युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आगामी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धां आणि तळाच्या स्तरावर क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याकरिता आराखडा आखण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी साधला राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडा मंत्र्यांशी संवाद
भारतातल्या क्रीडा पायाभूत सुविधांसाठी एकात्मिक डॅशबोर्ड तयार करण्यात येणार : अनुराग ठाकूर
Posted On:
20 SEP 2021 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2021
ठळक वैशिष्ट्ये:
- खेळाडूंच्या रोख पारितोषिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अशी दोन्ही सरकारे निधी जमा करू शकतील असा सामायिक संचय करण्याबाबत मंत्रालयाने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. याद्वारे पदक जिंकल्यानंतर सर्व राज्यांच्या खेळाडूंना समान लाभ मिळेल.
- डॅशबोर्डवर प्रत्येक राज्य,जिल्हा आणि विभाग स्तरावरच्या क्रीडा पायाभूत सुविधांचा डाटा उपलब्ध होईल.
- भविष्यातल्या क्रीडा स्पर्धांसाठी आपल्या खेळाडूंना सज्ज करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण,शैक्षणिक संस्था,केंद्र सरकार आणि संबंधीतांसह सर्व राज्य सरकारेही एकत्र काम करतील : केंद्रीय क्रीडा मंत्री
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज देशभरातल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडा मंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. टोक्यो मधल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या चमकदार यशाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातल्या ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यासाठी खेळाडू सज्ज करण्यासाठी आराखडा आखण्यासाठी आणि तळातल्या स्तरावर क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्ये कसे योगदान देत आहेत याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या आभासी बैठकीत क्रीडा विभागाचे सचिव रवी मित्तलही सहभागी झाले.
खेळाडूंच्या रोख पारितोषिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अशी दोन्ही सरकारे निधी जमा करू शकतील असा सामायिक संचय करण्याबाबत मंत्रालयाने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी प्रतिक्रिया पाठवाव्यात असे मंत्र्यांनी या चर्चेदरम्यान आवाहन केले. याद्वारे पदक जिंकल्यानंतर सर्व राज्यांच्या खेळाडूंना समान लाभ मिळेल.क्रीडा हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. क्रीडा पटू आणि पॅरा क्रीडापटू म्हणजेच दिव्यांग क्रीडापटूसाठी ग्रामीण, शहरी भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि तळापर्यंतच्या स्तरातून प्रतिभावान खेळाडू ओळखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आवाहन करण्याचा या संवादामागचा उद्देश होता. शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन आणि भारतीय शालेय क्रीडा संघटनेला सहाय्य या महत्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली.
आजची बैठक अतिशय फलदायी झाली. वर्षातून किमान दोन वेळा अशी बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेण्यावर आमचे एकमत झाले आहेत अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर दिली. यामुळे आपण उत्तम मूलभूत सुविधा अधिक प्रशिक्षक, कोच आणि फिजिओथेरपिस्ट यांची व्यवस्था करू शकू असे त्यांनी सांगितले.
विविध विभागांमध्ये आपण विभागीय बैठकी आयोजित करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय एक डॅशबोर्ड तयार करून त्यावर प्रत्येक राज्य, जिल्हा किंवा विभागातील क्रीडा क्षेत्रामधील पायाभूत सुविधांची माहिती ठेवता यावी यासाठीही आम्ही काम करत आहोत असे त्यांनी सांगितले. या डॅशबोर्डमुळे उपलब्ध प्रशिक्षक, एखाद्या ठिकाणच्या इनडोअर किंवा आऊटडोअर स्टेडियम मध्ये खेळले जाणारे खेळ आणि इतर संबंधित माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध होईल. वेगवेगळ्या क्रीडांसाठी क्रीडाकौशल्य-शोध कार्यक्रम राबवले जातील, जेणेकरून खेळाडूंना लहान असतानाच हेरून भावी स्पर्धांसाठी त्यांना प्रशिक्षण देता येईल.
राज्यांनी अधिकाधिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना जिल्हा पातळीवर राज्यपातळीवर आणि पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आपले कौशल्य दाखवण्यास व विकसित करण्यास संधी द्यावी, अशा सूचना राज्यांना दिल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. सध्या 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 24 खेलो इंडिया राज्य पातळीवरील उत्कृष्टता केंद्रे असून 360 खेलो इंडिया केंद्रे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी उघडली गेली आहेत. भारतातील भावी क्रीडापटूंना सर्वोत्तम प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा यांच्यासह सर्व अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी राज्यांनी त्यांच्या संपूर्ण क्षमतेने सहकार्य करावे अशी विनंती ठाकूर यांनी राज्यांना केली.
* * *
M.Chopade/N.Chitale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756512)
Visitor Counter : 296