उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विभाजनकारी शक्तींशी झुंज देऊन राष्ट्राची एकात्मता बळकट करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपतींचा भर

Posted On: 04 SEP 2021 3:47PM by PIB Mumbai

 

धर्म, प्रादेशिकता, भाषा, जाती, पंथ किंवा रंग अशा बाबींवरून समाजात फूट पाडणाऱ्या विभाजनकारी शक्तींशी झुंज देण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी आज केले. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी प्रत्येक भारतीयाने एकात्मता बळकट करण्याची तसेच आपल्या बहुविध प्रकारच्या समाजात सुसंवाद कायम राखण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे असेही ते म्हणाले.

हैदराबाद येथील श्री अरबिंदो इंटरनॅशनल स्कूल या शाळेत श्री अरविंद यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी भारताच्या उज्वल व महान भवितव्यासाठी सर्व प्रकारचे भेद  सांधण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

धर्माची सकारात्मक बाजू विशद करताना ते म्हणाले की जेव्हा प्रत्येक जण आपापल्या धर्माचे खऱ्या अर्थाने पालन करेल तेव्हा कोणत्याही प्रकारचे धार्मिक संघर्ष उद्भवणार नाहीत.

भारताच्या अध्यात्मिक शहाणीवेच्या परंपरेला पुन्हा साद घालून, त्या धर्तीवर वैश्विक संदर्भ असलेल्या आणि कालसुसंगत अशा नव्या जाणिवा  आणि अभिव्यक्ती विकसित करायला हव्यात, असे  भारतीय अध्यात्मिकतेबद्दल श्री अरबिंदो यांचा दृष्टिकोन उलगडून सांगताना  नायडू म्हणाले.

भारत मातेला स्वतःचा खजिना सखोलपणे पाहण्याची गरज आहे असे सांगून त्यांनी भारतीय युवावर्गाला पाश्चिमात्यांच्या निव्वळ नकलेऐवजी आत्मनिर्भर होण्यासाठी आणि स्वतःची विचार शक्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले.

आपल्या दैदिप्यमान सांस्कृतिक परंपरांचा अभिमान नव्या पिढीत जागवण्यासाठी भारताच्या इतिहासाचे भारतीय दृष्टिकोनातून पुनर्लेखन करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

अध्यात्मिकता ही  भारताच्या महान संस्कृतीची गुरुकिल्ली असून या संस्कृतीचे पालन आपल्या दिनचर्येत करून तिच्या महानतेचा पुनर्शोध घेतला पाहिजे असे सांगत, नायडू यांनी भारताच्या संस्कृतीची  आणि परंपरांची  पुनर्स्थापना करण्याचे स्पष्ट आवाहन श्री अरविंद यांनी  केले होते याचे  स्मरण जागवले. जीडीपीचा विकास आणि संपत्तीचे निर्माण हेच अंतिम उद्दिष्ट नसून लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचे ते मार्ग आहेत. लोकांच्या जीवनातील आनंद हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.  शिक्षणाचा उद्देश फक्त रोजगार मिळवणे एवढाच नसून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी घ्यायला हवे असे आवर्जून सांगत उपराष्ट्रपती यांनी भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याचे आवाहन केले. जगावर राज्य करण्यासाठी नव्हे तर ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवण्यासाठी भारताने विश्वगुरुत्व स्वीकारले पाहिजे असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेमुळेच भारताला स्वतःचे सामर्थ्य लक्षात येईल, असे श्री अरबिंदो यांच्या म्हणण्याचा दाखला देत उपराष्ट्रपती म्हणाले. श्री अरबिंदो यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी भारताच्या युवावर्गाला केले.

संपूर्ण मानव जातीचे उत्थान हा श्री अरबिंदो यांच्या शिकवणुकीचा गाभा होता असे सांगून त्यांचा दृष्टिकोन भारतभर तसेच संपूर्ण जगात घेऊन जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही नायडू यांनी केले. श्री अरविंद यांच्या अध्यात्मिक शिकवणीच्या माध्यमातून मुलांना प्रेरित करण्याच्या कार्याबद्दल त्यांनी 'श्री अरबिंदो इंटरनॅशनल स्कूल' या शाळेची प्रशंसा केली.

***

R.Aghor/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1751993) Visitor Counter : 112