ऊर्जा मंत्रालय

आरइसी लिमिटेड व जे-पीएएल दक्षिण आशिया, डेटा सामायिकीकरणासाठी करारबद्ध


करारामुळे ग्राहक सेवा वितरण सुधारेल व ग्राहकांसाठी विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करता येईल

Posted On: 22 SEP 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2021 

 

ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी कंपनी आर इ सी लिमिटेड, व अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब (J -PAL) दक्षिण आशिया या दोघांच्या भागीदारीतून देशभरातील 79 सार्वजनिक व खाजगी ऊर्जा वितरण कंपन्यांचे (DISCOMS) डेटा आधारित मूल्यांकन केले जाणार आहे. यामुळे ग्राहक सेवा वितरण सुधारेल व ग्राहकांसाठी  विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करता येईल.

या भागीदारीमध्ये आर इ सी व जे-पीएएल दक्षिण आशिया या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन देशातील ऊर्जा वितरण कंपन्यांच्या सर्व उपलब्ध डेटा अभ्यासून त्यातील समस्या तसेच ऊर्जा पुरवठ्याच्या दर्जातील उणीवा शोधून काढतील. या विदेचा उपयोग करून ते एक ग्राहक सेवा निर्देशांक स्थापित करतील, ज्याच्या आधारे कंपन्यांना त्यांच्या सेवांच्या गुणवत्तेनुसार स्थान दिले जाईल. यासाठी कंपन्यांच्या ग्राहक सेवेचा दैनंदिन कालावधी, तक्रार निवारण व्यवस्था, शुल्क आकारणीचा तपशील व कालावधी, इ मापदंडांचा वापर केला जाईल.

देशातील ऊर्जा वितरण कंपन्यांच्या वार्षिक मूल्यांकनातून  निदर्शनाला येणाऱ्या अडचणी शोधणे, त्यांच्या  निवारणासाठी रँडमाइज्ड इवॅलुएशन्स द्वारे संभाव्य उपाययोजना शोधणे, हे आरइसी व जे-पीएएल दक्षिण आशिया यांचे काम असेल. अचूक व पारदर्शक बिल आकारणीसाठी स्मार्ट मीटर सारख्या उपायांची परिणामकारकता तपासण्यासाठी व्याप्ती अभ्यास वापरणे, तसेच आरइसी च्या इतर उपक्रमांचे मूल्यमापन करणे हे काम जे-पीएएल दक्षिण आशिया करणार आहे.

या भागीदारीतून ऊर्जा वितरण कंपन्यांना त्यांच्या सेवांमधील उणीवा शोधून काढण्यासाठी एक पारदर्शक व पुरावाधिष्ठित मार्ग मिळेल. त्याशिवाय वीज नियम (ग्राहक हक्क) 2020 चे पालन करत विश्वसनीय ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करता येईल. ऊर्जा पुरवठादार कंपन्यांचा हा वार्षिक क्रमवारी अहवाल सामान्य जनतेला उपलब्ध असेल. सर्व राज्यांमधील वीज पुरवठादारांची जबाबदारीही यातून अधोरेखित होईल.

आरइसी चे कार्यकारी संचालक आर लक्ष्मणन (IAS) व जे-पीएएल दक्षिण आशिया च्या कार्यकारी संचालक शोभिनी मुखर्जी यांनी एका समारंभात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आरइसी लिमिटेड ला तंत्रज्ञानविषयक मदत देण्यासाठी  जे-पीएएल दक्षिण आशिया तर्फे प्रा. निकोलस रायन (येल विद्यापीठ; जे -पाल शी संलग्न प्राध्यापक) यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांचे एक पथक नेमण्यात आले असून, डेटा संकलन व त्याचा वापर करून क्षमता विकसनासाठी देखील हे पथक मदत करेल.

 

* * *

S.Tupe/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757026) Visitor Counter : 182