युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

2020 ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी जपानमधील टोक्यो शहर सज्ज


भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुरू केले "हमारा विक्‍टरी पंच" हॅश टॅग अभियान

ऑलिम्पिक स्पर्धांचे थेट प्रसारण आकाशवाणी, दूरदर्शन आणि डीडी स्पोर्ट्स वाहिन्यांवरून होणार

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर उद्‌घाटन सोहळा साधेपणाने होणार

Posted On: 22 JUL 2021 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

जगभरातील क्रीडाप्रेमी उत्कंठतेने प्रतीक्षा करत असलेला ऑलिम्पिक सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या संध्याकाळी 4:30 वाजेपासून उद्‌घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

कोविड-19 संकटामुळे भव्यदिव्य उद्‌घाटन सोहळ्याऐवजी साधेपणाने उद्‌घाटन होणार आहे. प्रत्येक देशाचे सहा अधिकारी उद्‌घाटन सोहळ्यासाठी उपस्थिती असतील.

साधेपणाने उद्‌घाटन सोहळा होणार असला तरी टोक्यो  स्टेडियम ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

 यंदा प्रथमच भारताचे तब्बल  127 खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय क्रीडापटू हे  तिरंदाजी, ऍथलेटीक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी (फेन्सिंग), गोल्फ, जिमनास्टीक्स, हॉकी, ज्युदो, रोईंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडूंच्या या चमूत 68 पुरुष खेळाडू आणि 52 महिला खेळाडू, 58 अधिकारीआणि  प्रशिक्षक, टीम अधिकारी यांच्याशिवाय 8 तात्पुरत्या स्वरुपाचे अधिकारी असा ताफा आहे.

#HumaraVictoryPunch अभियान

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी देशाच्या विविध भागांतून शुभेच्छा संदेश येत आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही टोक्यो ऑलिम्पिक मधील भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी हमारा विक्‍टरी पंच हे  हॅश टॅग अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी "हमारा विक्‍टरी पंच" संदर्भात एक व्हिडिओ बनवून पाच व्यक्तींना टॅग केले आहे. त्यांनी कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू, क्रिकेटपटू  वीरेंदर सेहवाग, अभिनेता अक्षय कुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना टॅग केले.

भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जनतेने सुद्धा आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत व्हिडीओ बनवून "हॅश टॅग हमारा विक्‍टरी पंच" शेअर करावा तसेच इतर व्यक्तींना टॅग करावे असे आवाहन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणी समवेत ऑलिम्पिक 2020

ऑलिम्पिक 2020 स्पर्धांचा प्रेक्षकांना घरबसल्या अनुभव घेता यावा यासाठी प्रसारभारतीही सज्ज झाली आहे. ऑलिम्पिक चे मेगा कव्हरेज प्रेक्षकांना आपल्या दूरदर्शन आणि आकाशवाणी नेटवर्कद्वारे तसेच समर्पित क्रीडा वाहिनी डीडी स्पोर्ट्स वरही अनुभवता येतील.

ऑलिम्पिक पूर्व कार्यक्रम  ते समारोपापर्यंत करण्यात येणारे हे प्रसारण दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि देशभरातल्या डिजिटल मंचावरही उपलब्ध राहील.

ऑलिम्पिक मधले विविध क्रीडा प्रकार डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर सकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत दररोज थेट प्रक्षेपित केले जातील. याचे वर तपशील दररोज डीडी स्पोर्ट्स आणि एआयआर स्पोर्ट्स ट्वीटर हॅण्डल वर   (@ddsportschannel आणि  @akashvanisports) उपलब्ध करून देण्यात येतील.

ऑलिम्पिक विषयी विशेष कार्यक्रम, कर्टन  रेझर  आणि दैनंदिन हायलाईट कार्यक्रमाची प्रादेशिक आवृत्ती, उपांत्यपूर्व आणि कांस्य पदकासाठीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ असेल तरच एआयआर, या सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन, एआयआर न्यूज समवेत ऑलिम्पिक प्रश्नमंजुषा, एआयआर ऑलिम्पिक विशेष मालिका, एक्स्ल्यूजीव मुलाखती आणि विशेष चर्चात्मक कार्यक्रम, चीअर फॉर इंडिया मोहीम आदी भरगच्च कार्यक्रमांचा आस्वाद क्रीडाप्रेमींना आकाशवाणी-दूरदर्शनच्या ऑलिम्पिक विशेष प्रसारण कार्यक्रमातून घेता येणार आहे.

या मंचावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील आपल्याला येथे क्लिक करून पाहता येईल.

Jaydevi PS/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1737678) Visitor Counter : 331