युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूची कांस्यपदकाला गवसणी,  दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला

Posted On: 01 AUG 2021 7:51PM by PIB Mumbai

 

ठळक मुद्दे : 

कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने चीनच्या हे बिंग जियाओचा 21-13 आणि 21-15 असा पराभव केला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले

'तुम्ही  इतिहास घडवला' अशा शब्दात क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले सिंधूचे अभिनंदन

भारतीय बॅडमिंटनपटू  पी.  व्ही.  सिंधूने आज टोक्यो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या सामन्यात कांस्यपदक जिंकले.पी. व्ही.  सिंधूने कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या हे बिंग जियाओचा 21-13 आणि 21-15 असा पराभव केला आणि दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. सिंधूने रिओ ऑलिम्पिक- 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. कुस्तीपटू सुशील कुमार दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला आणि  एकमेव भारतीय क्रीडापटू आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि समस्त भारतीयांनी पी. व्ही.  सिंधूच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सिंधूला तिच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट संदेशात म्हटले, ''पी. व्ही.  सिंधू दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचा एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. भारताला गौरव मिळवून दिल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे की, " पी.व्ही. सिंधूच्या चमकदार कामगिरीमुळे आम्ही सर्वजण  आनंदी आहोत. टोकियो 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ती भारताचा अभिमान आहे आणि आमच्या सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे

पी. व्ही.  सिंधूचे अभिनंदन करत क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ट्विट केले, ''उत्कृष्ट विजय पी. व्ही. सिंधू !!! आपण सामन्यावर  वर्चस्व गाजवले आणि टोक्यो 2020 मध्ये इतिहास घडवला ! दोन ऑलिम्पिक पदक विजेती ! भारताला तुमचा खूप अभिमान आहे आणि भारत तुमच्या परतण्याची वाट पाहत आहे! आपण करून दाखवले !''

पी. व्ही.  सिंधू रौप्य पदक विजेती (रिओ 2016 ऑलिम्पिक) आहे.तिचे  दोन्ही पालक राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू होते. तिचे वडील अर्जुन पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत. मेहबूब अलींच्या मार्गदर्शनाखाली तिने वयाच्या 8 व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि सिकंदराबादच्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशनच्या बॅडमिंटन कोर्टात ती बॅडमिंटनच्या मूलभूत गोष्टी शिकली. तिने खेळ शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी तिच्या निवासस्थानापासून बॅडमिंटन कोर्टपर्यंत दररोज 56 किमीचा प्रवास केला.तिने पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि 10 वर्षांखालील गटात अनेक पदके जिंकली.

वैयक्तिक माहिती:

जन्मतारीख : 05 जुलै 1995

निवासस्थान : हैदराबाद, तेलंगणा

प्रशिक्षण स्थान : पीजीबीए आणि जीएमसी बालयोगी क्रीडा संकुल, गचीबोवली

वैयक्तिक प्रशिक्षक: पार्क ताई सांग

राष्ट्रीय प्रशिक्षक: पुलेला गोपीचंद

 

कामगिरी:

रौप्य पदक, रिओ ऑलिम्पिक 2016

सुवर्णपदक, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा  2018 (सांघिक )

रौप्य पदक, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2018

रौप्य पदक, आशियाई क्रीडास्पर्धा 2018

विश्व विजेती , 2019

 

सरकारकडून मिळालेली महत्वाची मदत

विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि परदेशी प्रशिक्षणासाठी व्हिसा समर्थन पत्रे

आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि परदेशी प्रशिक्षणासाठी टॉप्स (TOPS) अंतर्गत.फिजिओथेरपिस्ट आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षकाची मदत

टॉप्स (TOPS) अंतर्गत फिजिओथेरपिस्टचे साहाय्य  (2018 मध्ये 03 महिन्यांसाठी गायत्री शेट्टी)

सध्याच्या ऑलिम्पिकसह  52 आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आर्थिक साहाय्य

तिच्या जलद पुनर्वसनाच्या दृष्टीने  टोकियोला नेण्यासाठी गेम रेडी रिकव्हरी सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली. तिच्या विनंतीनंतर 24 तासांच्या आत ती रक्कम तिला देण्यात आली.

तेलंगणा राज्याच्या सहकार्याने गचीबोवली स्टेडियममध्ये  तेथे ठेवलेल्या कोर्ट मॅट्ससाठी निधीसह विशेष प्रशिक्षण,.

वैयक्तिक परदेशी प्रशिक्षकासाठी तरतूद - एसीटीसी  अंतर्गत पार्क ताई सांग

कोविड दरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ती आणि तिच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांसाठी लॉजिस्टिक साहाय्य

एसीटीसी ( ACTC) अंतर्गत राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर

कोविड -19 शिष्टाचार , टोक्योमधील जीवन, अंमली पदार्थ सेवन विरोधी आणि भारतातून  अभिमानाने प्रवास करण्यासाठी संवेदीकरण कार्यक्रम आयोजित केले.

 

आर्थिक मदत

टॉप्स  (TOPS) :  51,28,030 रुपये

एसीटीसी (ACTC): 3,46,51,150 रुपये

एकूण: 3,97,79,180 रुपये

 

पुरस्कार

पद्मभूषण (2020)

पद्मश्री (2015)

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2016)

अर्जुन पुरस्कार (2013)

 

सुरुवातीचे  प्रशिक्षक:

मेहबूब अली (वय: 8-10),

मोहम्मद अली, आरिफ सर, गोवर्धन सर आणि टॉम जॉन (वय: 10-12)

विकास प्रशिक्षक : पुलेला गोपीचंद आणि गोपीचंद अकादमीमध्ये विविध

विशेष प्रशिक्षक : मुल्यो, किम, द्वि, रिफान आणि पार्क ताई सांग (2018 पासून आतापर्यंत)

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741336) Visitor Counter : 474