श्रम आणि रोजगार मंत्रालय

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांचा त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण अहवाल जारी


तिमाही रोजगार सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीतील नऊ निवडक क्षेत्रांमध्ये एकूण अंदाजित रोजगार 3 कोटी 8 लाख, 2013-14 च्या तुलनेत रोजगारात 29% दराने वाढ

Posted On: 27 SEP 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2021

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज या आर्थिक वर्षातील एक्यूईईएस अर्थात अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापनाधारित रोजगार सर्वेक्षण अहवालाचा भाग असलेला पहिल्या तिमाहीसाठीचा (एप्रिल ते जून 2021) त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण अहवाल जारी केला. हा अहवाल श्रम मंडळाने तयार केला आहे.

निवडक नऊ क्षेत्रांतील संघटीत आणि असंघटीत अशा दोन्ही विभागांतील आस्थापनांमधील रोजगार आणि संबंधित घटकांबद्दल नियमित (त्रैमासिक)अद्यतने पुरविण्यासाठी श्रम मंडळाने एक्यूईईएस सर्वेक्षण कार्य हाती घेतले आहे. बिगर-शेती आस्थापना प्रकारातील एकूण रोजगारापैकी बहुतांश रोजगार या निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे उपलब्ध आहेत. उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि उपहारगृहे, माहिती तंत्रज्ञान/बीपीओ आणि आर्थिक बाबींशी संबंधित सेवा ही नऊ निवडक क्षेत्रे आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली,  केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुनील बर्थवाल, मुख्य श्रम आणि रोजगार सल्लागार डी.पी.एस. नेगी आणि श्रम मंडळाचे महासंचालक आय.एस. नेगी उपस्थित होते. अखिल भारतीय सर्वेक्षणविषयक तज्ञ गटाचे अध्यक्ष प्रा. एस.पी.मुखर्जी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

 

सर्वेक्षण अहवालातील निकाल जाहीर करताना केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की नऊ निवडक क्षेत्रांतील एकत्रितपणे विचार करता सहाव्या आर्थिक जनगणना अहवालात (2013-14)दिसून आलेल्या एकूण 2 कोटी 37 लाख रोजगारांच्या तुलनेत 29% विकासदर नोंदवत त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण अहवालाच्या पहिल्या फेरीत अंदाजित एकूण रोजगार सुमारे 3 कोटी 8 लाख असल्याचे दिसून आले.

कोविड-19 महामारीचा परिणाम झाल्यामुळे कपात झालेल्या किंवा उतरणीस लागलेल्या रोजगारांबाबत माहिती देताना केंद्रीय श्रम मंत्री म्हणाले की एकूण आस्थापनांपैकी 27% आस्थापना बाधित झाल्या आहेत असे दिसून आले, मात्र यातही उल्लेखनीय बाब म्हणजे टाळेबंदीच्या काळात (25 मार्च ते 30 जून 2020) 81% कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन मिळाले आहे.

Click here for full report

* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1758574) Visitor Counter : 267