गृह मंत्रालय
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ सोहळ्यांतर्गत आयोजित केलेल्या एनएसजीच्या ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ या अखिल भारतीय कार रॅलीला दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून झेंडा दाखवून रवाना केले
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2021 8:52PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल एनएसजीच्या ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ या अखिल भारतीय कार रॅलीला दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला येथून झेंडा दाखवून रवाना केले.

अमित शहा यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी ए पी एफ च्या दिल्लीत आगमन झालेल्या अखिल भारतीय सायकल रॅलींचे देखील झेंडा दाखवून स्वागत केले. यावेळी त्यांनी टोकियो ऑलिंपिक मधला पदक विजेता बजरंग पूनिया याला सन्मानित केले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री नित्यानंद राय, श्री अजय कुमार मिश्रा, श्री निशिथ प्रामाणिक आणि भारत सरकार मधील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय गृह सचिव आणि सशस्त्र पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की आजचा दिवस देशासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. आज दोन महान व्यक्तींची जयंती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री यांची आज जयंती आहे. अमित शहा म्हणाले जर आपण भारताचा इतिहास काळजीपूर्वक पाहिला तर 1900 च्या नंतर आजतागायत आपल्याला या दोन्ही महान व्यक्तींनी आपल्या देशावर त्यांच्या महान कार्याचा ठसा उमटवल्याचे दिसेल. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील अन्याय आणि हुकूमशाही याविरोधात आवाज उठवला आणि संपूर्ण जगाला सत्याग्रहाचा मंत्र दिला. भारतात परतल्यानंतर भारतात असलेली पराकोटीची गरीबी, वसाहतवादी राजवटीकडून कल्पनाही करता येणार नाही अशा प्रकारचे शोषण आणि आणि भेदभाव करणारे कायदे पाहिल्यानंतर गांधीजींनी आपले आयुष्य भारत मातेसाठी समर्पित केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही शक्य होईल ते केले.

अमित शहा म्हणाले की लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 च्या युद्धात देशाच्या संरक्षणाचे सर्व आयाम तर बदललेच पण त्याच बरोबर आपल्या दलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शत्रूला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. लोकशाहीमध्ये अतिशय अल्पकालावधीत निस्वार्थ सेवा कशाप्रकारे करता येऊ शकते याचा आदर्श लाल बहादूर शास्त्री यांनी घालून दिला असे अमित शहा यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आज सी ए पी एफ चे सुमारे 1000 कर्मचारी देशभरात अनेक ठिकाणी हजारो हुतात्म्यांना अभिवादन करत राजघाटावर पोहोचले आहेत. अमित शहा म्हणाले की देशभरातून सी ए पी एफने 45 सायकल रॅलींचे आयोजन केले होते. या रॅलींच्या माध्यमातून सुमारे 41 हजार किलोमीटर प्रवास करुन ते सर्व दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. या सायकल रॅलींमध्ये आणि कार रॅलीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की देशभरात सुमारे 41000 किमीचे अंतर कापणाऱ्या या सायकल रॅली आणि आजपासून सुरु झालेली एनएसजीची सुदर्शन भारत परिक्रमा कार रॅली या देशभरात जागरुकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांचा एक भाग आहेत. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आजादी का अमृतमहोत्सवच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सहाय्यकारी ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृतमहोत्सव ची सुरुवात दांडी यात्रा ज्या दिवशी सुरु झाली होती त्या तारखेला केली आणि आता हा अमृत महोत्सव लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करत आहे.

या 7500 किमीच्या प्रवासात आज झेंडा दाखवण्यात आलेली एनएसजीची कार रॅली अतिशय महत्त्वाच्या आणि स्वातंत्र्य चळवळीशी आणि स्वातंत्र्य सैनिकांशी संबंध असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांच्या मार्गावरून प्रवास करणार आहे आणि तिचा समारोप 30 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्लीत होणार आहे. एनएसजीची कार रॅली 12 राज्यातील 18 शहरांमधून प्रवास करेल आणि काकोरी स्मारक(लखनौ), भारत माता मंदीर(वाराणसी), नेताजी भवन बराकपोर(कोलकाता), स्वराज आश्रम( भुवनेश्वर), टिळक घाट( चेन्नई), फ्रीडम पार्क( बंगळूरु), मणी भवन/ ऑगस्ट क्रांती मैदाना(मुंबई) आणि साबरमती आश्रम( अहमदाबाद) या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देईल.
***
G.Chippalkatti/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1760456)
आगंतुक पटल : 355