आदिवासी विकास मंत्रालय

जगभरातील भारतीय मिशन अथवा दूतावासांमध्ये ट्रायफेड उभारणार आत्मनिर्भर कोपरा


भौगोलिक संकेतांक प्राप्त नैसर्गिक आणि सेंद्रिय आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष राखीव जागा म्हणजे हा कोपरा असेल

Posted On: 05 AUG 2021 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

महत्त्वाची वैशिष्ट्ये :

  • केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास मंडळ संपूर्ण जगातील विविध देशांमध्ये असलेल्या 100 भारतीय मिशन आणि दूतावासांमध्ये आत्मनिर्भर भारत कोपरा उभारणार आहे.
  • या कोपऱ्याच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी आदिवासी उत्पादनांची समृद्धता आणि विविधता दर्शविणाऱ्या चित्रयुक्त माहितीपुस्तिका आणि माहितीपत्रके देखील भारतीय मिशन आणि दूतावासांकडे पोहोचविण्यात आली आहेत.

व्होकल फोर लोकल अर्थात स्थानिक गोष्टींचा पुरस्कार करण्यावर लक्ष केंद्रित करून आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी भौगोलिक संकेतांक प्राप्त उत्पादने तसेच आदिवासींतर्फे निर्मित उत्पादने यांच्या जाहिरातीचे काम हाती घेत आदिवासी कारागिरांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून या उत्पादनांना ब्रँडमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ट्रायफेड अनेक मंत्रालयांसोबत प्रभावीपणे एकत्र येऊन काम करीत आहे.

या हेतूने, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासोबत सहकारी तत्वावर, ट्रायफेड जगातील 100 भारतीय मिशन आणि दूतावासांच्या ठिकाणी आत्मनिर्भर भारत कोपऱ्यांची उभारणी करणार आहे. ही जागा विशेष करून फक्त भौगोलिक संकेतांक प्राप्त आदिवासी कला आणि हस्तकलेशी संबंधित वस्तू तसेच नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने यांचे प्रदर्शन आणि जाहिरात करण्यासाठी राखीव असेल. आदिवासी उत्पादनांची समृद्धता आणि विविधता दर्शविणाऱ्या चित्रयुक्त माहितीपुस्तिका आणि माहितीपत्रके देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी भारतीय मिशन आणि दूतावासांकडे पोहोचविण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमासाठी ज्या भारतीय मिशन आणि दूतावासांशी संपर्क साधण्यात आला त्यापैकी जमैका,आयर्लंड, तुर्कस्तान, केनिया, मंगोलिया, इस्रायेल, फिनलंड, फ्रान्स आणि कॅनडा या देशांतील 42 ठिकाणांहून प्रतिसाद देण्यात आला आहे. आत्मनिर्भर कोपऱ्यात प्रदर्शित करण्यासाठी आदिवासी उत्पादनांचा पहिला संच रवाना करण्याची प्रक्रिया ट्रायफेडने सुरु केली आहे.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित सोहोळ्याचा भाग म्हणून न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीने न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअर या ठिकाणी योग, समग्र आरोग्य, आयुर्वेद आणि स्वास्थ्य यांचे महत्त्व दर्शविणाऱ्या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधींसह वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक आदिवासी उत्पादने आणि आयुर्वेदिक उत्पादने ठेवण्यात आलेले स्टॉल उपस्थितांमध्ये अधिक लक्षवेधी ठरले होते. या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

गेल्या अनेक शतकांपासून देशभरातील आदिवासी गट ज्या स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीचे काम करीत आले आहेत त्यांचे विपणन आणि जाहिरात यामध्ये मदत करण्यासाठी ट्रायफेड राष्ट्रीय नोडल संस्था म्हणून मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.या संदर्भात जीआय अर्थात भौगोलिक संकेतांक या नव्या संकल्पनेला आता अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

Jaydevi PS/S.Chtinis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742761) Visitor Counter : 330