संरक्षण मंत्रालय
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कारवारच्या नौदल तळावर ‘सीबर्ड प्रकल्पा’अंतर्गत सुरु असलेल्या विकासकामांचा घेतला आढावा
संरक्षण मंत्री म्हणाले की हा आशियातील सर्वात मोठा नौदल तळ असेल आणि या तळाच्या उभारणीमुळे संरक्षण दलांच्या परिचालन सज्जतेला आणखी मजबुती येईल
Posted On:
24 JUN 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 24 जून 2021
‘सीबर्ड प्रकल्पा’अंतर्गत सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 24 जून 2021 ला कर्नाटकातील कारवारच्या नौदल तळाला भेट दिली. भारतीय नौदलाच्या कदंबा हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी नौदल प्रमुख, अॅडमिरल करमबीर सिंग यांच्यासोबत प्रकल्पाचे क्षेत्र आणि कामे सुरु असलेल्या ठिकाणांचे हवाई सर्वेक्षण केले. फ्लॅग ऑफिसर, पश्चिमी नौदल कमांडचे कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अॅडमिरल आर.हरी कुमार आणि फ्लॅग ऑफिसर, कर्नाटक नौदल क्षेत्राचे कमांडिंग रिअर अॅडमिरल महेश सिंग यांनी नौदल तळाच्या भेटीवर आलेल्या या मान्यवरांचे स्वागत केले.
संरक्षण मंत्र्यांनी नौदल तळावर सुरु असलेल्या कामांचे परीक्षण केले आणि शिपलिफ्ट मनोऱ्याची क्षमता दर्शविणाऱ्या प्रात्यक्षिकासह तेथे सुरु असलेल्या कामांबद्दल महत्त्वाची माहिती घेतली. त्यांनी नौदलाच्या बंदराला भेट देऊन तिथे सीबर्ड प्रकल्पाच्या दुसऱ्या A टप्प्याअंतर्गत सुरु असलेल्या सागरी कामांचा तसेच पायाभूत सुविधा विकासाचा तसेच तेथील धक्क्याच्या परिचालनाचा आढावा घेतला. येथे विवाहित नाविकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेला देखील राजनाथ सिंग यांनी भेट दिली आणि तेथे उभारण्यात आलेल्या परिणामकारक जल-व्यवस्थापन, घरगुती कचऱ्याची योग्य विल्हेवाट, उर्जेचा परिणामकारक वापर यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या आणि पर्यावरण-स्नेही घरांच्या व्यवस्थेची पाहणी केली.
राजनाथ सिंग यांनी सीबर्ड प्रकल्पाच्या विविध कामांचे कंत्राटदार आणि अभियंते तसेच कारवारच्या नौदल तळावरील अधिकारी, नाविक आणि सामान्य नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. सीबर्ड प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत त्यांनी त्यांच्या भाषणात समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर कारवार नौदल तळ हा आशियातील सर्वात मोठा नौदल तळ असेल आणि तो संरक्षण दलांच्या परिचालन सज्जतेला आणखी मजबुती देईल तसेच व्यापार, अर्थव्यवस्था आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेल्या मदतीमध्ये वाढ करण्यासाठी मदत करेल अशी अशा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730120)