आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले गांधीधाम येथील ‘आयुष वना’चे उद्‌घाटन

Posted On: 19 OCT 2021 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 ऑक्टोबर 2021

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गांधीधाम शहरातील दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट- रोटरी फॉरेस्ट येथे झालेल्या कार्यक्रमात आयुर्वेदिक वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित ‘आयुष वना’चे उद्‌घाटन केले. दीनदयाळ पोर्ट ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या हरित पट्ट्यातील 30 एकर जमिनीवर हे ‘आयुष वन’ उभारण्यात आले आहे. शहरी भागातील हिरवाईचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कच्छ विभागातील वृक्षांच्या आच्छादनाची घनता वाढविण्यासाठी या वनातील जमिनीवर झाडे लावण्यात येत आहेत.  या वनाच्या उद्घाटनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांनी रोपट्याची लागवड देखील केली. 

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी आयुष वन विकसित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व हितसंबंधीयांचे कौतुक केले आणि भारतातील औषधी वनस्पतींमध्ये असणारी उच्च क्षमता आणि लाभ अधोरेखित केले. भारताच्या औषधोपचारांच्या पारंपरिक पद्धतीमध्ये असणारी क्षमता समजून घेण्यासाठी आयुष मंत्रालयाने हाती घेतलेल्या कामांवर देखील सोनोवाल यांनी प्रकाश टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आयुष उपचार पद्धती जागतिक पातळीवर पोहचली आहे आणि आता या उपचार पद्धतीने स्वास्थ्य राखण्यासाठी जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेल्या मुख्य प्रणालींमध्ये स्थान मिळविले आहे. असे त्यांनी सांगितले.

कच्छचे खासदार विनोद छावडा, गांधीधामच्या आमदार मालती माहेश्वरी तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1764959) Visitor Counter : 238