अर्थ मंत्रालय

सर्व प्रमुख विमानतळांवर कोविड-19 लसींना जलद परवानगी मिळण्यासाठी सीबीआयसीची 'कोविड प्रतिसाद योजना'

Posted On: 15 JUL 2021 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2021

 

तापमान-संवेदनक्षम म्हणजे विशिष्ट तापमानाची गरज असणाऱ्या लसींना प्रवासादरम्यान कार्यक्षमपणे आणि वेगाने परवानग्या मिळणे हे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी आत्यंतिक महत्त्वाचे असल्याचे ओळखून सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने काळानुरूप पाऊल उचलले आहे. सर्व प्रमुख विमानतळांवर कोविड प्रतिबंधक लसींना वेगाने परवानग्या मिळून त्यांच्या प्रवासातील अडथळा दूर करण्यासाठी सीबीआयसीने सीआरपी म्हणजे कोविड प्रतिसाद योजना मांडून (येथे पाहा-) तिची अंमलबजावणी सुरु केली आहे.

यानुसार, प्रत्येक हवाई कार्गो/ कुरिअर टर्मिनलवर कोविड-19 लस प्रतिसाद पथक स्थापन करण्यात येणार आहे. हे पथक, कोविड प्रतिबंधक लसींच्या वाहतुकीशी संबंधित सर्व परवानग्या आणि समन्वयासाठी एकल संपर्कबिंदू (सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट) म्हणून काम करेल. एखाद्या ठिकाणी लसी पोहोचल्यावर त्या ताबडतोब वाहून नेल्या जाव्यात याची काळजी याद्वारे घेतली जाईल. याकरिता हे पथक सीमाशुल्क विभाग, स्थानिक अधिकारी आणि संबंधित भागीदार यांच्यासह एक प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार करेल. लसींना त्वरित व वेगाने प्रवास मुभा मिळण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्नही केले जातील.

याशिवाय, कोविड प्रतिबंधक लसींच्या कुरिअरमार्फत होणाऱ्या आयात/ निर्यातीच्या सोयीसाठी सीबीआयसीने 'कुरिअर आयात आणि निर्यात (इलेक्ट्रॉनिक घोषणापत्र आणि प्रक्रिया) सुधारणा नियम, 2020' जारी केले आहेत. यापूर्वीच्या कुरिअरविषयक नियमांमध्ये कुरिअरने येणाऱ्या मालाच्या किंमतीविषयी काही निर्बंध होते. आता मात्र सुधारित नियमानुसार कुरिअरद्वारे आयात/निर्यात होणाऱ्या कोविड लसींवर किंमतविषयक कोणतेही निर्बंध/ मर्यादा नाहीत.

'लसींच्या वाहतुकीत त्यांचे ठराविक तापमान कायम राखावे लागते व त्यासाठी खास तापनियामक यंत्रणा असेल्या कंटेनर्सची गरज असते' हे लक्षात घेऊन अशा कंटेनर्सना तात्पुरता निःशुल्क प्रवेश देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

लसींच्या वाहतुकीवर सीबीआयसी बारकाईने लक्ष ठेवणार असून त्यांच्या सीमापार वाहतुकीत कोणताही अडथळा न येण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. यासंबंधीच्या कोणत्याही अडचणी / आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे.

जागतिक पुरवठा व वाहतूक साखळ्यांसमोर कोविड साथीमुळे सर्वस्वी नवीन व अपरिचित अडचणी उभ्या राहत आहेत व त्यामुळे आर्थिक व्यवहारांची गती मंदावत आहे. यावर सीमाशुल्क विषयक प्रक्रिया सोप्या करत, मध्यस्थी/ हस्तक्षेपांचे प्रमाण कमी करत, स्वयंचलित यंत्रणांचा वापर वाढवत आणि कर्मचारीवर्गासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना प्रत्यक्षात आणत सीबीआयसीने चपळाईने तोडगा काढला आहे.

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735989) Visitor Counter : 257