पंतप्रधान कार्यालय
भारतीय अंतराळ संघटनेचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
Posted On:
11 OCT 2021 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2021
भविष्यासाठीच्या आपल्या योजना, आपल्या कल्पना ऐकून, आपणा सर्वांचा हुरूप बघून माझा उत्साहही द्विगुणीत झाला आहे.
मित्रहो,
आज देशाचे दोन महान सुपुत्र,भारत रत्न श्री जय प्रकाश नारायण जी आणि भारत रत्न श्री नानाजी देशमुख यांची जयंतीही आहे. स्वातंत्र्या नंतर भारताला दिशा देण्यामध्ये या दोन्ही महान व्यक्तिमत्वांचे मोलाचे योगदान आहे. सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांच्या प्रयत्नातून, राष्ट्रात मोठे परिवर्तन कसे घडवता येते याची प्रेरणा, यांचे जीवन आपल्याला आजही देते. जय प्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांना मी नमन करतो, त्यांना आदरांजली अर्पण करतो.
मित्रहो,
21 व्या शतकातला भारत आज ज्या दृष्टीकोनासह आगेकूच करत आहे, ज्या सुधारणा करत आहे, त्याचा आधार आहे भारताच्या सामर्थ्यावरचा दृढ विश्वास. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारताचे सामर्थ्य जराही कमी नाही. यामध्ये येणारा कोणताही अडथळा दूर करणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे आणि यामध्ये सरकार जराही उणीव ठेवत नाही. आजच्या इतके निर्णयक्षम सरकार या पूर्वी कधीही नव्हते.अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञान यासंदर्भात भारतात ज्या मोठ्या सुधारणा होत आहेत, त्या म्हणजे याच मालिकेचा भाग आहेत. भारतीय अंतराळ संघटना इस्पाच्या निर्मितीसाठी आपणा सर्वांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आपणा सर्वाना शुभेच्छा देतो.
मित्रहो,
आपण जेव्हा अंतराळ सुधारणांविषयी बोलत असतो तेव्हा आपला दृष्टीकोन चार स्तंभावर आधारित आहे. पहिला म्हणजे खाजगी क्षेत्राला नवोन्मेशाचे स्वातंत्र्य, दुसरा म्हणजे सक्षमीकरण करणारा या रूपाने सरकारची भूमिका. तिसरा,भविष्यासाठी युवकांना घडवणे आणि चौथा अंतराळ क्षेत्राकडे सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीचे साधन या रूपाने पाहणे. हे चारही स्तंभ अपार संधींची कवाडे खुली करतात.
मित्रहो,
याआधी अंतराळ क्षेत्राचा अर्थ म्हणजे सरकार असाच होता हे आपल्यालाही मान्य असेल. आम्ही पहिल्यांदा या मानसिकतेत बदल घडवला आणि नंतर अंतराळ क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी सरकार, स्टार्ट अप, परस्परांना सहकार्याचा मंत्र दिला. हा नवा दृष्टीकोन, नवा मंत्र यासाठी आवश्यक आहे
कारण भारतासाठी हा आता रेषीय नवोन्मेशाचा काळ नाही.हा काळ भारतासाठी वेगवान नवोन्मेशाचा काळ आहे.
आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सरकार केवळ हॅन्डलरची भूमिका नव्हे तर सक्षमता प्रदान करणाऱ्याची भूमिका बजावेल. म्हणूनच आज संरक्षण क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रा पर्यंत सरकार आपल्या तज्ञांचे ज्ञान सामायिक करत आहे, खाजगी क्षेत्राला लॉन्चिंग पॅड उपलब्ध करून देत आहे. आज इस्रोच्या सुविधा, खाजगी क्षेत्रासाठी खुल्या केल्या जात आहेत.या क्षेत्रात जे तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते खाजगी क्षेत्राकडेही हस्तांतरित केले जाईल हे सुनिश्चित केले जात आहे . आपल्या युवा संशोधकांना साधने खरेदी करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करावी लागू नये यासाठी सरकार अंतराळ साधने आणि सेवा एकत्रित करणाऱ्याची भूमिका बजावेल.
मित्रहो,
खाजगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी देशाने इन स्पेसची स्थापनाही केली आहे.अंतराळ क्षेत्राशी संबंधित सर्व बाबींसाठी एक खिडकी, स्वतंत्र एजन्सी म्हणून इन-स्पेस काम करेल. यामुळे खाजगी क्षेत्रातल्या संबंधिताना, त्यांच्या प्रकल्पांना अधिक वेग प्राप्त होईल.
मित्रहो,
आपले अंतराळ क्षेत्र, 130 कोटी देशवासीयांच्या प्रगतीचे मोठे माध्यम आहे. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे सर्वसामान्यांसाठी उत्तम आरेखन, प्रतिमा रेखन आणि संपर्क विषयक सुविधा ! आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे उद्योजकांसाठी माल वाहून नेण्यापासून ते पोहोचवण्यापर्यंत उत्तम वेग ! अंतराळ क्षेत्र म्हणजे शेतकरी, मच्छिमारांसाठी हवामानाचा अचूक अंदाज, उत्तम सुरक्षा आणि उत्पन्न !आमच्यासाठी अंतराळ क्षेत्राचा अर्थ म्हणजे जीवसृष्टी,पर्यावरणाची उत्तम जोपासना, नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज, हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याचे रक्षण !देशाची ही उद्दिष्ट आता भारतीय अंतराळ संघटनेचीही उद्दिष्टे झाली आहेत.
मित्रहो,
आज देश एकाच वेळी इतक्या व्यापक सुधारणा पाहत आहे,कारण आज देशाचा दृष्टीकोन सुस्पष्ट आहे. हा दृष्टीकोन आहे आत्मनिर्भर भारत हा दृष्टीकोन. आत्मनिर्भर भारत हा केवळ दृष्टीकोन नव्हे तर तो एक विचारपूर्वक,सुनियोजित, एकात्मिक आर्थिक रणनीतीही आहे.एक असे धोरण जे भारताचे उद्योजक, भारताचा युवा वर्ग यांच्या कौशल्य क्षमता वृद्धिगत करून भारताला जागतिक उत्पादक शक्तीकेंद्र म्हणून घडवेल. एक असे धोरण, जे भारताच्या तंत्रज्ञान विषयक नैपुण्याचा आधार घेत भारताला नवोन्मेशाचे जागतिक केंद्र करेल.एक असे धोरण जे जागतिक विकासात मोठी भूमिका बजावेल,भारताच्या मनुष्य बळ आणि कौशल्याचा मान जागतिक स्तरावर उंचावेल. म्हणूनच आज भारत आपल्याइथे जे नियामक वातावरण निर्माण करत आहे त्यावेळी याकडे लक्ष पुरवले जात आहे की देशहित आणि संबंधित या दोन्हींच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत भारताने संरक्षण,कोळसा आणि खनन यासारखी क्षेत्रे आधीच खुली केली आहेत. सार्वजनिक क्षेत्र उपक्रमा बाबत स्पष्ट धोरणासह सरकार वाटचाल करत आहे. जिथे सरकारची आवश्यकता नाही अशी क्षेत्रे खाजगी उपक्रमांसाठी खुली केली जात आहेत. एअर इंडियाशी निगडीत नुकताच घेतलेला निर्णय आमची कटीबद्धता दर्शवत आहे.
मित्रहो,
गेल्या काही वर्षात, आमचा भर नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासासोबतच त्याचे लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्यावर राहिला आहे. गेल्या सात वर्षात तर आम्ही अवकाश तंत्रज्ञानाचा, शेवटच्या घटकापर्यंत, कुठलीही गळती न होता आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून फायदे पोचवण्यासाठी, एक महत्वाचे साधन म्हणून उपयोग केला आहे. गरिबांच्या घरी, रस्त्यांवर आणि दुसऱ्या पायाभूत प्रकल्पांसाठी जिओ टॅगिंगचा उपयोग असेल, उपग्रह छायाचित्रांच्या मदतीने विकास प्रकल्पांवर देखरेख ठेवणे असो, पिक विमा योजनेअंतर्गत, जलद गतीने दावे निकाली काढणे असो, एनएव्हीआयसी व्यवस्थेद्वारे कोट्यवधी मच्छीमारांची मदत करणे असो, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित नियोजन असो, प्रत्येक पातळीवर अवकाश तंत्रज्ञान, प्रशासनाला सक्रीय आणि पारदर्शक बनवण्यासाठी मदत करत आहे.
मित्रहो,
तंत्रज्ञान जेव्हा सर्वांसाठी उपलब्ध असते, त्यावेळी परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आहे. आज भारत डिजिटल अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांपैकी एक आहे, तर त्यामागे सर्वात मोठे कारण आहे, की आम्ही डेटाची ताकद, गरीबातली गरीब व्यक्ती सहजपणे वापरु शकेल, अशी व्यवस्था केली आहे. यासाठीच, आम्ही आज, जेव्हा आपण अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवकाश क्षेत्रासाठी वापर करण्याच्या शक्यता तपासतो आहोत, तेव्हा आपल्याला त्या नागरिकांचीही आठवण ठेवायची आहे, जे समाजाच्या उतरंडीत शेवटच्या पायरीवर उभे आहेत. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की भविष्यात तंत्रज्ञानाने आपल्याला दूर, दुर्गम गावाताल्या गरिबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत, दूरस्थ आरोग्य सुविधा, उत्तम आभासी शिक्षण व्यवस्था, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्याची उत्तम आणि प्रभावी व्यवस्था, अशा अनेक गोष्टी देशातील प्रत्येक वर्गापर्यंत, कानाकोपऱ्यात पोचवायच्या आहेत. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की या सगळ्यात अवकाश तंत्रज्ञानाचे महत्वाचे योगदान असणार आहे.
मित्रहो,
भारत जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्याच्याकडे अवकाशात एंड टू एंड म्हणजे सगळे स्वबळावर करण्याची क्षमता आहे. आम्ही अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व पैलू जसे की उपग्रह, लाँच व्हेईकल, एप्लिकेशन पासून ते इंटर-प्लॅनेटरी म्हणजे आंतर ग्रहीय अभियानात देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. आपण कार्यक्षमतेला आपल्या ब्रांडचा महत्वाचा भाग बनवले आहे. आज जेव्हा माहितीच्या युगातून आपण अवकाश तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो आहे, त्यावेळी, या कार्यक्षमतेची ब्रँड व्हॅल्यू आपल्याला अधिक सक्षम करायची आहे. अवकाश अन्वेषणची प्रक्रिया असो किंवा मग अवकाश तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान माफक दरात उपलब्ध करून देणे, याला आपल्याला सातत्याने प्रोत्साहन द्यायचे आहे. आपल्या ताकदीने, जेव्हा आपण पुढे वाटचाल करू, त्यावेळी जागतिक आवश्यक क्षेत्रात आपला वाटा वाढणे निश्चित आहे. आता आपल्याला अवकाश क्षेत्रासाठी आवश्यक घटकांचा पुरवठादार असण्याच्या पुढे जात, प्रारंभापासून ते अंतापर्यंतच्या व्यवस्थेतील पुरवठा साखळीचा भाग बनायचे आहे. आणि आपल्या सरांच्या, सर्व हितसंबंधियांच्या भागीदारीतूनच शक्य होणार आहे. एक भागीदार म्हणून सरकार प्रत्येक पायरीवर, उद्योगक्षेत्राला, युवा संशोधकांना, स्टार्ट अप्स ना पाठींबा देत आहे आणि पुढेही देत राहील.
मित्रहो,
स्टार्ट अप्सची एक भक्कम व्यवस्था विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म दृष्टीकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. असा दृष्टीकोन जिथे एक ओपन अॅक्सेस पब्लिक कंट्रोल्ड प्लॅटफॉर्म सरकार तयार करते, आणि त्यानंतर, ते उद्योग आणि आस्थापनांसाठी उपलब्ध केले जात आहे. या बेसिक प्लॅटफॉर्म वर स्वयंउद्योजक नवनवे तोडगे तयार करतात. डिजिटल पेमेंट साठी सरकारने सर्वात आधी युपीआय प्लॅटफॉर्म तयार केला. आज याच प्लॅटफॉर्मवर, फिनटेक स्टार्टअप्स चे नेटवर्क सक्षम होत आहे. अवकाश क्षेत्रातही अशाच प्लॅटफॉर्मच्या दृष्टीकोनाला प्रोत्साहन दिले जात आहे. इस्त्रोच्या सुविधांपर्यंत पोचणे असो, इन्स्पेस असो, नव्या स्पेस इंडिया लिमिटेड असो, अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून स्टार्ट अप्स आणि खाजगी क्षेत्रांना मोठा पाठींबा मिळतो आहे. भू-अवकाशीय मॅपिंग क्षेत्राशी संबंधित नियम आणि कायदेही सुलभ करण्यात आले आहेत. जेणेकरुन स्टार्ट अप्स आणि खाजगी आस्थापना नव्या शक्यतांचा शोध घेऊ शकतील. ड्रोनबाबतही असेच प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहेत, ज्यांच्या मदतीने, वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकेल.
मित्रहो,
आज 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवसही असतो. आपले मंगळयान अभियान यशस्वी झाल्यानंतर, जेव्हा भारताच्या महिला वैज्ञानिक ते यश साजरे करत होत्या, त्याची छायाचित्रे आपल्यापैकी कोण विसरू शकेल? मला विश्वास आहे, अवकाश क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा, या क्षेत्रात महिलांचे योगदान वाढवण्यास नक्कीच मदत करतील.
मित्रहो,
आज इथे आपण सर्वांनीच इतर गोष्टींविषयी देखील आपल्या सुधारणा, सूचना दिल्या आहेत. आपल्या या सूचना आणि सल्ले अशावेळी मिळाले आहेत, जेव्हा स्पेसकॉम धोरण आणि रिमोट सेन्सिंग धोरण अंतिम स्वरूपात आहे. मला विश्वास वाटतो की सर्व हितसंबंधी घटकांच्या सक्रीय सहभागातून देशाला लवकरच एक उत्तम धोरण मिळेल.
मित्रहो,
आज आम्ही जे निर्णय घेऊ, ज्यां धोरणात्मक सुधारणा करू, त्यांचा प्रभाव येणाऱ्या पिढ्यांवर पडणार आहे, येत्या 25 वर्षांवर पडणार आहे. आपण पाहिले आहे, की विसाव्या शतकात, अवकाश आणि अवकाशावर वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीने जगभरातील देशांना कसे दोन भागात विभाजित केले होते. आता एकविसाव्या शतकात, अवकाश आणि जगाला एकत्र जोडण्यात, एकत्रित करण्यात आपल्याला महत्वाची भूमिका पार पाडायची आहे, हे आपल्याला सुनिश्चित करायचे आहे. ज्यावेळी भारत, आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्यावेळी भारत ज्या उंचीवर असेल, ज्यात आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे ठरेल. ही अनुभूती आणि या जबाबदारीचे भाग मनात ठेवूनच, आपल्याला वाटचाल करायची आहे. सर्वांच्या प्रयत्नातूंच लोकहित आणि राष्ट्रहितात, अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी अवकाशातील या अमर्याद संधी आपल्याला नव्या आकाशापर्यंत घेऊन जाणार आहेत. याच विश्वासासह आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !!
* * *
JPS/ST/Nilima/Radhika/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762977)
Visitor Counter : 456
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam