पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद
कोरोना काळातल्या अभूतपूर्व सेवेबद्दल महिला बचत गटांचे केले कौतुक
सर्व भगिनींना आपल्या गावांचे नाते समृद्धी आणि संपन्नतेशी जोडता यावे याकरता वातावरण आणि परिस्थीती निर्माण करण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न - पंतप्रधान
भारतात निर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्याबाबत बचत गटांची मोठी क्षमता : पंतप्रधान
पंतप्रधानांनी 4 लाखापेक्षा अधिक बचत गटांसाठी 1,625 कोटी रुपयांचा निधी केला जारी.
अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालया अंतर्गत, पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेज, पीएमएफएमई योजनेत 7,500 बचत गट सदस्यांना 25 कोटी रुपयांचे बीज भांडवल , तर या मोहिमेद्वारे, 75 शेतकरी उत्पादक संघटनांना 4.13 कोटी रुपयांचा निधी जारी
Posted On:
12 AUG 2021 3:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज " आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद" या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
याप्रसंगी, देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथा मांडणाऱ्या संग्रहाचे आणि शेती आधारीत जीवनशैलीबाबतच्या पुस्तिकेचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालया अंतर्गत, पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेज, पीएमएफएमई योजनेत 7,500 बचत गट सदस्यांना 25 कोटी रुपयांचे बीज भांडवल , तर या मोहिमेद्वारे, 75 शेतकरी उत्पादक संघटनांना 4.13 कोटी रुपयांचा निधीही पंतप्रधानांनी जारी केला.
केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री, श्री गिरीराज सिंह; केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री पशुपती कुमार पारस; राज्य-ग्रामीण विकास मंत्री, साध्वी निरंजन ज्योती आणि श्री फग्गन सिंह कुलस्ते; राज्यमंत्री - पंचायती राज, श्री कपिल मोरेश्वर पाटील आणि राज्यमंत्री - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, श्री प्रल्हाद सिंह पटेल, यावेळी उपस्थित होते.
कोरोना काळातल्या अभूूतपूर्व सेवेबद्दल महिला बचत गटांचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.
मास्क आणि सॅनिटायजर बनवणे असो किंवा गरजूंना अन्न पुरवणे. सोबतीनेच या महिलांनी केलेल्या जनजगागृतीच्या असामान्य कामाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.
महिलांमध्ये उद्योजकतेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानात अधिक सहभागाच्या दृष्टीने, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज 4 लाखांहून अधिक बचत गटांना मोठे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. बचत गट आणि दीन दयाल अंत्योदय योजनेने ग्रामीण भारतात एक नवीन क्रांती आणली आहे असे ते म्हणाले. महिला बचत गटांची ही चळवळ गेल्या 6-7 वर्षात तीव्र झाली आहे. देशभरात आज 70 लाख बचत गट आहेत, आधीच्या तुलनेत गेल्या 6-7 वर्षांत बचत गटांच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सरकारच्या आधीच्या काळात कोट्यावधी बहिणींचे बँक खातेच नव्हते, त्या बँकिंग व्यवस्थेपासून कोसो दूर होत्या. म्हणूनच सरकारने जन धन खाती उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आज 42 कोटींहून अधिक जनधन खाती आहेत त्यापैकी जवळजवळ 55% खाती महिलांची आहेत. बँकांकडून कर्ज घेणे सोपे व्हावे यासाठी बँक खाती उघडली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने राष्ट्रीय आजीविका अभियानाअंतर्गत भगिनींसाठी दिलेली मदत आधीच्या सरकारच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे असे पंतप्रधान म्हणाले.
बचत गटांना सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे कर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या 7 वर्षांत बचत गटांनी बँकांना परतफेड करण्याचे मोठे काम केले आहे. एक काळ असा होता जेव्हा 9% च्या आसपास बँकांची कर्ज थकीत होती. आता ते प्रमाण 2-3 % वर आले आहे. त्यांनी बचत गटातील महिलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
बचत गटांना उपलब्ध असलेल्या विनाहमी कर्जाची मर्यादा दुप्पट करून 20 लाख रुपये केली आहे. तुमचे बचत खाते, कर्ज खात्याशी जोडण्याची अटही दूर केली आहे. अशा अनेक प्रयत्नांमुळे तुम्ही आता स्वावलंबनाच्या मोहिमेत अधिक उत्साहाने पुढे जाऊ शकाल असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण पदार्पण केले आहे. नवीन ध्येये निश्चित करण्याची आणि नवीन उर्जा घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. भगिनींच्या सामूहिक शक्तीनेही आता नव्या ताकदीने पुढे जायचे आहे. सर्व भगिनींना आपल्या गावांचे नाते समृद्धी आणि संपन्नतेशी जोडता यावे याकरता वातावरण आणि परिस्थीती निर्माण करण्याचा सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
कृषी आणि कृषी आधारित उद्योगात महिला बचत गटांसाठी असंख्य संधी आहेत. बचत गटांनाही कृषी आधारीत सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी एक विशेष निधी तयार केल्याची माहीती त्यांनी दिली. सर्व सदस्य वाजवी दर निश्चित करून या सुविधांचा लाभ घेऊ शकतात आणि इतरांना भाड्यानेही देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
नवीन कृषी सुधारणांचा फायदा फक्त आपल्या शेतकऱ्यांनाच होणार नाही, तर बचत गटांसाठीही अमर्याद संधी निर्माण केल्या जात आहेत. आता बचत गट शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करू शकतात आणि डाळींसारख्या उत्पादनांची थेट घरपोच विक्री देखील करू शकतात.
आता तुमच्या साठवणुकीवर कोणतेही बंधन नाही. थेट शेतातून उत्पादन विकणे किंवा अन्न प्रक्रिया एकक स्थापन करून उत्तम आवरणासह ते विकणे असे पर्याय बचतगटांकडे आहेत. ऑनलाईन कंपन्यांशी करार करून, बचत गट आपली उत्पादने उत्तम पॅकेजिंसह सहजपणे शहरांमध्ये पाठवू शकतात असे त्यांनी सूचवले.
सरकार भारतात निर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देत आहे आणि यासाठी सर्वतोपरी मदतही करत आहे. विशेषत: आपल्या आदिवासी भागातील परंपरागतपणे याच्याशी संबंधित भगींनीना मदत केली जात आहे. या क्षेत्रात बचत गटांसाठीही भरपूर क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी आजची मोहीम सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामध्ये बचत गटांची दुहेरी भूमिका आहे. बचत गटांनी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक बद्दल जागरूकता निर्माण करावी आणि त्याच्या पर्यायासाठी काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
बचत गटांनी ऑनलाईन सरकारी ई-बाजारपेठेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. भारत आज वेगाने बदलतोय यात देशातील बहिणी आणि मुलींना पुढे जाण्याच्या संधी वाढत आहेत असे ते म्हणाले.
सर्व भगिनींना घर, शौचालय, वीज, पाणी आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत. सरकार महिला आणि मुलींच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी संवेदनशीलतेने काम करत आहे. यामुळे केवळ महिलांचा सन्मानच वाढला नाही तर मुली आणि भगीनींचा आत्मविश्वासही वाढत आहे असेही पंतप्रधान म्हणाले.
महिला बचत गटांनी राष्ट्र उभारणीसाठीचे आपले प्रयत्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत जोडावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले. 8 कोटीपेक्षा जास्त महिला आणि मुलींच्या सामूहिक सामर्थ्याने अमृत महोत्सव नवीन उंचीवर नेला जाईल असे सांगत सेवेच्या भावनेने कसे सहकार्य करता येईल याचा विचार करण्यास त्यांना सांगितले.
स्त्रियांसाठी पोषण आहार जागरूकता मोहीम राबवणे, कोविड -19 लसीकरण मोहीम राबवणे, त्यांच्या गावांमध्ये स्वच्छता आणि जलसंधारण इत्यादी उदाहरणे त्यांनी दिली. जवळच्या सौरउर्जा प्रकल्प, दुग्धव्यवसाय उदयोग, शेणासंबंधित प्रकल्पांना बचत गटांनी भेटी द्याव्यात आणि त्यातून उत्तम पद्धती शिकाव्यात असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
पंतप्रधानांनी बचत गटांचे कौतुक केले आणि सांगितले की अमृत महोत्सवाच्या यशाचे अमृत त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वत्र पसरेल आणि यामुळे देशाला लाभ मिळेल.
***
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745229)
Visitor Counter : 423
Read this release in:
Kannada
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam