सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म लघू मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी बनले खादीच्या नैसर्गिक रंगाचे ब्रँड अँबेसेडर

Posted On: 06 JUL 2021 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःला खादीच्या नैसर्गिक रंगाचा ब्रँड अँबेसेडर घोषित केले आहे. देशभरात या रंगाचा प्रचार ते करणार असून, गाईच्या शेणापासून रंगनिर्मितीसाठी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी आज जयपूर इथल्या खादीच्या नैसर्गिक रंगाच्या नव्या स्वयंचलित विभागाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. गाईच्या शेणापासून तयार केलेला हा देशातील पहिला रंग आहे. गडकरी यांनी या अभिनव तंत्रज्ञानाचे कौतुक केले. देशातील ग्रामीण आणि कृषी आधारीत अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळेल असे ते यावेळी म्हणाले.

लाखो कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनापेक्षाही जास्त आनंद आणि समाधान या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना होत असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी संशोधनासाठी त्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे कौतुक केले.

गडकरी यांनी यावेळी 1000 लीटर खादी नैसर्गिक रंगाची (प्रत्येकी 500 लीटर डिस्टेंपर आणि 500 लीटर इमल्शन) मागणी नोंदवली. नागपूरच्या निवासस्थानी ते याचा उपयोग करणार आहेत. खादी ग्रामोद्योग आयोगाचे एकक असलेल्या जयपूरच्या कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेच्या (KNHPI) परिसरात हा नवा प्रकल्प उभारला आहे. याआधी प्रायोगिक स्वरुपात मनुष्यबळाचा वापर करुन नैसर्गिक रंग तयार केला जात होता. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगाची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. सध्याचे दिवसाला होणारे 500 लीटर  उत्पादन 1000 लीटर होईल.

नवा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेने सुसज्ज आहे. उत्पादनाचा सर्वोत्तम दर्जा राखला जाईल याचीही खातरजमा यातून केली जाईल असे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले.

खादी नैसर्गिक रंगाचे उद्‌घाटन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 रोजी केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशभरात स्वयंरोजगार निर्माण करणे या दुहेरी उद्देशाने या रंग निर्मितीला सुरुवात केली होती. या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा या उद्देशाने खादी ग्रामोद्योग आयोगाने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत (PMEGP) केला आहे. रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे. 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733123) Visitor Counter : 379