पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

देशभरात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रसिध्द गायक पद्मश्री कैलाश खेर यांचे गीत प्रसारित

Posted On: 16 OCT 2021 4:36PM by PIB Mumbai

 

देशभरात सध्या सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्याच्या हेतूने प्रसिध्द गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी दृक्श्राव्य पद्धतीने गायलेले गीत आज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते प्रसारित करण्यात आले . केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री  रामेश्वर तेली, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील ज्येष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी या गीताची निर्मिती केली आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की पुढच्या आठवड्यात, भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांनी 100 कोटींचा टप्पा गाठण्यात यश मिळवलेले असेल. मार्च 2020 मध्ये जेव्हा देशात टाळेबंदी लागली तेव्हा आपण या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय सामग्रीसाठी आयातीवर अवलंबून होतो, मात्र थोड्याच कालावधीत या सर्व गोष्टींचे उत्पादन देशात करण्याची क्षमता प्राप्त करून कोणत्याही बिकट प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे हरदीप पुरी यावेळी म्हणाले. पंतप्रधानांचे द्रष्टे नेतृत्व आणि सर्वांनीच दिलेल्या योगदानामुळे हे शक्य होऊ शकले, असे त्यांनी पुढे सांगितले.

लोकप्रिय गायक सामान्य लोकांच्या कल्पनाशक्तीवर चटकन प्रभाव पाडू शकतात आणि कैलाश खेर यांनी गायलेले हे गाणे लोकांच्या मनातील गैरसमजुती दूर करून लसीकरण करून घेण्याविषयी जागृती करू शकतील असा विश्वास केंद्रीय मंत्री पुरी यांनी व्यक्त केला.

देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 97 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनसुख मांडवीया यांनी यावेळी दिली. सरकार आणि जनतेने स्वदेशी लस विकसित करण्याच्या बाबतीत आपल्या वैज्ञानिकांवरील, संशोधकांवरील आणि वैद्यकीय समुदायावरील विश्वास अधिक दृढ केला आणि सर्वांच्या प्रयत्नांनी आपण देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत लस वितरीत करून कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करू शकलो असे त्यांनी सांगितले.

संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून संगीतात इतरांना प्रेरणा देण्याची देखील शक्ती आहे  अशी भावना कैलाश खेर यांनी व्यक्त केली. आज प्रसारित केलेले गीत, लोकांच्या मनातील लसीकरणाबाबतचा संभ्रम दूर करून लसीचा स्वीकार करण्याची मनोभूमिका तयार करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764381) Visitor Counter : 218