संरक्षण मंत्रालय

द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी शिवालिक आणि कदमत ही भारतीय नौदल जहाजे ब्रुनेई येथे दाखल

Posted On: 09 AUG 2021 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाच्या अनुषंगाने, भारतीय नौदल जहाजे शिवालिक आणि कदमत 9 ऑगस्ट 21 रोजी दक्षिण पूर्व आशियातील मुआरा, ब्रुनेई येथे पोहचली.  मुआरा, ब्रुनेई येथे मुक्कामादरम्यान, दोन्ही जहाजांतील नौसैनिक रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  विविध  सरावांमध्ये सहभागी होणार आहे.

या कवायतींमुळे दोन्ही नौदलांना सर्वोत्तम कार्यपद्धतींमधून लाभ मिळवणे आणि सागरी सुरक्षा  प्रक्रियांची सामायिक माहिती जाणून घेण्याची  संधी उपलब्ध होईल.  समुद्रातील या  संयुक्त सरावाचा  उद्देश दोन्ही नौदलांमधील  बंध मजबूत करणे हा आहे आणि भारत-ब्रुनेई संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरेल. 12 ऑगस्ट 21 रोजी समुद्रात रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  पॅसेज कवायतींनी  याची सांगता होईल.

कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, सर्व परस्परसंवाद आणि सराव  'विना -स्पर्श ' उपक्रम म्हणून आयोजित केले जातील आणि त्यामुळे सहभागी नौदलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही शारीरिक संपर्क असणार नाही.

भारतीय नौदलाची जहाजे शिवालिक आणि कदमत ही आधुनिक  स्वदेशी बनावटीची आणि अनुक्रमे बहुआयामी मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टील्थ फ्रिगेट आणि अँटी-सबमरीन कॉर्वेट श्रेणीची आहेत, आणि पूर्व नौदल कमांड अंतर्गत विशाखापट्टणम स्थित भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा भाग आहेत. दोन्ही जहाजे विविध  शस्त्रे आणि सेन्सर यांनी सुसज्ज आहेत, बहु उद्देशीय हेलिकॉप्टर घेऊन जाऊ शकतात आणि भारताच्या युद्धनौका-निर्माण क्षमतेच्या परिपक्वताचे प्रतिनिधित्व करतात.

रॉयल ब्रुनेई नौदलाबरोबर  द्विपक्षीय सराव पूर्ण झाल्यावर, जहाजे जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ), रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (आरएएन) आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही (यूएसएन) यांच्याबरोबर  मालाबार -21 सरावात  भाग घेण्यासाठी गुआमकडे रवाना होतील.

 

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744075) Visitor Counter : 196