पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा शुभारंभ


आयुष्मान भारत डिजिटल अभियानामुळे विविध डिजिटल आरोग्य व्यवस्थेत, विनासायास परस्परसंबध निर्माण करणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल

‘जन-धन-आधार-मोबाईल’ या त्रिसूत्रीइतके परस्परनिगडीत व्यापक डिजिटल पायाभूत सुविधा जाळे जगात अन्यत्र कुठेही नाही : पंतप्रधान

‘डिजिटल सुविधा, जलद आणि पारदर्शक पद्धतीने ‘रेशनपासून ते प्रशासनापर्यंत’ सर्व सेवा देशातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवत आहेत

टेलीमेडीसिन व्यवस्थेचाही अभूतपूर्व विस्तार झाला आहे

“आयुष्मान भारत-पीएमजेएवाय योजनेमुळे गरिबांच्या आयुष्यातील महत्वाच्या समस्येवर तोडगा मिळाला आहे. आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक भारतीयांनी या योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेतला असून त्यातील अर्ध्या महिला आहेत

“आयुष्मान भारत- डिजिटल अभियानामुळे आता, देशभरातील रुग्णालयांना डिजिटल आरोग्य सुविधेमार्फत एकमेकांशी जोडता येईल

सरकारने आणलेल्या आरोग्य सुविधा देशाचे वर्तमान आणि भविष्य सुदृढ करणारी एक मोठी गुंतवणूक आहे- पंतप्रधान

"जेव्हा आपल्या आरोग्य पायाभूत सुविधा एकात्मिक होतील, मजबूत होतील, त्यावेळी पर्यटन क्षेत्रालाही त्याचा लाभ मिळेल.”

Posted On: 27 SEP 2021 2:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियाना’चा शुभारंभ झाला.

यावेळी बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सात वर्षांत, देशातल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने जे अभियान सुरु आहे, ते अभियान आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. “आज आम्ही अशा एका अभियानाची सुरुवात करत आहोत, ज्यात भारतातील आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.

130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल ग्राहक, सुमारे 80 कोटी इंटरनेट वापरकर्ते, सुमारे 43 कोटी जनधन बँक खाती, इतक्या व्यापक प्रमाणात परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा जगात इतर कुठेच नाहीत, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या डिजिटल सुविधा, रेशनपासून ते प्रशासनापर्यंत जलद, पारदर्शक पद्धतीने सर्व लाभ आणि सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

कोरोना संक्रमण रोखण्यात आरोग्य सेतू अँपची मोठी मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, 'सर्वांना लस, मोफत लस' अभियानाअंतर्गत, भारतात आज सुमारे 90 कोटी अशा विक्रमी संख्येने लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यात Co-WIN पोर्टलची भूमिकाही अतिशय महत्वाची ठरली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा संकल्पनेवर अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगतांनाच, कोरोना काळात देशातील टेलिमेडिसिन सेवेचाही अभूतपूर्व विस्तार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. आतापर्यंत, या ई-संजीवनी योजनेअंतर्गत, 125 कोटी लोकांनी दूरस्थ उपचार-सल्ला व्यवस्थेचा लाभ घेतला, असे ते म्हणाले. ही सुविधा, दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या सर्व लोकांना शहरातील मोठमोठ्या रुग्णालयांमधल्या डॉक्टरांशी घरबसल्या जोडण्याचे काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे गरिबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्येवर समाधान मिळाले आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक देशबांधवांनी या योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेतला असून, त्यातील अर्ध्या महिला आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकांना, गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलण्यासाठीच्या अनेक कारणांपैकी, आजार-अनारोग्य हे महत्वाचे कारण असून, याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो कारण, त्या कायमच आपल्या आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आपण आयुष्मान भारत योजनेच्या काही लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला असता, या योजनेचा त्यांना किती लाभ झाला, याचे अनुभव थेट ऐकता आले, असे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक समस्यांवरील या उपाययोजना, देशाचे सुदृढ वर्तमान आणि भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक आहे, असेही ते म्हणाले.

आयुष्मान भारत-डिजिटल अभियानामुळे, देशभरातील रुग्णालये, डिजिटली एकमेकांशी जोडली जातील, असे पंतप्रधान म्हणाले. या अभियानामुळे, रुग्णालयातील सर्व प्रक्रिया तर सुलभ होतीलच, त्याशिवाय, जीवनमान सुलभ होण्यासही मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या अंतर्गत, देशातील प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल आरोग्य कार्ड मिळेल आणि त्यांची सर्व आरोग्यविषयक माहिती, डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवली जाईल.

आता भारतात एक असं आरोग्य मॉडेल विकसित केलं जातं आहे, जे सर्वंकष असेल, सर्वसमावेशक असेल, असे त्यांनी सांगितले. एक असं मॉडेल, ज्यात आजार प्रतिबंधनावर भर दिला जाईल आणि  आजार झाल्यास त्यावरील उपचार सुलभ व्हावेत, परवडणारे असावेत आणि सर्वांच्या आवाक्यातले असावेत, अशी व्यवस्था केली जाईल. वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला. सात-आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत, देशात आता पुष्कळ मोठ्या संख्येने, डॉक्टर आणि निमआरोग्य मनुष्यबळ निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. एम्सचे सर्वंकष जाळे निर्माण करण्यासोबतच, इतर आधुनिक वैद्यकीय संस्था देशात स्थापन करण्यात येत आहेत. त्याशिवाय, देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात, किमान एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठीचे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गावांमधील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे मजबूत करण्याचाही त्यांनी उल्लेख केला. देशात आतापर्यंत अशी 80 हजार पेक्षा अधिक केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजचा हा कार्यक्रम जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे, याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की आरोग्य आणि पर्यटनाचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे. कारण ज्यावेळी देशातील, आरोग्य पायाभूत सुविधा एकात्मिक आणि सुदृढ असतात, त्यावेळी त्याचा सकारात्मक परिणाम पर्यटन क्षेत्रातही होतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758544) Visitor Counter : 451