रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय मुद्रीकरण योजना आणि “गति शक्ती” राष्ट्रीय महायोजनेमुळे पायाभूत सुविधांचा सर्वांगीण आणि एकात्मिक विकास होईल आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील-नितीन गडकरी

Posted On: 31 AUG 2021 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय मुद्रीकरण कार्यक्रम विकासक आणि वित्तपुरवठादार  संस्थांमध्ये विश्वासार्हता आणि आत्मविश्वास निर्माण करेल, निवडण्यात आलेले  प्रकल्प अधिक चांगले तयार केले जातील, सक्रिय प्रकल्प देखरेख , व्यवस्थापन आणि दायित्वामुळे जोखीम कमी होण्याची शक्यता आहे. 'भारताच्या गतिशीलतेचे परिवर्तन ' या विषयावर व्हर्च्युअल संवादाला संबोधित करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेत रस्त्यांचा 26 टक्के सर्वाधिक वाटा  आहे आणि 4 वर्षांमध्ये एक लाख साठ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य आहे. सरकार लवकरच पंतप्रधानांची 'गती शक्ती' राष्ट्रीय महायोजना सुरु करणार आहे असे ते म्हणाले. सर्वंकष  आणि एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची ही योजना, मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल. ते म्हणाले की, यावर्षी सरकारने वार्षिक पायाभूत भांडवली खर्च 34 % ने वाढवून  5.54 लाख कोटी रुपये केला आहे. पायाभूत सुविधांमधील ही  वाढलेली गुंतवणूक अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करेल आणि नजीकच्या भविष्यात रोजगार निर्माण करेल.

ते म्हणाले की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्यत्वे दोन मार्गांद्वारे रस्ते मुद्रीकरण करण्याचा विचार करत आहे-  एक टीओटी टोल ऑपरेट ट्रान्सफर  आणि दुसरा  इन्व्हिट . ते म्हणाले की एनएचएआयसाठी टीओटीमधून  चांगले निकाल हाती आल्याने हेच धोरण सुरु राहील.

रस्ते अपघाताच्या जटिल  समस्येला आळा घालण्यासाठी  मंत्रालय रस्ता सुरक्षेच्या 4E ची पुनर्रचना आणि त्याला बळकटी देत आहे,

  • अभियांत्रिकी (रस्ता आणि वाहन दोन्ही)
  • अंमलबजावणी
  • शिक्षण आणि
  • आपत्कालीन सेवा

वाहन भंगारात काढण्याच्या  धोरणाबाबत ते  म्हणाले की, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि एका जिल्ह्यात किमान एक स्क्रॅपिंग सेंटर बनवण्याची योजना आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये चार किंवा पाच केंद्रेही  असू शकतात.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750798) Visitor Counter : 228