अर्थ मंत्रालय
आयकर विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टलमधील अडचणींबाबत इन्फोसिससोबत अर्थ मंत्रालयाची बैठक
Posted On:
23 AUG 2021 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2021
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी नवी दिल्ली येथे इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांच्यासोबत बैठक घेतली. आयकर विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टलची सुरुवात होऊन अडीच महिने उलटून गेले तरीही अडचणी येत असल्याबद्दल सरकार आणि करदात्यांकडून तीव्र निराशा आणि चिंता सीतारामन यांनी या बैठकीत व्यक्त केली. पोर्टलच्या प्रारंभासही विलंब झाला होता. सीतारामन यांनी करदात्यांना वारंवार येणाऱ्या समस्यांसाठी इन्फोसिसकडून स्पष्टीकरण मागितले.
निश्चित करण्यात आलेल्या सेवांच्या वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी इन्फोसिसच्या वतीने अधिक संसाधने आणि प्रयत्न करण्याची गरज आहे, यावर अर्थ मंत्रालयाने भर दिला. पोर्टलच्या कामकाजातील विलंबामुळे करदात्यांना येणाऱ्या अडचणींबाबत पारेख यांना अवगत करण्यात आले.
पोर्टलच्या सध्याच्या कामकाजात करदात्यांना भेडसावणाऱ्या अडचणी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत सोडवण्यात याव्यात , जेणेकरून करदाते आणि व्यावसायिक पोर्टलवर कुठल्याही अडथळ्याशिवाय काम करू शकतील, अशी मागणी अर्थमंत्र्यांनी केली.
पोर्टलचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पारेख यांनी सांगितले. या प्रकल्पावर 750 पेक्षा अधिक सदस्य काम करत आहेत आणि इन्फोसिसचे मुख्य संचालन अधिकारी (सीओओ) प्रवीण राव, वैयक्तिकरित्या या प्रकल्पावर देखरेख करत आहेत, असे त्यांनी सांगितले. करदात्यांना पोर्टलवर कुठल्याही अडचणी भेडसावू नयेत यासाठी इन्फोसिस वेगाने काम करत आहे, असे सांगून पारेख यांनी आश्वस्त केले.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748380)
Visitor Counter : 285