अल्पसंख्यांक मंत्रालय

देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी अल्पसंख्याक मुख्तार अब्बास नक्वी यांनी सुरु केले ‘जान हैं तो जहाँ हैं’ हे देशव्यापी अभियान


“लसीकरणाबाबतची उदासीनता म्हणजे कोरोनाला आमंत्रणच : मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 21 JUN 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2021

 

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ‘जान हैं तो जहां हैं’ या देशव्यापी लसीकरण मोहीमेचे उद्घाटन केले. ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच लसीकरणाविषयीचे गैरसमज आणि काही समाजकंटकांनी लसीकरणाबाबत पसरवलेल्या अफवा दूर करण्यासाठीया मोहिमेअंतर्गत प्रचार आणि जागृती केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशातील रामपूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या मोहिमेचा प्रारामभ करतांना ते म्हणाले की, लसीकरण टाळणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

काही समाजकंटक आपल्या दुष्ट हेतूंसाठी लसीकरणाविरोधात अफवा आणि गैरसमज पसरवत आहेत. असे लोक जनतेचे आरोग्य आणि कल्याणाचे शत्रूच आहेत, असे नक्वी यावेळी म्हणाले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने विविध सामाजिक-शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गट संस्थांसोबत ही जनजागृती मोहीम आखली असून, येत्या काही दिवसांत ती देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत, विविध राजकीय नेते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विज्ञान तसेच इतर  क्षेत्रातील विविध मान्यवर लसीकरणाबाबत लोकांना प्रभावी संदेश देत आहेत, तसेच, या संदर्भात पथनाट्येही आयोजित केली जात आहेत.

भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातून दोन भारतीय बनावटीच्या कोरोना लसी विकसित करण्यात आल्या आहेत. या लसी वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित असून कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक प्रभवी शस्त्र असल्याचे सिध्द झाले आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेऊन भारताला कोरोना महामारीपासून मुक्त करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

हज समिती, वक्फ बोर्ड, त्यांच्या सहकारी संघटना, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद शिक्षण संस्था, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, “नई रोशनी ”अंतर्गत कार्यरत महिला बचत गट या सर्वांना या जनजागृती मोहिमेत सहभागी करुन घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1729080) Visitor Counter : 233