रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 75 कोटी रुपये खर्चाच्या 527 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण


इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात यावा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Posted On: 02 OCT 2021 3:25PM by PIB Mumbai

 

अहमदनगर/मुंबई, 2 ऑक्टोबर 2021

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज अहमदनगर येथे 4075 कोटी रुपये खर्चाच्या 527 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य  शरद पवार, ग्रामविकास-कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, आदी उपस्थित होते.

केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका आणि इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगलं तसेच स्वस्त असं हरित इंधन आहे, आपल्या भागातील सर्व वाहने शंभर टक्के इथेनॉल वर चालली गेली पाहिजेत असे ते म्हणाले. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आपल्या देशात गेल्या वर्षी 465 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आणि आपल्याला साडेसोळाशे कोटी लिटर इतकी इथेनॉलची गरज आहे, त्यामुळे जेवढे इथेनॉल तयार केले जाईल तेवढे भारत सरकार घेईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण आपल्या देशात 12 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल, पेट्रोल डिझेल, गॅस आयात करत आहोत. भारत सरकारने इथेनॉलच्या पंपांना परवानगी दिली आहे, त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी आपल्या क्षेत्रात इथेनॉल पंप सुरू केले पाहिजेत असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात जर इथेनॉल इंधन उत्पादित केलं गेलं तर आयातही कमी होईल आणि बारा लाख कोटी रुपयांपैकी पाच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, उसाला चांगला भाव मिळेल आणि शेतकरीही गरीब राहणार नाहीत असे ते म्हणाले.

देशात साखरेची गरज 240 लाख टन इतकी आहे, तर गेल्या वर्षी आपल्या देशात 310 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, 70 लाख टन इतकी यातिरिक्त साखर उत्पादित झाली आहे, साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलचे उत्पादनावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले. भारत सरकार पॉवर परचेस एग्रीमेंट प्रमाणे पाच वर्षांकरिता इथेनॉल पर्चेस एग्रीमेंट करायला तयार आहे असेही ते म्हणाले.

आपल्या देशाच्या विकासात पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण महत्त्वाचे आहे, देशात उद्योग आले की  भांडवली गुंतवणूक येते आणि त्यामुळे रोजगार निर्माण होतो. देशातील गरीबी, उपासमारी, बेरोजगारी दूर करायची असेल तसेच गाव, गरीब, मजूर, शेतकरी यांचं कल्याण करायचे असेल तर रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि रोजगार निर्मितीसाठी पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र विकसित केले पाहिजे असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून देईल तिथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्त्रियल क्लसटर्स, ट्रांसपोर्ट नगर उभारण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. साखर कारखानदारी आणि दूध उत्पादन यामुळे पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला आहे असेही त्यांनी नमूद केले.

अहमदनगर मधील केडगांव येथे आयोजित 25 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या प्रकल्पांचे कामकाज करण्यात येणार आहे. यावेळी अहमदनगर-फलटण, अहमदनगर-जामखेड, कोपरगांव-औरंगाबाद, नांदूर ते कोल्हार आणि झगडे फाटा- कोपरगांव या राष्ट्रीय महामार्गावरील 210 किलोमीटर पर्यंत रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160, 516/, 61548/डी यांचे भारतमाला योजनेंतर्गत दुपदरीकरण व चौपदरीकरणांच्या कामांचे तसेच केंद्रीय राखीव निधी मधून अहमदनगर जिल्ह्यात 14 अंतर्गत रस्त्यांचे दुरूस्तीकरणांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात 4075 कोटी रूपयांच्या निधीतून 527 किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

अहमदनगर साठी महत्वपूर्ण ठरतील असे तळेगांव - पाटोदा (रा.म.५४८) जामखेड-सौताळा (बीड-१३५ कोटी) व कोपरगांव - सावळी विहीर-(१५० कोटी) या रस्ते कामांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

 

https://youtu.be/vshjHr6wl0U

***

S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760322) Visitor Counter : 429