शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री यांनी संयुक्तपणे शालेय नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमाचा केला प्रारंभ
शिक्षक हे परिवर्तन आणि नवोन्मेशाचे सदिच्छादूत - केंद्रीय शिक्षण मंत्री
शालेय नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमामुळे आदिवासी भागातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मदत होईल- अर्जुन मुंडा
Posted On:
16 JUL 2021 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज 50,000 शालेय शिक्षकांसाठी ‘शालेय नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमाचा (स्कूल इनोव्हेशन अम्बेसेडर ट्रेनिंग प्रोग्रॅम) संयुक्तपणे प्रारंभ केला. अन्नपूर्णा देवी, राजकुमार रंजन सिंग,डॉ सुभास सरकार या केंद्रीय राज्यमंत्र्यांसह शिक्षण आणि आदिवासी कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आपले विद्यार्थी भविष्यासाठी सज्ज राहावेत या दृष्टीने आपले शिक्षक हे परिवर्तन आणि नवनिर्माणाचे सदिच्छादूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. शिक्षण मंत्रालयाचा नवोन्मेश विभाग, आदिवासी कल्याण मंत्रालय, सीबीएसई आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम साकारला आहे. यातून लाखो विद्यार्थ्यांमध्ये नव कल्पनांची जोपासना होणार असून नवोन्मेशाची संस्कृती विकसित होणार आहे आणि त्यातूनच नव आणि सळसळत्या भारताचा पाया घातला जाणार असल्याचे ते म्हणाले.
शालेय नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभणार असून त्यांच्या कल्पनेने ते जगाला काही नाविन्यपूर्ण देणार असल्याचे अर्जुन मुंडा म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा हा पंतप्रधानांचा आणखी एक महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या अंतर्गत आदिवासी बहुल विभागात येत्या तीन वर्षात 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा उभारण्यात येणार आहेत. या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना शालेय नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमाचा मोठा लाभ होणार आहे. आदिवासी मुलांना सर्वोत्तम शिक्षण पुरवण्यासाठी आदिवासी कल्याण मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदी-प्रशिक्षण पोर्टल सुरु केले असून यामध्ये प्रशिक्षण संबंधी बाबींचे भांडार उपलब्ध असल्याचे आदिवासी कल्याण सचिव अनिल कुमार झा यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण मोड्यूलची या पोर्टलशी सांगड घातल्यास अधिक लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षकांसाठीच्या या अभिनव आणि एका प्रकारे अनोख्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे, 50,000 शालेय शिक्षकांना नवकल्पना, उद्योजकता, आयपीआर, उत्पादन विकास, कल्पना निर्मिती यासह इतर पैलूंबाबत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेश विभागाने आणि शालेय शिक्षकांसाठीच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने, आपल्या ‘ उच्च शैक्षणिक संस्थांच्या सदस्यांसाठीच्या नवोन्मेश प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या धर्तीवर याची आखणी केली आहे. हे प्रशिक्षण केवळ ऑनलाइन माध्यमातून दिले जाईल.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736193)
Visitor Counter : 225