राष्ट्रपती कार्यालय
आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची आशा तेव्हाच करु शकतो जेव्हा तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि दोन्हीची उपलब्धता यांचा समन्वय होईल- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
चामराजनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या चामराजनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अध्यापन रुग्णालयाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
07 OCT 2021 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2021
आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची आशा तेव्हाच करु शकतो जेव्हा तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि दोन्हीची उपलब्धता यांचा समन्वय होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. कर्नाटकमधील चामराजनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या चामराजनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (सीआयएमएस) अध्यापन रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते.
सीआयएमएसच्या सभोवताली अतिशय घनदाट जंगल आहे आणि या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे अनेक लोक असल्याने सार्वत्रिक आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सीआयएमएस प्रशासन आणि कर्नाटक सरकारने त्यांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. देशातील वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्याच्या मूळ उद्देशाला ते अनुसरून असेल असे त्यांनी सांगितले. भारत सरकारने यापूर्वीच एम्सची संख्या 6 वरून 22 वर नेली आहे. तसेच देशभरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार प्रत्येक जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहे, असे त्यांनी सांगितले. नवीन उच्च शिक्षण महाविद्यालये सुरू होऊ लागल्याने सध्या अस्तित्त्वात असलेल्या उच्च शिक्षण संस्थांना देखील उत्कृष्टता केंद्र बनण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, असे ते म्हणाले. मात्र, मनुष्यबळाशिवाय या पायाभूत सुविधा उपयोगी ठरणार नाहीत. आपल्याकडे भक्कम यंत्रणा नसेल तर सर्व तंत्रज्ञान व्यर्थ ठरेल. आपल्याला आपल्या आरोग्य सुविधा देशातील अतिदुर्गम भागापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची आशा तेव्हाच करु शकतो जेव्हा तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि दोन्हीची उपलब्धता यांचा समन्वय होईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761897)
Visitor Counter : 234