कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ


प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांचे 95,000 कोटी रुपयांचे विमा दावे निकाली काढण्याचा विक्रम

Posted On: 01 JUL 2021 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज फसल बिमा योजना जनजागृती मोहीमेचा शुभारंभ झाला. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल, केंद्र सरकारच्या ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठीचा विशेष पीक विमा सप्ताह आजपासून सुरु झाला. यानिमित्त ही जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे.

फसल बिमा योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक शेतकऱ्याला विमाकवच देणे हा आहे, असे, यावेळी बोलतांना, नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. आतापर्यंत, शेतकऱ्यांचे विम्याचे 95,000 कोटी रुपयांचे दावे निकाली काढत या योजनेने एक विक्रमी टप्पा पार केला आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आणि विमा  कंपन्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.त्यांच्या अथक परिश्रमामुळेच गेल्या चार वर्षात, 17 हजार कोटी रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांनी जमा केले, या हप्त्यांमुळेच, त्यांना दाव्याची 95 हजार कोटी रुपयांची रक्कम मिळू शकली, असे, तोमर यावेळी म्हणाले.

यावेळी कृषीमंत्र्यांनी IEC व्हॅन्सला देखील हिरवा झेंडा दाखवला. या व्हॅनच्या माध्यमातून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी जनजागृती करत, एक जुलै ते 7 जुलै या सप्ताहात, अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जनजागृती मोहिमेसाठीची पत्रके, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीची पुस्तिका आणि मागर्दर्शक पुस्तिकेचेही त्यांनी प्रकाशन केले. या साहित्यामुळे, समन्वयकांना, शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ आणि प्रक्रीयेविषयी माहिती सांगणे, सोपे जाणार आहे.

या संपूर्ण सप्ताहात, खरीप हंगाम 2021अंतर्गत अधिसूचित, सर्व प्रदेश/जिल्ह्यांमध्ये, जनजागृती मोहीम चालवली जाणार आहे. त्यातही, 75 विकासोत्सुक/आदिवासी जिल्ह्यांमध्ये, जिथे पीक विमा योजनेचा पुरेसा प्रसार झाला नाही, अशा भागात शेतकरी जागृतीवर भर दिला जाणार आहे.

प्रत्यक्ष प्रचार, डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेची मूलभूत माहिती दिली जाणार आहे. आदिवासी भागातील आणि विकासोत्सुक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह या मोहिमेत, महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

वव्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून सोशल मिडीयावर देखील योजनेच्या यशोगाथा मांडल्या जाणार आहेत, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या कथाही सांगितल्या जाणार आहेत.

या मोहिमेदरम्यान, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन केले जाणार आहे.

सर्व राज्ये आणि योजनेशी संबंधित घटक, जसे बँका, सामाईक सेवा केंद्रे, विमा कंपन्या यांनी एकत्र येऊन, सर्व 75 तालुके/विभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1731952) Visitor Counter : 214