युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनची कांस्यपदकाला गवसणी

Posted On: 04 AUG 2021 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021
 

ठळक वैशिष्ट्ये :

  • राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी लव्हलिना बोर्गोहेनचे केले अभिनंदन
  • क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, लव्हलिनाचे  अभिनंदन करताना म्हणाले ,भारताला तुमचा अभिमान आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलोग्राम गटात कांस्यपदक पटकावले आहे. आज उपांत्य फेरीत विश्वविजेत्या तुर्कीच्या  बुसेनाझ सुरमेनेलीकडून तिला पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे  तर मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य पदकाची कमाई केली आहे. राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लव्हलिना बोर्गोहेनचे  अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

मूळच्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील.असेलल्या लव्हलीनाचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन हे छोटे व्यापारी आहेत आणि आपल्या  मुलीच्या महत्वाकांक्षेला पाठबळ देण्यासाठी त्यांना आर्थिक आघाडीवर संघर्ष करावा लागला.तिच्या जुळ्या बहिणी लिचा आणि लीमा यांच्या पावलावर पाऊल टाकत या आसामीं मुलीने  प्रथम किकबॉक्सिंग सुरू केले. जेव्हा ती तिचे पहिले प्रशिक्षक पदम बोरो यांना  भेटली तेव्हाच तिच्या आयुष्याला निश्चित कलाटणी मिळाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या शिलाँग आणि दिमापूर केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या बोरो यांनी  तिला मुष्टियुद्ध खेळाची  ओळख करून दिली आणि तेव्हापासून लव्हलिनाने  मागे वळून पाहिले नाही. मुष्टियुद्ध खेळ तिला आवडू लागल्यानंतर लव्हलिना नेहमीच संधीच्या शोधात होती आणि काही महिन्यांतच ही  संधी तिचाकडे चालून आली.ज्या शाळेत ती शिकली होती त्या बारपथार मुलींच्या शाळेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने चाचण्या आयोजित केल्या होत्या , या  चाचण्यांमध्ये भाग घेत लव्हलिनाने आपले कौशल्य दाखवले. अशाप्रकारे  तिची अपवादात्मक क्रीडा प्रतिभा बोरोच्या लक्षात आली आणि  2012 पासून त्यांनी तिच्यावर मेहनत घेणे सुरु केले. एका महिलेला मुष्टियुद्ध खेळात असलेल्या  स्वारस्यावर प्रश्न विचारणाऱ्या समाजाशी ,शिखरावर पोहोचण्याच्या तिच्या या प्रवासात,तिने संघर्ष केला. पण यामुळे तिच्या आकांक्षांना धक्का बसला नाही परिणामी  2018 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकत तिला पहिले मोठे यश मिळाले. टोक्यो ऑलिम्पिक 2020 साठी पात्र ठरल्यानंतर ती आसामच्या इतिहासातील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला ठरली.

वैयक्तिक माहिती:

जन्मतारीख :   02 ऑक्टोबर 1997

निवासस्थान :   गोलाघाट, आसाम

प्रशिक्षण स्थान : अस्सिसी , इटली

वैयक्तिक प्रशिक्षक: श्रीमती  संध्या गुरुंग

राष्ट्रीय प्रशिक्षक: मोहम्मद अली कमर

 

कामगिरी:

  • 2018 आणि 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती
  • 2017 आणि 2021 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती

सरकारी मदत  :-

  • कोविड 19 मधून ती बरी झाल्यानंतर गुवाहाटीमध्ये एक महिन्याचे वैयक्तिक प्रशिक्षण शिबीर
  • उपयोगी  उपकरणांच्या खरेदीसाठी
  • कोविड 19 संसर्ग झाल्यानंतर तिचा  वैद्यकीय खर्च आणि डॉक्टरांचा सल्ला
  • टोक्यो ऑलिम्पिक, 2020 सुरू होण्यापूर्वी इटलीच्या अस्सिसी  येथे एका  महिन्याचे प्रशिक्षण शिबिर

आर्थिक मदत

टॉप्स        रु. 11,30,300

एसीटीसी    रु.  7,00,215

एकूण       रु. 18,30,515

 

प्रशिक्षकांचे तपशील:

  • सुरुवातीचे  प्रशिक्षक: पदम चंद्र बोरो आणि शिव सिंह
  • विकास  / विशेष प्रशिक्षक: मो. अली कमर आणि संध्या गुरुंग

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742459) Visitor Counter : 240