उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशात खेळांना प्रोत्साहन देण्याचे उपराष्ट्रपतींचे उद्योगांना आवाहन


मणीपूरमधील ऑलिंपिकपटू आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद

भारताची आघाडीची महिला मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोमकडून उपराष्ट्रपतींना बॉक्सिंग ग्लोव्हजची भेट

Posted On: 05 OCT 2021 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

देशामध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातील उद्योगांना केले आहे. टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताने केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि यापुढे यापेक्षाही जास्त चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्ट ठेवा असे सांगितले. यावेळी त्यांनी राज्यांना देखील चांगल्या क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याची आणि गाव पातळीपर्यंत प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची सूचना केली.

उपराष्ट्रपती ईशान्येकडील राज्यांच्या 8 दिवसांच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी मणीपूरमधील आपापल्या क्षेत्रात  उत्तम कामगिरी करणाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजभवनात उपस्थित असलेल्यांमध्ये ऑलिंपिकपटू, साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्वे, कारागीर आणि शिक्षकांचा समावेश होता. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्तुंग कामगिरी करण्याचे ध्येय ठेवावे, अशी सूचना केली. यावेळी भारताची आघाडीची महिला मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोम यांनी उपराष्ट्रपतींना बॉक्सिंग ग्लोव्हज भेट म्हणून दिले. उपराष्ट्रपतींनी हे ग्लोव्हज स्वतःच्या हातामध्ये चढवले आणि याचा उपयोग मला संरक्षणासाठी होईल असे विनोदाने म्हटले.

मणीपूर म्हणजे खेळांचे उर्जाकेंद्र आहे, असे त्यांनी सांगितले. हे लहान राज्य ज्यावेळी देशाचा गौरव वाढवण्याची वेळ येते त्यावेळी नेतृत्व करते, अशा शब्दात मणीपूरची प्रशंसा केली. मणीपूरच्या ऑलिंपिकपटूंनी राज्याला आणि देशाला अभिमानित केले आहे, असे ते म्हणाले.

भारताचा ध्वज उंचावत ठेवल्याबद्दल या राज्यातील खेळाडूंची प्रशंसा करताना, हे खेळाडू  क्रीडाक्षेत्रात नाव कमावण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या हजारो खेळाडूंसाठी आदर्श ठरतील आणि प्रेरणेचा स्रोत ठरतील असे नायडू म्हणाले.

टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आणि यापुढे अधिक चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761269) Visitor Counter : 191