मंत्रिमंडळ

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष योजना सुरू ठेवण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 14 JUL 2021 6:19PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आयुष योजना (NAM) या केंद्र पुरस्कृत योजनेला 01-04-2021 ते  31-03-2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. या योजनेला 15-09-2014 रोजी आरंभ झाला.  ही रु. 4607.30 कोटी खर्चाची योजना असून 3000 कोटी रुपये खर्चभार केंद्र तर 1607.30 कोटी रुपये खर्चभार राज्ये उचलणार आहेत.

भारताला आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक उपचारांचा अजोड वारसा लाभला आहे. या उपचारांसंबधीचे ज्ञान म्हणजे प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक आणि गुणकारक औषधोपचारांचा खजिना आहे. वैविध्यपूर्णता, लवचिकता, उपलब्धता, किफायतशीरपणा आणि समाजातील सर्व थरातील माणसांकडून मनोमन स्विकार ही या भारतीय औषधोपचारांची वैशिष्ट्ये आहेत. तुलनेने कमी किंमत आणि वाढते आर्थिक मूल्य यामुळे समाजातील मोठ्या वर्गापर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मोठी क्षमता या उपचारपद्धतींकडे असल्याचे आढळून येते.

किफायतशीर आयुष सेवा उपलब्ध करून देणे, आयुष रुग्णालये व दवाखाने सार्वत्रिक प्रवेशासाठी ती उपलब्ध होतील अश्या प्रकारे त्यात सुधारणा घडवून आणणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये येथे आयुषपद्धतीच्या उपचारांची सोय करणे, राज्यपातळीवरील शिक्षणसंस्थांची क्षमता वाढवून त्याद्वारे आयुष उपचार पद्धतींचे शिक्षण वाढवणे, नवीन रुग्णालय उभारणी ते 50 खाटां राखीव असणारे रुग्णालय यांना प्रोत्साहन, आयुष सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयुष पद्धतीची- समग्र आरोग्यसंपन्नतेकडे नेणारी 12,500 आयुष उपचार व आरोग्यसंपन्नता उपचारपद्धती केंद्रे, आजारांचा विळखा कमी करण्याच्या दृष्टीकोनातून लोकांना स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी सक्षम करणे आणि आजारांसंबधीत खर्चाचा भार कमी करणे या हेतूंनी आयुष उपचारांना सार्वत्रिक उपलब्धता मिळवून देणे हा भारत सरकारचा या केंद्र पुरस्कृत योजनेमागील उद्देश आहे.

ही योजना देशात आयुष आरोग्य सेवा व संबधित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना, विशेषतः दुर्गम भागात सहकार्य करणे, अश्या प्रदेशांवर विशेष लक्ष पुरवणे आणि वार्षिक योजना आखताना अश्या प्रदेशांमध्ये जास्त संसाधने उपलब्ध करून देणे याद्वारे आयुष उपचार आणि औषधोपचार यामधील दरी सांधते.

या योजनेचे उद्दिष्ट-फलित खालीलप्रमाणे सांगता येतील.

  • आयुष उपचारपद्धती उपलब्ध करून देणारी वाढती उपचार केंद्रे आणि त्या उपचारपद्धतीतील औषधांची तसेच त्यातील तज्ञांची वाढती उपलब्धता
  • आयुष उपचारपद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देउन त्याद्वारे आयुष उपचारासंबधी शिक्षणाचा दर्जा वाढवणे,
  • सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे आयुष उपचारांच्या माध्यमातून सांसर्गिक तसेच असांसर्गिक आजारांना अटकाव करण्याचे लक्ष्य.

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735517) Visitor Counter : 319