इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, यासाठी 'किसान सारथी' या डिजिटल मंचाचा प्रारंभ


शेती आणि संबंधित क्षेत्रांविषयी थेट शास्त्रज्ञांकडून व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळण्याची सुविधा या डिजिटल मंचांमुळे उपलब्ध-: माहिती तंत्रज्ञान मंत्री- श्री.अश्विनी वैष्णव

Posted On: 16 JUL 2021 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जुलै 2021

शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, यासाठी 'किसान सारथी' या डिजिटल मंचाचा प्रारंभ आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांनी केला. आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 93 व्या स्थापनदिनाचे औचित्य साधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मंचाचा प्रारंभ झाला.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री.परषोत्तम रुपाला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे श्री.कैलास चौधरी आणि शोभा करंदलाजे हे दोन राज्यमंत्री उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी, आयसीएआरचे महासंचालक आणि डीएआरइ अर्थात कृषी संशोधन तथा शिक्षण विभागाचे सचिव डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, डिजिटल इंडिया महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग यांच्यासह संबंधित मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच शेतकरी आणि या क्षेत्रातील भागीदार व जबाबदार व्यक्तींचाही यामध्ये सहभाग होता. देशभरातील कृषी विज्ञान केंद्रेही यावेळी सहभागी झाली.

दुर्गम क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणारा 'किसान सारथी' हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अभिनंदन केले. या डिजिटल मंचामुळे आता थेट कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांकडून शेती आणि संबंधित क्षेत्रांविषयी व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

आता शेतकऱ्यांच्या दारापासून ते बाजारपेठ, साठवण-गृहे आणि शेतकऱ्यांच्या पसंतीच्या विक्री केंद्रांपर्यंत कमीत कमी नुकसान होऊन शेतमाल पोहोचता व्हावा या दृष्टीने आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाची मदत घेण्याविषयी संशोधन करावे, असे आवाहन वैष्णव यांनी केले. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय दूरसंचार मंत्रालय सदैव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषी उत्पादनांची वाहतूक वेगाने आणि कमीत कमी वेळात व्हावी या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालय एक योजना आखत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

श्री.वैष्णव यांनी 93 व्या स्थापनदिनानिमित्त आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अभिनंदन केले. "शेतकऱ्यांना त्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ज्या माहितीची गरज आहे अशी माहिती देण्यात किसान सारथी उपक्रम मोलाचे योगदान देईल. या उपक्रमासाठी तसेच आयसीएआरच्या कृषिविस्तार, शिक्षण आणि संशोधन याविषयीच्या कार्यासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री.नरेंद्र तोमर यांच्या सक्षम नेतृत्वाचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोग होईल" असा विश्वासही वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला.

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736196) Visitor Counter : 310