युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोक्यो 2020 पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 54 सदस्यांच्या भारतीय पथकाला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आभासी पद्धतीने दिला औपचारिक निरोप

Posted On: 12 AUG 2021 6:55PM by PIB Mumbai

 

प्रमुख वैशिष्ट्ये:

टोक्यो पॅरालिंपिक्ससाठी आज 54 सदस्यांच्या भारतीय पथकाला औपचारिक निरोप देण्यात आला

कोणत्याही पॅरालिंपिकसाठी पाठवण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक आहे.

टोक्यो पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी आज आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 54 सदस्यांच्या भारतीय पथकाला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी औपचारिक आणि आभासी पद्धतीने निरोप दिला.  अनुराग ठाकूर यांनी या खेळाडूंना एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले आणि शुभेच्छा दिल्या. पर्यटनमंत्री श्री. जी. के. रेड्डी आणि परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी देखील यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनी देखील खेळाडूंना संबोधित केले.

या औपचारिक निरोप समारंभात बोलताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले, “ टोक्योमध्ये होत असलेल्या या स्पर्धांसाठी 9 क्रीडाप्रकारात सहभागी होणाऱ्या 54 पॅरा खेळाडूंचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक भारत पाठवत आहे. आपल्या पॅरा खेळाडूंचे क्रीडाप्रेम त्यांच्यातील असामान्य मानवी जिद्दीचे दर्शन घडवते. ज्यावेळी तुम्ही देशासाठी खेळता त्यावेळी तुम्हाला 130 कोटी भारतीय प्रोत्साहन देत असतात हे लक्षात ठेवा. आपले पॅरा- खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करतील असा माझा ठाम विश्वास  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रियो-2016 पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली होती आणि त्यांनी नेहमीच खेळाडूंच्या कल्याणाकडे बारकाईने लक्ष पुरविले आहे आणि देशभरात खेळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करताना खेळाडूंच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळेल याबाबत सरकारचा दृष्टीकोन केंद्रीत केला आहे. या सर्व खेळाडूंना आमच्या शुभेच्छा!” 

पर्यटनमंत्री जी. के. रेड्डी म्हणाले, “ संपूर्ण देशाचे आशीर्वाद या खेळाडूंच्या सोबत आहेत आणि टोक्योमध्ये पुन्हा एकदा देशाचा तिरंगा उंच फडकला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आणि आपल्या देशाचा अभिमान उंचावण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि पॅरालिंपिक खेळाडू हे स्वप्न साकार करतील असा आपल्याला विश्वास वाटतो.”  क्रीडापटूंना सरकारने नेहमीच पाठबळ दिले आहे आणि 2014 मध्ये टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजना( टॉप्स) या योजनेची संकल्पना मांडणाऱ्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

 

 

परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य दृष्टीकोनानुसार सर्व दिव्यांग बंधू, भगिनी आणि बालके एक भारताचा भाग आहेत आणि आपण सर्व एक आहोत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारताची आश्वासक वाटचाल सुरू असताना पॅरालिंपिक खेळाडू देखील त्याच विश्वासाने पुढे जात आहेत.यावेळी त्यांनी या खेळाडूंसोबत विजयाची व्ही अशी खूण करत खेळाडूंचा उत्साह देखील वाढवला.

भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक म्हणाल्या, “ प्रत्येकाने कठोर मेहनत घेतली आहे आणि आम्ही टोक्यो 2020 मधील या स्पर्धेकडे डोळे लावून आहोत आणि या स्पर्धेत आम्ही विजयी होऊ आणि तिरंग्याची शान उंचावू याचा आम्हाला विश्वास आहे.यावेळी पॅरालिंपिक समितीचे गुरुशरण सिंग आणि अशोक बेदी उपस्थित होते.

भारताचे 54 खेळाडू तीरंदाजी, ऍथलेटिक्स( ट्रॅक ऍन्ड फील्ड), बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन यांसारख्या 9 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. कोणत्याही पॅरालिंपिक स्पर्धांमधील भारताचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे पथक आहे.

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1745283) Visitor Counter : 238