पंतप्रधान कार्यालय

टोक्यो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 17 AUG 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021

नमस्कार!

कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले भारत सरकार मधील आपले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षक आणि विशेषत: तुमचे पालक, तुमचे आई वडील. तुम्हा सर्वांशी बोलल्यामुळे माझा विश्वास वाढला आहे, यावेळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धैतही भारत नवा इतिहास रचणार आहे. मी आपल्या सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रशिक्षकांना तुमच्या यशासाठी, देश विजयी होण्यासाठी अनेक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

तुमची काहीतरी साध्य करून दाखवण्याची इच्छा शक्ति मी पाहत आहे, अपरंपार आहे. तुम्हा सर्वांच्या मेहनतीचाच हा परिणाम आहे की आज पॅरालिम्पिकमध्ये सर्वात जास्त संख्येने भारताचे खेळाडू सहभागी होण्यासाठी जात आहेत.  तुम्ही सर्वजण सांगत होतात की कोरोना महामारीने देखील तुमच्या अडचणी नक्कीच वाढवल्या, मात्र तुम्ही तुमचा दिनक्रम बदलला नाही. तुम्ही त्या अडचणीवर मात करण्यासाठी जे काही आवश्यक होते ते केले. आपले  मनोबल खचू दिले नाही, आपला सराव थांबू दिला नाही. आणि हीच तर खरी खिलाडूवृत्ती आहे, प्रत्येक परिस्थितीत ती आपल्याला शिकवते की - हो, हे आपण करू, हे आपण करू शकतो. आणि तुम्ही सर्वांनी ते करून दाखवले. सगळ्यांनी करून दाखवले.

मित्रांनो,

तुम्ही या टप्प्यावर पोहचला आहात कारण तुम्ही खरे चॅम्पियन आहात. जीवनातील खेळात तुम्ही संकटांवर मात केली आहे. जीवनाच्या खेळात तुम्ही जिंकला आहात, चॅम्पियन आहात. एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी तुमचा विजय, तुमचे पदक खूप महत्वपूर्ण आहे, मात्र मी पुन्हा पुन्हा सांगतो की नव्या विचारांचा भारत आज आपल्या खेळाडूंवर दबाव टाकत नाही. तुम्हाला केवळ तुमचे शंभर टक्के योगदान द्यायचे आहे, अगदी मन लावून, कुठल्याही मानसिक तणावाविना, समोर किती मजबूत खेळाडू आहे याची चिंता न करता, एवढे नेहमी लक्षात ठेवा आणि याच विश्वासानिशी मैदानावर आपली मेहनत करा. मी जेव्हा नव्यानेच पंतप्रधान बनलो तेव्हा जगातील लोकांना भेटत होतो आणि ते तर उंचीने देखील आपल्यापेक्षा जास्त असतात. त्या देशांना दर्जा देखील मोठा असतो. माझीही पार्श्वभूमी तुमच्यासारखीच होती आणि देशातही लोकांना शंका यायची की या मोदींना तर जगातील काही माहिती नाही, हे पंतप्रधान बनून काय करतील? मात्र मी जेव्हा जगभरातील नेत्यांशी हस्तांदोलन करायचो तेव्हा असा विचार करत नव्हतो की नरेंद्र मोदी हस्तांदोलन करत आहे. मी हाच विचार करायचो की 100 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला देश हस्तांदोलन करता आहे. माझ्या पाठीशी 100 कोटींहून अधिक देशवासी उभे आहेत. ही भावना असायची आणि त्यामुळे मला कधीही आत्मविश्वासाची समस्या भेडसावत नव्हती. मी पाहत आहे, तुमच्यात तर आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास देखील आहे आणि खेळात विजय मिळवणे हे तर तुमच्यासाठी अगदी सोपे आहे. पदके तर मेहनतीने आपोआप मिळतीलच. तुम्ही पाहिले आहेच ऑलिम्पिकमध्ये आपले काही खेळाडू जिंकले तर काही थोडक्यात अपयशी ठरले. मात्र  देश सगळ्यांबरोबर ठामपणे उभा होता, सगळ्यांचा उत्साह वाढवत होता.

मित्रांनो,

एक खेळाडू म्हणून तुम्हाला हे चांगले माहित आहे की मैदानात जितकी शारीरिक शक्ती आवश्यक आहे तेवढीच मानसिक ताकद देखील महत्वाची असते. तुम्ही सगळे तर विशेषतः अशा परिस्थितीतून बाहेर पडून पुढे आला आहात जे मानसिक सामर्थ्यामुळेच शक्य झाले आहे. म्हणूनच आज देश आपल्या खेळाडूंसाठी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहे. खेळाडूंसाठी 'क्रीडा मानसशास्त्र' यावर नियमितपणे कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे. आपले बरेचसे खेळाडू छोटी शहरे, गल्ल्या, गावांमधून आलेले आहेत. नवीन जागा, नवे लोक, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, अनेकदा ही आव्हानेच आपले मनोबल कमी करतात. म्हणूनच हे निश्चित करण्यात आले की या दिशेने देखील आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जावे. मला आशा आहे की टोक्यो पॅरालम्पिक्स लक्षात घेऊन ज्या तीन सत्रात तुम्ही सहभागी झाला होतात त्याची तुम्हाला बरीच मदत झाली असेल.

मित्रांनो,

आपल्या छोट्या छोट्या गावांमध्ये, दूर-सुदूर भागात किती अद्भुत प्रतिभावान आहेत, किती आत्मविश्वास आहे, आज मी तुम्हा सर्वांना पाहून हे म्हणू शकतो की माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रमाण आहे. अनेकदा तुम्हालाही वाटले असेल की तुम्हाला ज्या संसाधन सुविधा मिळाल्या, त्या जर मिळाल्या नसत्या तर तुमच्या स्वप्नांचे काय झाले असते? हीच चिंता आपल्याला देशातील अन्य लाखो युवकांबाबत देखील करायची आहे. असे कितीतरी युवक आहेत ज्यांच्यात पदक जिंकण्याची पात्रता आहे. आज देश त्यांच्यापर्यंत स्वतः पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात विशेष लक्ष  दिले जात आहे. आज देशातील अडीचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये 360 'खेलो इंडिया केंद्रे' उभारण्यात आली आहेत जेणेकरून स्थानिक पातळीवरच प्रतिभेची ओळख पटेल, त्यांना संधी मिळेल. आगामी दिवसात या केंद्रांची  संख्या वाढवून एक हजार पर्यंत जाईल. अशाच प्रकारे आपल्या खेळाडूंसमोर आणखी एक आव्हान संसाधनांचे देखील असते. तुम्ही खेळायला जायचात, तेव्हा उत्तम मैदाने, उत्तम उपकरण नसायची. याचाही परिणाम खेळाडूंच्या मनोबलावर होतो. ते स्वतःला अन्य देशांच्या खेळाडूंपेक्षा कमी लेखायला लागतात. मात्र आज देशात खेळांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. देश खुल्या मनाने आपल्या प्रत्येक खेळाडूची मदत करत आहे. 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' च्या माध्यमातूनही देशाने खेळाडूंची आवश्यक व्यवस्था केली,  लक्ष्य निर्धारित केले. त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे.

मित्रांनो,

खेळांमध्ये जर देशाला अव्वल स्थानी पोहचायचे असेल तर आपल्याला ती जुनी भीती मनातून काढून टाकावी लागेल, जी जुन्या पिढीत घर करून बसली होती. एखाद्या मुलाचे जर खेळात अधिक मन रमत असेल तर घरातल्यांना चिंता वाटायची की हा पुढे काय करेल? कारण एक दोन खेळ सोडले तर खेळ आपल्यासाठी यशाचे किंवा करिअरचे प्रमाण नव्हते... ही  मानसिकता, असुरक्षिततेची भावना काढून टाकणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे.

मित्रांनो,

भारतात खेळाची परंपरा विकसित करण्यासाठी आपल्याला आपल्या पद्धतींमध्ये वारंवार सुधारणा कराव्या लागणार आहेत. आज आंतरराष्ट्रीय खेळांसोबत पारंपारिक भारतीय खेळांंनाही नवी ओळख दिली जात आहे. युवकांना संधी देण्यासाठी, व्यावसायिक वातावरण मिळावे म्हणून मणिपूरच्या इम्फाळमध्ये देशातील पहिले क्रीडा विद्यापीठसुद्धा सुरू केले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अभ्यासाएवढेच महत्व खेळांना दिले गेले आहे. आज देश स्वतःहून पुढे येत खेलो इंडिया मोहीम राबवत आहे.

मित्रांनो,

आपण कोणत्याही खेळाशी जोडला गेला असा, 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही भावना आपण बळकट करत आहात. आपण कोणत्याही राज्याचे असा, कोणत्याही क्षेत्रातील असा, कोणतीही भाषा बोलत असा, या सर्वाहून महत्वाचे म्हणजे आपण 'टीम इंडिया' आहात. ही भावना आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात असली पाहिजे, प्रत्येक स्तरावर दिसली पाहिजे. सामाजिक समानतेच्या या मोहिमेत आत्मनिर्भर भारतातील माझे दिव्यांग बंधू-भगिनी आज देशासाठी खूप महत्वाचा सहभाग देत आहेत.

शारीरिक अपूर्णतेमुळे जीवन थांबत नाही, हे आपण आज सिद्ध केले आहे. म्हणूनच आपण सर्वांसाठी, देशबांधवांसाठी आणि विशेषतः नव्या पिढीसाठी मोठे प्रेरणास्थान आहात.

मित्रांनो,

याआधी दिव्यांगांना सुविधा पुरवणे म्हणजे त्यांच्या कल्याणाचे काम असे मानले जात होते. पण आज हे आपले कर्तव्य मानून देश काम करत आहे. म्हणूनच देशाच्या संसदेने 'राइट्स फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी'' हा कायदा तयार केला. दिव्यांग जनांचे अधिकार कायद्याने संरक्षित केले. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सुगम्य भारत अभियान. शेकडो सरकारी इमारती, शेकडो रेल्वे स्थानके, हजारो ट्रेन कोच, डझनभर देशांतर्गत विमानतळावरील पायाभूत सोयी हे सर्व दिव्यांगांच्या सोयीचे म्हणजेच सुगम बनवले गेले आहे. भारतीय सांकेतिक भाषेचा एक प्रमाण शब्दकोश बनवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. NCERTची पुस्तके सांकेतिक भाषेत अनुवादित करण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामांमुळे कितीतरी लोकांचे जीवन बदलत आहे. अनेक प्रतिभावंत देशासाठी काहीतरी करण्याचा विश्वास कमावत आहेत.

मित्रांनो,

देश जेव्हा प्रयत्न करतो आणि त्याचे सोनेरी परिणाम आपल्याला वेगाने अनुभवायला मिळतात, तेव्हा आपल्याला अधिक भव्य विचार करण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा त्यापासून मिळते. आपले यश आपल्या कितीतरी आणि नवनवीन ध्येयांसमोरचा मार्ग मोकळा करत जाते. म्हणूनच जेव्हा आपण तिरंगा घेत टोकियोमध्ये आपला सर्वश्रेष्ठ खेळ दाखवाल, तेव्हा केवळ पदकच जिंकणार नाही,  तर भारताच्या संकल्पांना या मार्गावरून दूरवर घेऊन जाणार आहात. त्यांना नवीन ऊर्जा देणार आहात, पुढे घेऊन जाणार आहात.

आपले हे ध्येय, आपला हा उत्साह टोकियोमध्ये नवीन विक्रम घडवून आणेल. या विश्वासासोबतच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा असंख्य शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद!

 

S.Tupe/S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1746707) Visitor Counter : 381