पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद


संपूर्ण पात्र लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लसीची किमान एक मात्रा देणारे हिमाचल प्रदेश ठरले भारतातील पहिले राज्य

जगातील सर्वात मोठ्या आणि वेगवान लसीकरण मोहीमेला देशातील ग्रामीण भाग सबळ करीत आहे हे हिमाचलने केले सिद्ध : पंतप्रधान

नवी ड्रोन नियमावली आरोग्य आणि कृषी यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी सहाय्यकारक ठरेल : पंतप्रधान

महिला स्वयंसहायता गटांसाठीचा आगामी विशेष ऑनलाइन प्लॅटफॉर्म आपल्या भगिनींना त्यांच्या उत्पादनांची देशात आणि परदेशात विक्रीसाठी मदत करेल : पंतप्रधान

हिमाचलची भूमी रसायनांपासून मुक्त करत 'अमृत काळात' हिमाचलला पुन्‍हा सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे हिमाचलच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 06 SEP 2021 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2021

 

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.

संवादादरम्यान, दोदरा क्वार शिमला, येथील सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. राहुल यांच्याशी बोलताना, लसींचा अपव्यय कमी राखल्याबद्दल पंतप्रधानांनी या चमूची प्रशंसा केली  आणि दुर्गम भागामध्ये सेवा बजावण्याच्या त्यांच्या अनुभवाबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. थुनाग, मंडी येथील लसीचे लाभार्थी दयाल सिंह यांच्याशी बोलताना लसीकरणाच्या सोयी सुविधा आणि लसीकरणाबाबतच्या अफवांना ते कसे सामोरे गेले याची पंतप्रधानांनी चौकशी केली. लाभार्थ्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधानांनी हिमाचलच्या पथकाचे सांघिक प्रयत्नाबद्दल कौतुक केले. लसीकरण मोहिमेतील अनुभव जाणून घेताना पंतप्रधानांनी कुलू येथील आशा कर्मचारी निर्मला देवी यांच्याशी संवाद साधला. लसीकरण मोहिमेमध्ये त्यांनी स्थानिक परंपरांचा कसा वापर करून घेतला याबाबत पंतप्रधानांनी जाणून घेतले. पथकाकडून विकसित करण्यात आलेल्या संवाद माध्यमाचे आणि सहकार्य पद्धतीच्या नमुन्याची प्रशंसा केली. त्यांचे पथक कशाप्रकारे दूर-दूरचे अंतर पार करून लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जात असे, याची पंतप्रधानांनी चौकशी केली.

हमीरपूर, येथील निर्मला देवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना आलेल्या अनुभवांविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली, लसींचा पुरेसा पुरवठा केल्याबद्दल या ज्येष्ठ नागरिकांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि मोहिमेला शुभेच्छा दिल्या. हिमाचलमध्ये राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक योजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. उना येथील कर्मो देवीजी,यांनी  22500 लोकांचे लसीकरण केले आहे. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर असताना देखील त्यांनी लसीकरण मोहिमेसाठी दाखविलेल्या धैर्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही कर्मो देवी यांच्यासारख्या लोकांमुळे जारी आहे. अध्यात्मिक नेता या माध्यमातून लाहौल आणि स्पिती येथील नवांग उपाशक यांनी कशाप्रकारे नागरिकांना लस घेण्यासाठी लोकांना प्रेरित केले, याबाबत पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. अटल बोगद्याचा या प्रदेशातील जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल देखील मोदी यांनी यावेळी संवाद साधला. उपाशक यांनी प्रवासाचा वेळ कमी करणे आणि सुधारित कनेक्टीव्हिटीबद्दल माहिती दिली. लाहुल स्पितीला लसीकरण मोहिमेचा सर्वात वेगवान अवलंब करण्यास सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी बौद्ध नेत्यांचे आभार मानले.

जनसमुदायाला संबोधताना, पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीच्या विरुद्धच्या लढ्यात हिमाचल प्रदेश चाम्पियन म्हणून उदयास आला आहे. ते पुढे म्हणाले की, हिमाचल हे भारतातील पहिले राज्य बनले आहे, ज्याने त्याच्या संपूर्ण पात्र लोकसंख्येला कोरोना लसीची  किमान एक मात्रा दिली आहे. या यशामुळे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

नागरिकांचे धैर्य आणि कष्ट यांचाच परिणाम म्हणजे भारतात झालेल्या लसीकरणाचे यश आहे, असे ते म्हणाले. भारत आज दिवसाला सव्‍वा कोटी मात्रा देऊन विक्रम नोंदवत आहे. याचाच अर्थ असा की, भारतात एका दिवसात लसीकरणाची संख्या ही अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. लसीकरण मोहिमेतील सहभागाबद्दल पंतप्रधानांनी डॉक्टर्स, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि महिलांचे कौतुक केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी 'सबका प्रयास' बद्दल बोलल्याचे स्मरण करत  ते म्हणाले की हे यश त्याचाच आविष्कार आहे. हिमाचल ही देव भूमी असल्याचे सांगत त्यांनी या संदर्भात संवाद आणि सहयोगाने काम करण्याच्या पद्धतीची प्रशंसा केली.

लाहौल – स्पिती, सारखा  दुर्गम जिल्ह्यादेखील हिमाचलमध्ये लसीची पहिली मात्रा100 % देण्यात आघाडीवर असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा असा भाग आहे जो अटल बोगदा बांधण्यापूर्वी, महिना-महिने देशाच्या उर्वरित भागांपासून दळणवळणाच्या दृष्टीने विलग रहात असे. लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ न दिल्याबद्दल त्यांनी हिमाचलच्या लोकांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, कशा प्रकारे देशाचा ग्रामीण समाज देखील जगातल्या सर्वात मोठ्या आणि वेगवान लसीकरण मोहिमेला सबळ, सक्षम करू शकतो, हे हिमाचलने सिद्ध करून दाखवले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, बळकट दळणवळणाच्या क्षमतेचा थेट फायदा पर्यटनाला देखील मिळत आहे, फळे आणि भाजीपाला उत्पादित करणारे शेतकरी आणि बागायतदारांना देखील तो मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा वापर करीत, हिमाचल मधील युवा प्रतिभा त्यांची संस्कृती आणि पर्यटनाच्या नवीन संधी देशापर्यंत आणि परदेशातही पोहोचवू शकतात.  

अलिकडेच अधिसूचित ड्रोन नियमांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, हे नियम आरोग्य आणि कृषी यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मदत करतील. यामुळे नवीन शक्यतांसाठी द्वारे खुली असतील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या आणखी एका घोषणेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, आता केंद्रसरकार महिला स्वयंसहायता गटांसाठी ऑनलाइन प्लाटफॉर्म तयार करणार आहे. त्यांनी असे देखील सांगितले की, या माध्यमातून आपल्या भगिनींना त्यांनी तयार केलेली उत्पादने देशभरात आणि जगभरात विकता येणे शक्य होईल. प्रत्येकाला लागणारे सफरचंद, संत्री, किन्नू, मशरूम, टोमॅटो आणि अशी अनेक उत्पादने त्यांना आता देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचविता येतील.  

आझादी का अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, पंतप्रधानांनी हिमाचलमधील शेतकरी आणि बागायतदारांना पुढील 25 वर्षांच्या आत हिमाचलमधली शेती सेंद्रीय करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हळूहळू आपल्याला आपली भूमी रसायनांपासून मुक्त करावी लागेल.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752539) Visitor Counter : 576