कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
स्किल इंडिया अंतर्गत आयोजित ‘राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळावा’ 2021 मधून 51,000 हून अधिक प्रशिक्षणार्थी नियुक्त
देशातील 662 ठिकाणी प्रशिक्षणार्थी मेळाव्याचं आयोजन
30 हून अधिक क्षेत्रांतील 5000 हून अधिक कंपन्या/आस्थापनांचा सहभाग
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2021 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2021
प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) सहकार्याने स्किल इंडिया अंतर्गत आज देशभरात 660 हून अधिक ठिकाणी 'प्रशिक्षणार्थी मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे 51,991 प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यात आले आणि या मेळाव्यात, ऊर्जा, किरकोळ, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन यासह 30 पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये कार्यरत 5000 पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त, देशातील इच्छुक तरुणांना वेल्डर, इलेक्ट्रिशियन, हाऊसकीपर, ब्यूटीशियन, मेकॅनिक आणि इतर अनेक पदांसह 500 हून अधिक व्यवसाय (नियुक्त आणि पर्यायी) करण्याची आणि व्यवसाय निवडण्याची संधी मिळाली.
भारतातील तरुणांना बाजार-संबंधित कौशल्यांचे पुरेसे प्रशिक्षण देण्याची वचनबद्धता अधोरेखित करत, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की या प्रशिक्षणार्थी मेळाव्याच्या माध्यमातून मंत्रालयाला उमेदवारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यादरम्यान सुमारे 52,000 प्रशिक्षणार्थींची नेमणूक झाली, आपण 'स्किल्ड इंडिया' चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील कौशल्य मानके वाढवू शकू, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी 5,000 हून अधिक आस्थापनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेल्या सर्व नियुक्त प्रशिक्षणार्थींचे त्यांनी अभिनंदन केले.
हा मेळावा सहभागी आस्थापनांसाठी एक उत्तम संधी होता, यामुळे एका समान व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थींना भेटण्याची संधी या आस्थापनांना मिळाली आणि ते त्यांच्या गरजेनुसार उमेदवारांची निवड करू शकले. या कार्यक्रमात रेल्वे, ओएनजीसी, टाटा, मारुती उद्योग आणि इतर अनेक महत्त्वाच्या आस्थापनांचा सहभाग होता. या मेळाव्यात सहभागी उमेदवार 5 वी ते 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक, आयटीआय विद्यार्थी, पदवीकाधारक आणि पदवीधर होते.
15 जुलै, 2015 रोजी माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेलेल्या कौशल्य विकास आणि उद्योजकता राष्ट्रीय धोरण, 2015 मध्ये प्रशिक्षणार्थीला पुरेशा मोबदल्यासह कुशल कामगारांना लाभदायक रोजगार देण्याचे साधन म्हणून मान्यता दिली आहे. कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने देशातील उद्योगांद्वारे नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थींची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. कुशल कामगारांच्या पुरवठ्यात आणि मागणीतील तूट भरून काढणे आणि नोकरीचे प्रशिक्षण देऊन आणि रोजगारासाठी चांगल्या संधी मिळवून देऊन भारतीय तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे हा यामागचा हेतू आहे.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1761577)
आगंतुक पटल : 256