यांच्यामुळे अशी समानता घोषणापत्रात नमूद करणे शक्य झाले, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? त्याच काळामध्ये आणखी एक सदस्य श्रीमती लक्ष्मी मेनन यांनी स्‍त्री-पुरूष  समानतेच्या मुद्यावर आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडले होते. इतकेच नाही तर, 1953 मध्ये श्रीमती विजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षही बनल्या होत्या.
मित्रांनो, आपण त्याच भूमीचे लोक आहोत. जे असा विश्वास ठेवतात, जे अशी प्रार्थना करतात.
ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षँ शान्तिः,
पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः ।
वनस्पतयः शान्तिर्विश्र्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः,
सर्वशान्तिः शान्तिरेव शान्तिः, सा मा शान्तिरेधि।।
ओम शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
भारताने सदैव विश्वाच्या शांतीसाठी काम केले आहे.  1950 च्या दशकापासून सातत्याने संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेचा भारत एक हिस्सा बनला आहे, या गोष्टीचा भारताला अभिमान वाटतो. गरीबी हटविण्यासाठी, हवामान बदलाची समस्या आणि श्रमिकांसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्याचा विषय असो, या सर्वांमध्ये भारताने अग्रणी भूमिका निभावत आहे. याशिवाय योग आणि आयुष यांना लोकप्रिय बनविण्यासाठी भारत डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करीत आहे. मार्च 2021 मध्ये डब्ल्यूएचओने घोषणा केली होती की, भारतामध्ये पारंपरिक औषधोपचार पद्धतीसाठी एक वैश्विक केंद्र स्थापन करण्यात येईल.
मित्रांनो, संयुक्त राष्ट्राविषयी बोलत असताना मला आज अटल जी यांचे शब्द आठवत आहेत. 1977 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीमध्ये भाषण करून इतिहास निर्माण केला होता. आज मी ‘‘मन की बात’’ मध्ये श्रोत्यांना, अटल जींच्या त्या भाषणातला काही भाग ऐकवू इच्छितो. श्रोत्यांनी, अटल जींची ती  ओजस्वी वाणी ऐकावी -
‘‘ इथे मी राष्ट्रांची सत्ता आणि महत्ता यांच्याविषयी विचार करीत नाही. त्यापेक्षा सर्व सामान्य माणसाची प्रतिष्ठा आणि प्रगती माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. अखेर, आपले यश आणि अपयश केवळ एकाच मापदंडाने मोजली गेली पाहिजे. आणि ते म्हणजे आपण संपूर्ण मानव समाज, वस्तूतः प्रत्येक नर-नारी आणि बालक यांना न्याय आणि प्रतिष्ठा देण्याविषयी आश्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’
मित्रांनो, अटल जी यांचे हे वक्तव्य आपल्याला आजही मार्गदर्शन करणारे आहे. या भूमीला, पृथ्वीला अधिक चांगले आणि सुरक्षित ग्रह बनविण्याच्या कार्यात भारताचे योगदान, संपूर्ण विश्वासाठी एक खूप मोठी प्रेरणा देणारे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अलिकडेच काही दिवस आधी 21 ऑक्टोबरला आपण पोलिस स्मृती दिवस पाळला. पोलिस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यांचे या दिवशी विशेषत्वाने  स्मरण केले जाते. मी आज आपल्या या पोलिस कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या परिवारांचेही स्मरण करू इच्छितो. परिवाराचे सहकार्य आणि त्याग यांच्याशिवाय पोलिसासारखी कठिण सेवा करणे खूप अवघड आहे. पोलिस सेवेसंबंधित आणखी एक गोष्ट आहे, ती मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो. आधी अशी एक धारणा होती की, सेना-लष्कर आणि पोलिस यासारख्या सेवा केवळ पुरूषांसाठीच असतात. मात्र आज असे नाही. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आकडेवारी सांगते की, गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलिस कर्मचारी वर्गाची संख्या दुप्पट झाली आहे. डबल झाली आहे. 2014 मध्ये महिला पोलिसांची संख्या 1 लाख 5 हजारच्या जवळपास होती. तर 2020 पर्यंत ही संख्या वाढून ती दुपटीपेक्षा जास्त  म्हणजे आता 2 लाख 15 हजारापर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये गेल्या सात वर्षांमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आणि मी केवळ वाढलेल्या आकडेवारीविषयी बोलत नाही. आज देशाच्या कन्या अवघडात अवघड कामही संपूर्ण ताकदीनिशी, मोठ्या धाडसाने करीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक कन्या आता सर्वात कठिण असे मानले जाणारे प्रशिक्षण म्हणजे ‘स्पेशलाईज्ड जंगल वॉरफेअर कमांडोज’चे प्रशिक्षणही घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी आपल्या ‘कोब्रा बटालियन’ चा हिस्सा बनणार आहेत.
मित्रांनो, आज आपण विमानतळांवर जातो, मेट्रो  स्थानकांवर जातो, किंवा सरकारी कार्यालयातही पाहतो, सीआयएसएफच्या बहादूर महिला प्रत्येक संवेदनशील स्थानांवर सुरक्षा व्यवस्था पहात असताना दिसतात. याचा सर्वात सकारात्मक परिणाम आपल्या पोलिस दलाबरोबरच समाजाच्या मानसिकतेवरही पडत आहे. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांना एकप्रकारची सहजता वाटते, विश्वास निर्माण होतो. त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो, स्वतःला त्यांच्याबरोबर जोडतात. महिलांमध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळेही लोकांना त्यांच्याविषयी जास्त भरवसा वाटतो. आपल्या या महिला पोलिस कर्मचारी देशातल्या इतर लाखो मुलींसाठी ‘रोल मॉडेल’ बनत आहेत. मी महिला पोलिस कर्मचा-यांना सांगू इच्छितो की, शाळा सुरू झाल्या की, त्यांनी आपल्या भागातल्या शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथल्या मुलींबरोबर संवाद साधावा. मला विश्वास आहे की, असा संवाद साधल्यामुळे आपल्या नवीन पिढीला एक वेगळी नवी दिशा मिळेल. इतकंच नाही तर यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वासही वाढेल. मी आशा करतो की, आगामी काळात आणखी जास्त संख्येने महिला पोलिस सेवेत सहभागी होतील, आपल्या देशाच्या ‘न्य एज पोलिसिंग’चे नेतृत्व करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने वाढत आहे, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावं, असं अनेक श्रोते नेहमीच लिहीत असतात. आज मी अशाच एका विषयाची चर्चा तुमच्याबरोबर करू इच्छितो. हा विषय आपल्या देशात, विशेषतः आपल्या युवकांच्या आणि लहान-लहान मुलांच्याही कल्पनाविश्वात असतो. हा विषय आहे- ड्रोनचा ! ड्रोन तंत्रज्ञानाचा !! काही वर्षांपूर्वी जर कधी चर्चेत ड्रोनचं नाव आलं तर लोकांच्या मनात पहिला भाव काय येत होता? तर लष्कराचे, सेनेचे, हत्यार, शस्त्रे, युद्ध... असे विचार येत होते. परंतु आज मात्र आपल्याकडे कोणाचा विवाह समारंभ असेल, वरात काढली जाणार असेल किंवा असाच काही कार्यक्रम असेले तर आपण ड्रोनने छायाचित्रे काढतो आणि व्हिडिओ बनवताना पाहतोय. ड्रोनची व्याप्ती, त्याची क्षमता, ताकद केवळ इतकी मर्यादित नाही. ज्या देशांनी ड्रोनच्या मदतीने आपल्या गावांतल्या जमिनींची डिजिटल नोंदणी करण्याचे काम करणारे जे पहिले काही देश आहेत, त्यापैकीच भारत एक आहे. भारत ड्रोनचा वापर वाहतुकीसाठी करता यावा, यासाठी अतिशय व्यापक पद्धतीने काम करत आहे. मग त्यामध्ये गावातल्या शेती असो अथवा घरामध्ये सामान पोहोचवणे असो. संकटाच्या काळात मदत पोहोचवायची असो किंवा कायदा सुव्यवस्थेची निगराणी करायची असो. आपल्या अशा अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी ड्रोन काम करू शकतो, हे पाहण्यासाठी आता आपल्याला फार काळ वाट पहावी लागणार नाही. यामध्ये अनेक गोष्टी ड्रोनमार्फत करण्यास प्रारंभही झाला आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमधल्या भावनगर  इथे ड्रोनच्या मदतीने शेतांमध्ये नॅनो-युरिया शिंपडण्यात आला. कोविड लसीकरण मोहिमेमध्ये ड्रोनही आपली भूमिका बजावत आहेत. याचे एक छायाचित्र आपण मणिपूरमध्ये पहायला मिळाले होते. तिथं एका बेटावर ड्रोनच्या माध्यमातून लस पोहोचविण्यात आली. तेलंगणामध्ये ड्रोनच्या मदतीने लस पोहोचवली गेली. इतकेच नाही तर आता पायाभूत सुविधांसाठी अनेक मोठया प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. मी एका अशा युवा विद्यार्थ्याविषयी वाचले आहे की, त्यानं ड्रोनच्या मदतीने मच्छीमारांचे जीव वाचविण्याचं काम केलंय.
मित्रांनो, आधी या क्षेत्रामध्ये इतके नियम, कायदे आणि प्रतिबंध लावण्यात आले होेते की, ड्रोनची नेमकी, योग्य क्षमता वापरणेच अशक्य होते. ज्या तंत्रज्ञानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, त्याकडे संकट म्हणून पाहिले जात होते. जर आपल्याला कोणत्याही कामासाठी ड्रोन उडवावा लागणार असेल तर, त्यासाठी परवाना आणि परवानगी घेणे अतिशय गुंतागुंतीचे, त्रासदायक काम होते. त्यामुळे लोक ड्रोन म्हटलं की, नको रे बाबा म्हणत होते. आम्ही आता निश्चय केला आहे की, ही मानसिकता बदलून टाकली पाहिजे. आणि नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच यावर्षी 15 ऑगस्टला देशाने एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं आहे. ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा हिशेब लक्षात घेऊन हे धोरण निश्चित केले आहे. यामध्ये आता अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत की, त्यांच्या मंजुरीसाठी फे-या माराव्या लागणार नाहीत. तसेच आधी द्यावी लागत होती, तितके शुल्कही लागणार नाही. मला एक गोष्ट आपल्याला सांगताना  आनंद होताय की, नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्ट अप्समध्ये विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या  ड्रोन निर्मितीचे प्रकल्पही उभे करीत आहेत. लष्कर, नौदल, वायूदलाने भारतीय ड्रोन कंपन्यांना 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त मागणी नोंदवली आहे. आणि ही तर आत्ता कुठे सुरूवात झाली आहे. आपल्याला काही इथंच थांबायचं नाही. आपल्याला ड्रोन तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रणी बनवायचे आहे. म्हणूनच सरकार आवश्यक असणारी सर्व पावले उचलत आहे. मी देशाच्या युवकांनाही सांगू इच्छितो की, तुम्हीही ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने जरूर विचार करा, त्यासाठी पुढे या. 
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून ‘मन की बात’ च्या श्रोता श्रीमती प्रभा शुक्ला यांना मला स्वच्छतेसंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘भारतामध्ये सण-उत्सवांना आपण सर्वजण स्वच्छता साजरी करतो. तशाच प्रकारे जर आपण स्वच्छता, प्रत्येक दिवशी करून ती एक सवय बनवली तर संपूर्ण देश स्वच्छ होईल.’’ मला प्रभा जी यांचे म्हणणे अतिशय पसंत पडले. खरोखरीच जिथं स्वच्छता आहे, तिथं आरोग्य आहे. जिथं आरोग्य आहे, तिथं सामर्थ्य आहे, तिथं समृद्धी आहे. म्हणूनच तर देश स्वच्छ भारत मोहिमेवर इतका जोर देत आहे.
मित्रांनो, मला रांचीच्या अगदी जवळचे एक गाव आहे- सपारोम, नया सराय. इथली जी माहिती मिळाली, ती ऐकून खूप चांगले वाटले. या गावामध्ये एक तलाव होता. मात्र लोक या तलावाच्या जागेतच उघड्यावर शौच करीत होते. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ज्यावेळी सर्वांच्या घरांमध्येच शौचालये बनविण्यात आली तर गावकरी मंडळींनी विचार केला की, आपल्या गावाला  स्वच्छ करण्याबरोबरच सुंदरही बनवू या. मग काय? सर्वांनी मिळून तलावाच्या मोकळ्या जागेत उद्यान बनवले. आज त्या जागी लोकांसाठी, मुलांसाठी, एक सार्वजनिक स्थान बनले आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या जीवनमानातच खूप मोठे परिवर्तन घडून आले आहे. मी आपल्याला छत्तीसगडच्या देऊर गावातल्या महिलांविषयीही सांगू इच्छितो. इथल्या महिला एक स्वमदत समूह चालवतात. आणि सर्वजणी मिळून गावांतल्या चौक-चौरस्ते, इतर रस्ते आणि मंदिरांची सफाई करतात.
मित्रांनो, उत्तरप्रदेशच्या गाझियाबादच्या रामवीर तंवर जींना लोक पाँड मॅन (तलाव पुरूष) म्हणूनही ओळखतात. रामवीर जीं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करत होते. परंतु त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी अशी चेतना निर्माण झाली की नोकरी सोडून ते तलाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतले.  रामवीर जीनी आतापर्यत कितीतरी तलावांची स्वच्छता करून त्यांना पुनर्जिवित केलं आहे.
मित्रांनो, प्रत्येक नागरिक जेव्हा स्वच्छतेची आपली जबाबदारी ओळखेल, तेव्हाच स्वच्छतेचे प्रयत्न पूर्ण तर्हेनं यशस्वी होतात. आता दिवाळीला आम्ही आपल्या घराची साफसफाई करण्याच्या कामी तर लागणारच आहोत. परंतु या दरम्यान आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की, आमच्या घराच्या बरोबरच आमचा शेजारही स्वच्छ राहिल. आम्ही आपलं घर तर स्वच्छ करू, पण आमच्या घरातील घाण आमच्या घराच्या बाहेर, आमच्या रस्त्यांवर जाईल, असं होऊ नये. आणि हां, मी जेव्हा स्वच्छतेविषयी बोलतो तेव्हा कृपा करून सिंगल युज प्लॅस्टिकपासून मुक्ति मिळवण्याची गोष्ट आपल्याला कधी विसरायची नाही. आम्ही हा निर्धार करू की, स्वच्छ भारत अभियानाचा उत्साह कमी होऊ देणार नाही . आम्ही सर्व मिळून आमचा देश संपूर्ण स्वच्छ करू आणि स्वच्छ राखू.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबरचा पूर्ण महिना सणांच्या रंगात रंगला आहे आणि आता काही दिवसांनी दिवाळी तर येतच आहे. दिवाळी, त्यानंतर गोवर्धन पूजा, नंतर भाऊबीज, हे तीन सण तर होतीलच, पण याच दरम्यान छटपूजाही होईल. नोव्हेंबरमध्येच गुरू नानकदेवजी यांची जयंतीही आहे. इतके सण एकाच वेळेस होत असतात तर त्यांची तयारीही खूप अगोदरपासून सुरू होते. आपण सर्व जण खरेदीचे प्लॅन करत असाल, परंतु आपल्याला व्होकल फॉर लोकल हे लक्षात आहे नं...आपण लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल. मला पूर्ण विश्वास आहे की, जी मोहिम आपण सर्वांनी मिळून सुरू केली आहे, ती या सणांच्या काळात आणखी मजबूत होईल. आपण आपल्या इथले जे स्थानिक उत्पादन खरेदी कराल, त्यांबद्दल समाजमाध्यमांमध्ये माहिती द्या. आपल्या बरोबरीच्या लोकांनाही सांगा. पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू.
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

 

 ***

MC/AIR/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

​​



(Release ID: 1766094) Visitor Counter : 395